शोभा फडणवीसांच्या ‘धांडोळा शेतीचा’चे प्रकाशन

देशाच्या विविध भागात सिंचनाच्या ३० नवीन प्रकल्पांना केंद्र सरकारने मंजुरी दिली आहे. त्यातील ३ ते ५ कामे ही ‘नदी जोड’ प्रकल्पातील आहेत. त्याच्या कामांना लवकरच सुरूवात केली जाईल, अशी माहिती केंद्रीय भूपृष्ठ वाहतू व जलसंसाधन मंत्री नितीन गडकरी यांनी केले.

भाजपच्या ज्येष्ठ नेत्या व माजी मंत्री शोभा फडणवीस यांच्या ‘धांडोळा शेतीचा’ या पुस्तक प्रकाशन कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी शोभा फडणवीस यांच्यासह पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे माजी कुलगुरू शरद निंबाळकर, खासदार डॉ. विकास महात्मे, महापौर नंदा जिचकार, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा निशा सावरकर, नागो गाणार, मल्लिकार्जुन रेड्डी, समीर कुणावार, विश्वास पाठक उपस्थित होते.

नितीन गडकरी पुढे म्हणाले की, महाराष्ट्रात भरपूर पाऊस होत असला तरी सिंचन प्रकल्प नसल्याने पाणी अडवता येत नाही. केंद्र सरकारने हे चित्र बदलण्याकरिता नदी जोडो योजना आणि इतर सिंचन प्रकल्पांना गती देण्याचा निर्णय घेतला आहे. गोदावरीचे पाणी खोऱ्याद्वारे मराठवाडय़ासाठी वळवले जाईल. ब्रम्हपुत्रेचे पाणी वळवून बंगालमार्गे छत्तीसगडला आणल्या जाईल. त्यामुळे येथील बऱ्याच राज्यातील पाण्याचा प्रश्न सुटेल. महाराष्ट्रात सध्या केवळ २२ टक्के सिंचन क्षेत्र आहे. ते दोन वर्षांत ४० टक्क्यावर सिंचन नेणे शक्य असल्याचे मुख्यमंत्र्यांना सांगितले आहे.

शोभाताई फडणवीस यांनी पुस्तकातून विदर्भातील शेतकऱ्यांचे वास्तव मांडले आहे. त्यांनी आता चंद्रपूर आणि गडचिरोलीतील शेतकऱ्यांना पूरक व्यवसायाकरिता परावृत्त करावे, त्यांना मदत करू. त्याने शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढणे शक्य आहे. शोभा फडणवीस यांनी स्वातंत्र्यानंतर केंद्र व राज्य सरकारच्या चुकीच्या धोरणाचा शेतकऱ्यांना बसलेल्या फटक्यासह इतर विषयांवर प्रकाश टाकला. शरद निंबाळकर यांनीही आपले मत मांडले.