सार्वजनिक बांधकाममंत्र्यांची माहिती; मुंबई-गोवा महामार्ग, कोकणातील रस्त्यांचा प्रश्न गाजला

राज्यात ब्रिटिशकालीन पुलांसह इतरही छोटे- मोठे २७ हजार पूल आहेत. त्याची दुरुस्ती करायची ठरवली तर त्यासाठी १ लाख कोटी रुपयांची आवश्यकता आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाचे बजेट ३ हजार कोटी रुपयांचे आहे, असे सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी सांगून पूल आणि रस्ते दुरुस्तीसाठी येणाऱ्या आर्थिक अडचणींची कबुली दिली. ही सर्व कामे एकाच वेळी करणे शक्य नसल्याने टप्प्याटप्प्याने करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला असून, त्या दृष्टीनेच नियोजन करून कामे सुरू करण्यात आली आहेत, असेही त्यांनी स्पष्ट केले.

विधान परिषदेत गुरुवारी प्रश्नोत्तराच्या तासादरम्यान मुंबई-गोवा महामार्ग आणि कोकणातील रस्ते दुरुस्तीचा मुद्दा चांगलाच गाजला. त्या भागातील पूल आणि रस्ते दुरुस्तीच्या एकूण पाच प्रश्नांवर सभागृहात चर्चा झाली. राष्ट्रवादीचे निरंजन डावखरे यांनी अलिबाग-पेण-वडखळ या मार्गाचा, काँग्रेसचे अनंत गाडगीळ यांनी मुंबई-गोवा महामार्गावरील पोलादपूर व पनवेल येथील नद्या आणि कालव्यांवरील जीर्ण पुलांचा, शेकापचे जयंत पाटील यांनी महाड येथील सावित्री नदीवरील वाहून गेलेल्या पुलाचा, काँग्रेसचे भाई जगताप यांनी या दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना दिलेल्या नुकसान भरपाईचा आणि सुभाष झांबड यांनी मुंबई-गोवा महामार्गावरील रस्त्यांच्या दुरुस्तीचा प्रश्न उपस्थित केला होता. या सर्व प्रश्नांना एकत्रितपणे उत्तर देण्याचा प्रयत्न चंद्रकांतदादा पाटील आणि राज्यमंत्री प्रवीण पोटे यांनी केला. सावित्री नदीवरील पूल दुर्घटना आणि त्यानंतर जीर्ण झालेल्या पुलांचे झालेले सर्वेक्षण याची माहिती देताना पाटील यांनी एकाच वेळी सर्व पूल व रस्ते दुरुस्तीसाठी येणाऱ्या आर्थिक अडचणींची कबुली दिली. राज्यातील सर्व जीर्ण पुलांच्या स्ट्रक्चरल ऑडिटचे काम सुरू असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. वडखळ ते अलिबाग या दरम्यानचा रस्ता मार्च २०१७ पर्यंत पूर्ण केला जाईल. महाडच्या सावित्री नदीवरील पुलाचे काम आठ दिवसांत सुरू केले जाईल, असे या वेळी मंत्र्यांकडून सांगण्यात आले. मुंबई-गोवा महामार्गाचे काम राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या माध्यमातून केले जाणार असून त्यासाठी पाठपुरावा केला जात आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.