महापालिकेच्या मुख्य अभियत्यांची स्पष्टोक्ती; ‘जनमंच’ची मागणी फेटाळली

शहरातील सिमेंट रस्त्यांची त्रयस्थांकडून तपासणी करवून घेण्याची जनमंचची मागणी महापालिकेने धुडकावली आहे. सिमेंट रस्त्याची गुणवत्ता तपासणीकरिता निविदा काढून जिओ-टेक या कंपनीला काम सोपवण्यात आले आहे. त्यामुळे आणखी त्रयस्थांकडून तपासणीचा प्रश्न येत नाही, परंतु जनमंच किंवा इतर कुणाच्याही सूचनांवर महापालिका विचार करण्यास तयार आहे, असे महापालिकेचे मुख्य अभियंता विजय बनगिनवार यांनी स्पष्ट केले. त्यामुळे आता जनमंच आणि महापालिका यांच्यातील वाद वाढण्याची चिन्हे आहेत.

जनमंचने सिमेंट रस्त्यांची सार्वजनिक तपासणी करून रस्त्यांच्या निकृष्ट कामाकडे प्रशासनाचे लक्ष वेधले होते. त्यानंतर आयुक्त अश्विन मुदगल आणि जनमंचच्या प्रतिनिधीमंडळाची महापालिकेत बैठक झाली. त्यामध्ये त्रयस्थांकडून रस्त्यांची तपासणी करण्यात येईल आणि या त्रयस्थ एजन्सीमध्ये एक प्रतिनिधी जनमंचचा असेल, असा निर्णय झाला होता. परंतु मुख्य अभियंता बनगिरीवार यांनी त्रयस्थांकडून तपासणीचा मुद्दाच फेटाळून लावला. यासंदर्भातील पत्र जनमंचला आठ दिवसांपूर्वी पाठवल्याचे त्यांनी लोकसत्ताशी बोलताना सांगितले. जनमंचने सुचवलेल्या काही मुद्यांवर काम सुरू आहे. त्यांच्याकडून पदपथची उंची कमी करण्याची सूचना आली होती. जेथे शक्य आहे तेथे ही उंची कमी करण्यात आली. सायकल ट्रक बनवण्याची सूचना आली. त्यानुसार व्हीआयपी रोडवर सव्वामीटरची पट्टी सोडण्यात आली आहे. शहरातील सिमेंट रस्त्यांचे डिझाईन व्हीएनआयटीने केले आहे तर गुणवत्ता चाचणीचे काम जिओ-टेक देण्यात आले आहे, असे बनगिरवार म्हणाले.

ग्रेट नाग रोडवर तडे गेले आहेत. शेजारी नागनदी आहे, तसेच खाली ड्रेनेज आहे. ते झिरपत असल्याने हा रस्त्यावर तडे गेल आहेत. त्यासाठी महापालिकेने सीआरआरआय यांना पत्र लिहले आहे. त्यासाठी ६ लाख रुपये शुल्क देखील भरण्यात आले आहे. सीआरआरआयची चमू या रस्त्याची पाहणी करणार आहे. त्यांचे तांत्रिक मार्गदर्शनानंतर रस्त्याची दुरुस्ती करता येणे शक्य आहे. उर्वरित शहरातील रस्त्यावर केवळ २-३ ठिकाणी भेगा आहेत. नागपुरात किमान ६ आणि कमाल ४८ अंश सेल्सीअस तापमान आहे. अशा विषम तापमानाचा सिमेंट रस्त्यावर परिणाम अधिक जावणतो. असे असले तरी तज्ज्ञांच्या देखरेखेखाली रस्ते तयार केले जात आहेत. यानंतरही तक्रार असेल तर काम सुरू असताना जनमंचने प्रतिनिधी तेथे ठेवण्यास महापालिका परवानगी देईल. जनमंचच्या पत्राला आठ दिवसांपूर्वीच उत्तर देण्यात आले आहे. कुठल्याही प्रकारच्या सूचना ते देऊ शकतात. शिवाय काही दिवसांत त्यांच्याशी बैठक आयोजित केली जाईल, असेही ते म्हणाले.

दरम्यान जनमंचने एक महिन्यांत याबाबत निर्णय घ्यावा, अन्यथा पुन्हा सार्वजनिक तपासणी करावी लागेल, असा इशारा दिला आहे.

सिमेंट रस्त्याची गुणवत्ता तपासणीकरिता निविदा काढून जिओ-टेक या कंपनीला काम सोपवण्यात आले आहे. त्यामुळे आणखी त्रयस्थांकडून तपासणीचा प्रश्न येत नाही, परंतु जनमंच किंवा इतर कुणाच्याही सूचनांवर महापालिका विचार करण्यास तयार आहे.

विजय बनगिनवार, मुख्य अभियंता, महापालिका