नागपूर पोलिसांच्या पाठीवर शाबासकीची थाप

स्वातंत्र्यपूर्व काळात पोलीस लोकांवर अत्याचार करून सत्तेपुढे नतमस्तक होण्यास भाग पाडत होते. आता मात्र, पोलिसांचेही काम केवळ कायदा व सुव्यवस्था सांभाळणे आहे. लोकांमध्ये कायद्याचा धाक निर्माण करण्यासाठी भूमाफियांसारख्या वाईट प्रवृत्तींचा बीमोड आवश्यक असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. यासंदर्भात नागपूर पोलिसांनी भूमाफियांविरुद्ध राबवलेल्या मोहिमेचेही त्यांनी कौतुक करीत त्यांची पाठ थोपटली.

पर्सिस्टंटच्या सभागृहात रविवारी झालेल्या पोलिसांच्या प्रगती पुस्तक अहवाल कार्यक्रमात मुख्यमंत्री बोलत होते. नागपुरात गेल्या काही दिवसांपासून नागपूर पोलिसांनी सामान्य नागरिकांना फसवून त्यांची जमीन हडपणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाईला सुरुवात केली आहे. यामुळे भूमाफियांवर वचक आणि सामान्य माणसाला दिलासा मिळाला आहे. या पाश्र्वभूमीवर या कारवाईचे मुख्यमंत्र्यांनी समर्थन केल्याने पोलिसांचेही मनोबल वाढण्याची शक्यता आहे.

२०१४ च्या तुलनेत २०१७ मध्ये पोलिसांची कामगिरी उंचावली आहे.  गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्य़ात घट झाली, गुन्हेशोध व गुन्हेसिद्धीचे प्रमाणही वाढले आहे. मात्र येथे थांबून चालणार नाही, तर कामगिरीचे सिंहावलोकन करून नव्या उमेदीने पुढे जावे लागेल. कामगिरीचा उंचावलेला आलेख खाली यायला नको. वर्तमान स्थितीत पोलिसांची जबाबदारी कायदा व सुव्यवस्था सांभाळण्याची आहे. त्यामुळे आता लोकांना पोलिसांच्या कर्तव्याची जाणीव होत असून लोकांमध्ये पोलिसांप्रती विश्वास वाढतो आहे,असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.