खमंग फोडणीला खवैय्यांचीही साथ

अमेरिकेतील बेंजामिन पेरी यांच्या नावावर असलेला ४० तास कुकिंगचा विक्रम मोडण्याची वेळ जसजशी जवळ येत होती, तसतसे या बल्लवाचार्याचे हात शिताफीने हलत होते. विक्रम करायचा म्हणून पदार्थाची चव घसरत नव्हती, तर त्याने घातलेल्या खमंग फोडणीला खवैय्यांचीसुद्धा तेवढीच साथ मिळत होती. शेफ विष्णू मनोहरांची ही खाद्यपदार्थाची मॅराथॉन रात्री आठ वाजेपर्यंत ५५० हून अधिक पदार्थावर जाऊन पोहोचली होती.

पाककला आणि पाकशास्त्र या दोन्ही तंत्राचा उपयोग करून सुप्रसिद्ध शेफ व विष्णूजी की रसोईचे संचालक विष्णू मनोहर सलग ५२ तास एक हजाराहून अधिक पाककृती करण्याचा विश्वविक्रम करण्याकडे वाटचाल करीत आहेत. शुक्रवारी सकाळी आठ वाजताच्या ठोक्याला सुरू झालेल्या त्यांच्या या मॅराथॉनने रात्री साडेआठ वाजेपर्यंत ३६ तास पूर्ण केले होते. तर त्यांनी तयार केलेले ५५० हून अधिक पदार्थ खवैय्यांनी पोटात घातले होते. मात्र, त्याचवेळी कॅमेरा, घडय़ाळ आणि गिनिज बुकचे परीक्षकही तेवढ्याची शिताफीने या सर्वावर नजर ठेवून होते. त्यामुळे याआधीचा ४० तासांचा विक्रम मोडायला अवघ्या चार तासांचा कालावधी शिल्लक राहिल्यानंतर इन्स्टिटय़ूट ऑफ इंजिनिअर्सच्या सभागृहात या क्षणाचा साक्षीदार होण्यासाठी विष्णू मनोहरांच्या खवैय्या चाहत्यांची रीघ वाढत होती. अवघ्या काही क्षणांच्या विश्रांतीनंतरही चेहऱ्यावर थकवा न जाणवू देणाऱ्या विष्णू मनोहर यांना त्यांच्या चाहत्यांचीसुद्धा तेवढीच साद मिळत होती. कुठे गाणी तर कुठे आणखी काही या माध्यमातून त्यांचा उत्साह कायम राखण्याचा प्रयत्न प्रत्येकजण आपापल्या परीने करत होते. विष्णू मनोहरांच्या साथीला चक्क गजानन महाराज धावून आले होते. कुकिंग मॅराथॉनसोबतच संत गजानन महाराजांचे अखंड पारायणसुद्धा सुरू आहे.

त्यामुळे रविवारी सायंकाळपर्यंत नागपुरातील खवैय्यांना त्यांच्या या विश्वविक्रमाचे साथीदार होण्याची संधी नक्कीच मिळणार असा विश्वास प्रत्येकाच्याच चेहऱ्यावर होता. मनोहरांच्या साथीला यावेळी गायनाचा रेकॉर्ड करणारे सुनील वाघमारे तसेच आणखी तिघे जण रेकॉर्डस्थळी पोहोचले. उद्या, रविवारी सायंकाळपर्यंत पूर्ण होणाऱ्या विष्णू मनोहरांच्या विश्वविक्रमाकडे अवघ्या नागपूरकरांचे डोळे लागले आहे.