चार एकरावरील ७५ भूखंड हडपल्याचा प्रकार

एकदा विक्री करण्यात आलेल्या ४ एकर जागेची पुन्हा विक्री करून त्या ठिकाणी असलेले भूखंड हडपल्याची तक्रार लक्ष्मीरतन बिल्डर्सविरुद्ध विशेष तपास पथकाकडे (एसआयटी) करण्यात आली. विशेष म्हणजे, या प्रकरणात हुडकेश्वर पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. मात्र, कोणतीच कारवाई न करण्यात आल्याने एसआयटीने प्रकरण स्वत:कडे वर्ग करून घेतले.

बेसा येथे पहन क्रमांक ३८ अंतर्गत जुने खसरा क्रमांक ४/१ आणि नवीन खसरा क्रमांक ४२ अंतर्गत श्यामलाल मोतीलाल घाटे आणि त्यांच्या दोन बहिणींची नऊ एकर जमीन होती. क्राऊन को-हाऊसिंग सोसायटीने १९८६ मध्ये घाटे यांच्याकडून जमीन विकत घेतली.

त्या ठिकाणी लेआऊट मंजूर करून १७३ भूखंड पाडले. ते संस्थेच्या सभासदांना विकून त्यातून आलेल्या पैशातून प्रथम २ एकराचे विक्रीपत्र केले. त्यानंतर संस्था काळ्या यादीत गेल्याने उर्वरित जमिनीच्या विक्रीपत्राचे काम रखडले.

त्यामुळे संस्थेने मिलिंद को-ऑपरेटिव्ह गृहनिर्माण संस्थेशी सामंजस्य करार केला व ४ एकर जमिनीचे विक्रीपत्र करून दिले. या जागेवरील भूखंडांची विक्री क्राऊन आणि मिलिंद संस्थेच्या सदस्यांना करण्यात आली. अशाप्रकारे ६ एकराचे विक्रीपत्र करण्यात आले होते. १९८८ मध्ये क्राऊन संस्थेला काळ्या यादीतून काढण्यात आले व संस्थेने पुन्हा स्वत:च्याच नावाने विक्रीपत्र केले व स्वत:च्या सदस्याला भूखंड विकले.

अनेक वर्षे सदस्यांनी जागेवर घर बांधले नाही. त्यावेळी मिलिंद को-ऑपरेटिव्ह गृहनिर्माण संस्थेत मोठे फेरबदल झाले आणि १९८७ मधील कार्यकारिणीतील शाहीदराम उद्धवराव ढोरे यांच्याजागी संदीप विश्वलोचन जैनी आणि इतर पदाधिकारी निवडून आले.

दस्तावेजावर त्यांनी फेरफार करून पुन्हा क्राऊन संस्थेसोबत विकत घेतलेल्या जमिनीचा पुन्हा ताबा घेतला. त्या जागेवर सुरक्षा भिंत बांधली आणि ही जमीन लक्ष्मीरतन बिल्डर्सचे मालक सागर सत्यनारायण रतन यांना ४ कोटी रुपयांत विकली.

या प्रकरणात उत्तम माणिकराव पवार रा. मंगलदीपनगर यांच्या तक्रारीवरून हुडकेश्वर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला, परंतु हुडकेश्वर पोलिसांनी यात कोणतीही पावले उचलली नाही. त्यामुळे पवार आणि इतर सभासंदांनी एसआयटीकडे तक्रार केली. एसआयटीने हुडकेश्वरचा गुन्हा आपल्याकडे वर्ग करून घेतला असून तपास सुरू आहे.

सर्व व्यवहार कायदेशीर

या प्रकरणात आपल्याकडे सर्व दस्तावेज असून कोणताही गैरप्रकार झालेला नाही. यापूर्वी करण्यात आलेले सर्व व्यवहार बेकायदा आहेत. एसआयटीने विचारलेल्या प्रश्नांना आपण योग्य ते उत्तर सादर केले आहे. या जमिनीसंदर्भात आपले सर्व व्यवहार कायदेशीर आहेत.

– सागर रतन, संचालक, लक्ष्मीरतन बिल्डर्स