गेल्या अनेक वर्षांमध्ये शिक्षणावर डाव्या विचारांचा प्रभाव असून अनेक विद्याशाखांवर तसे विचार थोपवण्यात ते काही प्रमाणात यशस्वी ठरले आहेत. मात्र, येथील मूळ शिक्षण आणि संस्कृतीवर आमचा विचार नसल्याची खंत व्यक्त करीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक प्रकारे भगवीकरणाचे समर्थन केले.

अखिल भारतीय राष्ट्रीय शिक्षण महासंघाच्या वतीने रेशीमबागेतील डॉ. हेडगेवार स्मारक समिती परिसरातील तीन दिवसीय त्रवार्षिक सहाव्या राष्ट्रीय अधिवेशनाचे उद्घाटक म्हणून ते बोलत होते. फडणवीस यांनी भारतातील जुनी शिक्षण पद्धत, इंग्रजांची आणि डाव्यांची शिक्षण पद्धत यावर ओझरता प्रकाश टाकला. वेगवेगळ्या विचारधारांच्या शिक्षण पद्धतीचा ऊहापोह करीत विद्यमान शिक्षण पद्धतीत मूल्य आणि संस्कृतीचा अंतर्भाव करणे कसे गरजेचे असल्याचे विशद केले.
आपल्या समस्यांच्या सोडवणुकीसाठी शिक्षण महत्त्वाचे आहे. हे शिक्षण देत असताना आपली मूल्ये, संस्कृती, सामाजिक मूल्ये विसरता कामा नये, असे आवाहन करीत असतानाच त्यांनी गेल्या अनेक वर्षांमध्ये शैक्षणिक धोरण, साहित्य, संस्कती आणि इतिहासाच्या निर्माण कार्यात आपले विचार काही प्रमाणात लादण्यात डावी विचारसरणी यशस्वी ठरली आहे. म्हणूनच शिक्षणात आणि संस्कृतीत आपले विचार येणे गरजेचे असल्याचे म्हणत त्यांनी शिक्षणाच्या भगवीकरणाचे एक प्रकारे समर्थन
केले.

गुलाम अलींच्या सेनाविरोधावर मुख्यमंत्र्यांचे मौन
शिवसेनेच्या विरोधामुळे पाकिस्तानी गझल गायक गुलाम अली यांचा कार्यक्रम रद्द करण्यात आलेला असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मात्र या विषयावर काहीच प्रतिक्रिया दिली नाही. गुलाम अली यांचा मुंबईत कार्यक्रम आयोजित करण्यात आल्यावर शिवसेनेने त्याला विरोध केल्यानंतर कला क्षेत्रासह सामाजिक आणि राजकीय क्षेत्रांतून मोठय़ा प्रमाणात टीका सुरू झाली आहे. मुंबईत शिवसेनेच्या विरोधानंतर दिल्ली आणि पश्चिम बंगाल सरकारने त्यांना निमंत्रण दिले असून त्यांचा भारतात कार्यक्रम करण्यावरून एकीकडे राजकारण सुरू झालेले असतानाच राज्यात आणि केंद्रात सत्तेत असलेल्या भाजपने मात्र मौन पाळले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नागपुरात आले असताना त्यांना या कार्यक्रमाला शिवसेनेच्या असलेल्या विरोधाबाबत विचारले असता त्यांनी त्या विषयावर काही बोलायचे नाही, असे सांगितले.