अ‍ॅड. मधुकर किंमतकर यांची खंत

आमदार होते तेव्हा फडणवीस नियमितपणे विदर्भाच्या अनुशेषावर चर्चा करण्यासाठी भेटत असत. आता मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांच्याकडे या विषयावर बोलायला वेळ नाही. ते नागपुरात आल्यावर आमदारांच्या प्रचार कार्यालयाच्या उद्घाटनासाठी जाऊ शकतात, मात्र विदर्भासाठी त्यांच्याकडे वेळ नाही, अशी खंत विदर्भाच्या अनुशेषाचे गाढे अभ्यासक व विदर्भ विकास मंडळाचे तज्ज्ञ सदस्य अ‍ॅड. मधुकर किंमतकर यांनी मंगळवारी व्यक्त केली.

ते येथे पत्रकार परिषदेत बोलत होते. किंमतकर हे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते असले तरी विदर्भाच्या अनुशेषाच्या मुद्यावर ते स्वपक्षीय सरकारवरही टीका करीत असत. त्यावेळी विरोधी पक्षात असलेले फडणवीस या मुद्यावर त्यांच्याशी नियमित चर्चा करीत असत. किंमतकर यांनी दिलेल्या माहितीच्या आधारावर ते विधानसभेतही हा प्रश्न लावून धरत असत. त्यातूनच त्यांची विदर्भवादी आमदार म्हणूनही प्रतिमा तयार झाली होती. किंमतकर आणि फडणवीस यांच्यात गुरु-शिष्याचे नाते आहे. त्यामुळेच सरकार बदलल्यावर फडणवीस यांनी विदर्भ विकास मंडळावर किंमतकर यांची नियुक्ती कायम ठेवली होती. मात्र, मधल्या काळात या दोघांमध्ये अनुशेषाच्या मुद्यांवरून दुरावा निर्माण झाल्याचे चित्र पुढे आले आहे.

हे सरकार सुद्धा राज्यपालांच्या निर्देशांकडे दुर्लक्ष करून न्यायालयाचा अवमान करीत आहे, असा आरोप अ‍ॅड. किंमतकर यांनी केला होता. नागपूरला गेल्यावर आपण अ‍ॅड. किंमतकर यांची भेट घेऊ, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले होते. याबाबत ते म्हणाले की, मुख्यमंत्र्यांकडे या प्रश्नावर चर्चा करण्यासाठी वेळ नाही. ते नागपुरात आल्यावर आमदारांच्या प्रचार कार्यालयाच्या उद्घाटनासाठी वेळ देतात. तेवढाच वेळ त्यांनी माझ्याशी चर्चा करण्यासाठी राखीव ठेवला, तर विदर्भाचे भले होईल, असेही ते म्हणाले.