वन्यजीवांवरील उपचार आणि उपचारांनंतर त्यांना जंगलात सोडण्यासाठी प्रादेशिक वनखात्याचे अत्याधुनिक साहित्य सामुग्रीसह ‘ट्रान्झिट ट्रिटमेंट सेंटर’ तयार आहे, पण त्याच्या उद्घाटनाला मुहूर्त मिळत नाही. दुसरीकडे गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणीसंग्रहालयातील बचाव केंद्राची इमारत तयार आहे. मात्र, वन्यजीवांवरील उपचारांसाठी केवळ प्राथमिक साहित्यच उपलब्ध असल्याने केंद्रीय प्राणीसंग्रहालय प्राधिकरणाने त्याला मान्यता दिलेली नाही. राज्याच्या उपराजधानीत वन्यजीवांवरील उपचारासाठी दोन केंद्रे तयार असतानासुद्धा वन्यजीवांवरील उपचार सुविधा अजूनही वाऱ्यावरच आहेत.
गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणीसंग्रहालयातील बचाव केंद्राची इमारत तयार झाली असली तरीही प्राणीसंग्रहालयाचे काम मोठे असल्याने वनविकास महामंडळाच्या हातात ते काम आल्यानंतर त्यांनी ते काम टप्प्याटप्प्यात सुरू केले. त्यातील बचाव केंद्राला प्राथमिकता देऊन त्यासाठी निधी उपलब्ध करून घेतला. या निधीतून बचाव केंद्राची इमारत तर तयार झाली, पण वन्यप्राण्यांवरील उपचारासाठी लागणाऱ्या साहित्याचा निधी मात्र रखडलेलाच आहे. चार-पाच महिन्यांपूर्वी केंद्रीय प्राणीसंग्रहालय प्राधिकरणाची दोन सदस्यीय चमू येऊन गेली. तेव्हाच त्यांनी त्रुटींचा पाढा महामंडळासमोर वाचला. मात्र, त्याआधीपासूनच महामंडळाने उद्घाटनाचे वारे पसरविण्यास सुरुवात केली होती. आधी मार्च, नंतर जून अशी उद्घाटनाची एकएक तारीख महामंडळाकडूनच समोर येत होती. प्रत्यक्षात मात्र केंद्रीय प्राणीसंग्रहालय प्राधिकरणाने मान्यताच दिलेली नव्हती. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या इमारतीत वन्यजीवांवरील उपचारासाठी लागणाऱ्या साहित्याचाच अभाव आहे. निधीअभावी हे साहित्य अडकले आहे.
दहा दिवसांपूर्वीच १ ऑक्टोबरला प्राधिकरणाचा चमू बचाव केंद्राला भेट देऊन गेला. त्यांनी अजूनही बचाव केंद्रासाठी हिरवा कंदील दाखवलेला नाही. त्यामुळे दोन केंद्रांच्या कात्रीत वन्यजीवांवरील उपचार सुविधा हवेतच आहेत.
या संदर्भात वनविकास महामंडळाचे अधिकारी एस.पी. वडस्कर यांना विचारणा केली असता, उपचाराचे प्राथमिक साहित्य आल्याचे त्यांनी सांगितले. उर्वरित साहित्य हळूहळू येईल आणि त्यासाठी निविदा काढण्यात आल्या आहेत. अलीकडेच केंद्रीय प्राणीसंग्रहालय प्राधिकरणाची चमू येऊन गेली आणि येत्या आठवडय़ात त्यांच्याकडून बचाव केंद्राची मान्यता मिळण्याचे संकेत आहे. त्यांची मान्यता आल्यानंतर लगेच उद्घाटनाची तारीख जाहीर केली जाईल.