चंद्रपूर जिल्ह्यात दारुबंदी असतानाही अवैध मार्गाने दारुची तस्करी केल्याप्रकरणी चंद्रपूरमधील राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते दीपक जयस्वाल यांना अटक करण्यात आली आहे. जयस्वाल यांच्या गाडीतून १२ बम्पर विदेशी दारु जप्त करण्यात आली आहे.

दोन वर्षांपूर्वी राज्य सरकारने चंद्रपूरमध्ये दारुबंदीचा निर्णय घेतला होता. मात्र यानंतरही चंद्रपूरमध्ये अवैधमार्गाने दारुची तस्करी केली जाते. चंद्रपूरमधील राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगराध्यक्ष आणि माजी शहराध्यक्ष दीपक जयस्वाल यांचा पूर्वी दारुविक्रीचा व्यवसाय होता. मात्र चंद्रपूरमध्ये दारुबंदी लागू झाल्यावर जयस्वाल यांना व्यवसाय बंद करावा लागला. दारुबंदीनंतरही जयस्वाल अवैध मार्गाने दारुची तस्करी करुन दारुविक्री करत असल्याचा संशय पोलिसांना होता. बुधवारी दुपारी पोलिसांनी चंद्रपूरजवळील पाडोलीजवळ जयस्वाल यांच्यावर कारवाई केली. जयस्वाल यांच्याकडून १२ बम्पर विदेशी दारु जप्त करण्यात आली आहे. शहरातील ज्येष्ठ नेत्यावर कारवाई झाल्याने खळबळ माजली आहे.

दारुविक्रीचे प्रमाण चंद्रपूर जिल्ह्यात मोठे असल्याने दारुबंदी करावी अशी मागणी जोर धरत होती. दारुबंदीबाबत अभय बंग, विकास आमटे व अन्य मान्यवरांची समितीही नेमण्यात आली होती. प्रत्येक कुटुंबामध्ये सुमारे १० हजार रुपये दारुवर खर्च केला जातो, अशी आकडेवारी होती. या दारुबंदीसाठी अनेक आंदोलने झाली आणि त्यात एक लाख सात हजार महिलांनी पुढाकार घेतला होता. १७०० गावांनी ठराव केले होते. अखेर सरकारने दोन वर्षांपूर्वी दारुबंदीचा निर्णय घेतला होता. या निर्णयामुळे सरकारचे २०० कोटी रुपयांचे नुकसान होईल अशी भीती व्यक्त करण्यात आली. मात्र सरकारच्या नुकसानापेक्षा नागरिकांचे आरोग्य महत्त्वाचे असा पवित्रा अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी घेतला होता.