गडकरी समर्थित कार्यकर्त्यांना डच्चू
पक्षात नाराजीनाटय़ सुरू
गेल्या अनेक दिवसांपासून पक्षांतर्गत वादामुळे रखडलेली भाजपची शहर कार्यकारिणीची अखेर घोषणा करण्यात आल्यानंतर कार्यकारिणीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे वर्चस्व असून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याशी संबंधित असलेल्या अनेक कार्यकर्त्यांंना डावलण्यात आल्याचे समोर आले आहे. विशेषत: माजी शहर अध्यक्ष, आमदार कृष्णा खोपडे यांच्या कार्यकारिणीत असलेल्या पूर्व नागपुरातील अनेक पदाधिकारी आणि काही प्रमुख कार्यकर्त्यांना डावलण्यात आल्यामुळे पक्षामध्ये नाराजीनाटय़ सुरू झाले आहे.
आमदार सुधाकर कोहळे यांची अध्यक्षपदी नियुक्ती झाल्यानंतर, गेल्या पाच महिन्यांपासून शहर कार्यकारिणीत कोणाला स्थान द्यावे आणि कोणाला डच्चू द्यावा यासाठी रस्सीखेच सुरू असतानाच काही आमदारांनी शहर कार्यकारिणीचा मुद्दा प्रतिष्ठेचा केला होता. शिवाय केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या समर्थकांना समान संधी मिळावी यासाठी प्रयत्न सुरू असतानाही गेल्या अनेक दिवसांपासून त्यावर एकमत होताना मात्र दिसत नव्हते त्यामुळे कार्यकारिणीची निवड लांबणीवर पडली होती. असे असताना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आलेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हिरवा सिग्नल दिला आणि रविवारी सायंकाळी शहर अध्यक्ष सुधाकर कोहळे यांनी कार्यकारिणी जाहीर केली.
जाहीर झालेल्या कार्यकारिणीत मात्र पूर्व नागपूर वगळता अन्य विधानसभा मतदारसंघातील कार्यकर्त्यांना संधी देण्यात आली आहे. त्यात मुख्यमंत्र्यांच्या निकटवर्तीय कार्यकर्त्यांंची संख्या जास्त आहे. यापूर्वी महामंत्री जाहीर करताना मुख्यमंत्र्यांशी संबंधित असलेले संदीप जोशी, संदीप जाधव, किशोर पालांदूरकर, भोजराज डुंबे यांची निवड केली आणि प्रमोद पेंडके, प्रभाकर येवले या वाडय़ाशी संबंधित असलेल्या पदाधिकाऱ्यांना डावलले तेव्हापासून पक्षांतर्गत कार्यकर्त्यांंमध्ये धूसफूस सुरू झाली होती.
महापालिकेत अपक्ष नगरसेवक असलेले परिणय फुके हे गेल्या दीड वर्षांपासून मुख्यमंत्र्यांशी सलगी साधून असताना त्यांनाही कार्यकारिणीत उपाध्यक्ष म्हणून स्थान देण्यात आले आहे. फुके हे महापालिकेत नागपूर विकास आघाडीमध्ये सहभागी असले तरी भाजपचे प्राथमिक सदस्य नसतानाही केवळ मुख्यमंत्र्यांच्या आग्रहामुळे त्यांना कार्यकारिणीत स्थान दिले असल्याची माहिती सूत्रांनी दिली. बजरंग दलमध्ये पदाधिकारी असलेले सुबोध आचार्य आणि श्रीकांत आगलावे यांना कार्यकारिणीत संधी दिली आहे. महापालिका निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर यावेळी आघाडय़ाची संख्या वाढविण्यात आली आहे. त्यात बुनकर, मच्छिमार, माजी सैनिक, ज्येष्ठ कार्यकर्ता, बेटी बचाव अभियान, प्रधानमंत्री मुद्रा योजना या आघाडय़ांचा समावेश आहे. या आघाडय़ाचे प्रमुख सुद्धा संघ आणि मुख्यमंत्र्याशी संबंधित आहेत.

भारतीय जनता युवा मोर्चाच्या अध्यक्षपदी मुख्यमंत्र्यांच्या समर्थक असलेल्या शिवानी दाणींना संधी देण्यात आली असताना युवा मोर्चाचे माजी अध्यक्ष आणि गडकरी यांचे समर्थक बंटी कुकडे यांना मात्र कार्यकारिणीत कुठेच स्थान देण्यात आले नाही. युवा मोर्चासाठी जितेंद्र ठाकूर, सुरेंद्र यादव, मनीष मेश्राम, कल्याण देशपांडे यांची नावे आघाडीवर होती. मात्र, यापैकी कोणाला भाजयुमोमध्ये स्थान देण्यात आले नाही. महिला मोर्चा अध्यक्ष म्हणून मुख्यमंत्री समर्थक नंदा जिचकार यांना संधी दिली आहे.

कार्यकारिणीत अनेक नव्या चेहऱ्यांना संधी दिली असून, सर्वच मतदारसंघातील कार्यकर्त्यांचा समावेश करण्यात आला आहे. जुन्या कार्यकर्त्यांना नव्या जबाबदाऱ्या देण्यात येणार असल्यामुळे पक्षात कुणाला डावलले जाणार नाही. परिणय फुके यांना संधी देण्यात आल्यामुळे त्यांनी निष्ठेने काम केले पाहिजे. फुके प्राथमिक सदस्य आहे की नाही ते बघावे लागेल. ज्या कार्यकर्त्यांना कार्यकारिणीत स्थान दिले नाही त्यांची नाराजी दूर करण्यात येईल.
गिरीश व्यास, प्रदेश प्रवक्ता