लॉन व एसी प्लँट बांधल्याचा आरोप

वर्धा मार्गावरील हॉटेल प्राईडने पाठीमागील ०.२१ हे.आर. जमीन बळकावली, अशी तक्रार जमीन मालकाने विशेष तपास पथकाकडे (एसआयटी) केली आहे. यामुळे संपूर्ण हॉटेल प्राईड समूह व्यवस्थापन हादरले असून गुन्हे शाखेने पाचारण करण्यापूर्वीच समूहाच्या उपाध्यक्षांसह दोन अधिकाऱ्यांनी गुरुवारी गुन्हे शाखेतील अधिकाऱ्यांची भेट घेतली.

जगदीश चंदनखेडे यांचे सोमलवाडा परिसरात १.२९ हे.आर. वडिलोपार्जित शेत होते. १९८९ मध्ये त्यांचे वडील व काकांनी ०.३८ आर शेतजमीन रुबी को-ऑपरेटिव्ह गृहनिर्माण सोसायटीला विकली होती. त्यानंतर सोसायटीने ती जमीन वर्धा मार्गावरील हॉटेल जॅक्सनला विकली होती. कालांतराने ते हॉटेल प्राईड समूहाने विकत घेतले. सध्या हॉटेल प्राईड वर्धा मार्गावर आहे.

वडील आणि काकांच्या मृत्यूनंतर जमिनीच्या अभिलेखावर जगदीश आणि त्यांच्या भावंडांचे नाव चढले. त्यानंतर २००६ मध्ये त्यांनी जमिनीची मोजणी केली असता हॉटेल प्राईडने त्यांच्या जमिनीतील ०.२१ हे. आर. जमीन बळकावल्याचे व त्या ठिकाणी लॉन व एसी प्रकल्प बांधल्याचे लक्षात आले. यासंदर्भात जगदीश यांनी भूखंड घोटाळ्याची चौकशी करणाऱ्या एसआयटीकडे तक्रार केली असून हॉटेलमालक व संबंधितांविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. या प्रकरणाचा तपास पोलीस उपायुक्त संभाजी कदम, सहाय्यक पोलीस आयुक्त सोमनाथ वाघचौरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक जुमडे करीत आहेत.

हॉटेल प्राईड समूहाविरुद्ध भूखंड बळकावण्याची तक्रार प्राप्त झाल्यानंतर हॉटेल प्रशासन हादरले आणि समूहाचे उपाध्यक्ष अतुल उपाध्यायसह दोन अधिकाऱ्यांनी गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांची भेट घेतली.

दस्तावेज सादर करू

आपण नियमित कामाकरिता नागपुरात आलो होतो व पोलीस दलातील मित्रांना भेटलो होतो. त्यावेळी गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी एका तक्रारीविषयी माहिती दिली. त्यासंदर्भात मुंबईतील मुख्यालयाला कळविण्यात आले असून लवकरच गुन्हे शाखेकडे सर्व दस्तावेज सादर करण्यात येतील. मात्र, कुणालाही जमिनीविषयी काही तक्रार असेल त्यांनी न्यायालयात जावे. पोलिसांकडे जाण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. मात्र, प्रतिक्रिया देण्यासाठी आपण योग्य व्यक्ती नाही. अधिकृत प्रतिक्रिया घेण्यासाठी आमच्या कार्मिक प्रशासन किंवा विधि विभागाशी संपर्क साधावा.

अतुल उपाध्याय, उपाध्यक्ष, हॉटेल प्राईड समूह.

तक्रारीवर चौकशी सुरू

हॉटेल प्राईडने भूखंड बळकावल्याची तक्रार प्राप्त झाली असून त्यासंदर्भात सर्व दस्तावेजांची चौकशी सुरू आहे. हॉटेल प्राईडच्या प्रशासनाला त्यांच्याकडील दस्तावेज सादर करण्यास सांगितले आहे. चौकशीनंतर योग्य ती कारवाई करण्यात येईल.

सोमनाथ वाघचौरे, सहाय्यक पोलीस आयुक्त.