मातंग समाजाच्या विविध मागण्यांसाठी विधानभवनावर काढण्यात आलेल्या मोर्चावर पोलिसांनी अमानुषपणे लाठीमार केला असून त्यात ४० पेक्षा अधिक लोक जखमी झाले. जखमींना मेयो रुग्णालयात पाठविण्यात आले तर अन्य मोर्चेक ऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. चार दिवसांपूर्वी संगणक परिचालकांवर झालेल्या लाठीमाराची चौकशी सुरू असताना शुक्रवारी मातंग समाजाच्या मोर्चावर करण्यात आलेल्या लाठीमारामुळे अन्य संघटनांच्या मोर्चेकऱ्यांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे.

हिवाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या आठवडय़ाच्या शेवटच्या दिवशी नांदेडच्या लोक स्वराज्य आंदोलन संघटनेने प्रा. रामचंद्र भरांडे, व्ही जी डोईवाड आणि दत्तराज गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली मातंग समाजाला आरक्षणाच्या अनुसूचित जातीमध्ये अ, ब, क, ड वर्गीकरण करण्यात यावे, या मागणीसाठी विधानभवनावर मोर्चा काढला. नांदेडवरून ६ डिसेंबरपासून आरक्षण वर्गीकरण संघर्ष महापदयात्रेला प्रारंभ झाल्यानंतर शुक्रवारी सकाळी ते नागपुरात पोहोचले होते. यशवंत स्टेडियममधून त्यांचा मोर्चा निघाल्यावर दुपारी अडीच वाजताच्या सुमारास श्रीमोहिनी कॉमप्लेक्सजवळ पोलिसांनी अडवल्यामुळे मोर्चातील समाजाचे लोक आक्रमक झाले. मोर्चामध्ये अनेक युवक आणि वयोवृद्ध लोक होते. सरकारच्या विरोधात घोषणा सुरू करून त्यांनी कठडे तोडून समोर जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांच्या बंदोबस्तामुळे शक्य झाले नाही. त्यानंतर मोर्चातील दोन कार्यकर्ते कठडय़ावरून उडी मारून आत जाऊ लागताच पोलिसांनी त्यांच्यावर लाठीमार सुरू केला. आपल्या सहकाऱ्यांवर लाठीमार होत असताना मोर्चातील अन्य लोक आक्रमक झाले आणि त्यांनी कठडे फेकणे सुरू करताच पोलिसांनी मोर्चेकऱ्यांवर लाठीमार सुरू केला. त्यामुळे मोर्चातील लोक पळू लागले. काही वृद्ध त्याच ठिकाणी बसले. त्यांच्यावरही लाठीमार करण्यात आला. पोलीस दिसेल त्याला मारत होते. अनेक महिला आणि काही युवक मोहिनी कॉम्पलेक्स आणि रायसोनी महाविद्यालयात शिरले. त्यांना तेथून बाहेर काढून अमानुषपणे मारले. मोर्चास्थळी पळापळ सुरू असताना त्या भागातील अनेक दुकाने बंद झाली. या लाठीमारामध्ये अनेक युवक रक्तबंबाळ झाले. त्यांना रुग्णालयात पाठविण्यात आले. काही सामान्य लोक त्या भागात उभे असताना त्यांच्यावरही पोलिसांनी लाठीमार केला.

जखमी झालेल्यांना मेयो रुग्णालयात पाठविले जात होते. अतिरिक्त पोलीस ताफा मोर्चास्थळी आल्यानंतर परिस्थिती नियंत्रणात आली. आजूबाजूला जाऊन मोर्चातील लोकांना पकडून आणत त्यांना ताब्यात घेतले जात होते. पोलीस अधिकारी मोर्चास्थळी पोहोचल्यावर त्यांनी मोर्चा परिसर कठडे लावून बंद केला. त्या भागातील वाहतूक बंद करण्यात आली होती. त्यामुळे रेल्वे स्टेशनकडून येणाऱ्या मार्गावर वाहतूक खोळबंली. मातंग समाजाच्या मोर्चाच्या समोर केरोसीन हॉकर्स आणि विक्रेत्यांचा मोर्चा होता. लाठीमार सुरू असताना त्या मोर्चातील लोकांनी तेथून पळ काढला.

लाठीमारानंतर मातंग समाजाचे लोक घटनास्थळी आल्यानंतर त्यांनी या लाठीमाराचा निषेध करीत चौकशी करण्याची मागणी केली. पोलिसांनी लाठीमार करून समाजाचे आंदोलन दडपण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप संघटनेने केला. सरकारच्या विरोधात संघर्ष सुरू राहणार असल्याचे व्ही. जी खोब्रागडे यांनी सांगितले.