मेडिकलमध्ये पहिला रोबोटिक शस्त्रक्रिया विभाग होणार

अत्यवस्थ रुग्णावर यांत्रिकी रोबोट गुंतागुंतीची शस्त्रक्रिया करतील तर डॉक्टर त्याला संगणकावरून सूचना देतील. हे स्वप्नवत वाटणारे चित्र लवकरच शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (मेडिकल) अस्तित्वात येणार आहे. जिल्हा नियोजन समितीने मेडिकलच्या रोबोटिक शस्त्रक्रिया विभागाला निधी देऊ केला असून तो सुरू झाल्यावर मेडिकल हे अशाप्रकारची शस्त्रक्रिया करणारे राज्यातील पहिले रुग्णालय ठरणार आहे.

मेडिकलमध्ये नेहमीच गुंतागुंतीच्या शस्त्रक्रिया होतात. उपचार घेणाऱ्यांत बहुतांश रुग्ण अल्प उत्पन्न गटातील असतात. या रुग्णांवर जागतिक दर्जाचा उपचार मिळावा म्हणून जिल्हा नियोजन समितीने रोबोटिक शस्त्रक्रिया विभाग तयार करण्याचे निश्चित केले. त्याकरिता मेडिकलला मंजूर केलेल्या २५ कोटी रुपयांतून निधी मिळणार आहे. विभाग सुरू झाल्यावर डॉक्टर रोबोटच्या मदतीने रुग्णांवर गुंतागुंतीच्या शस्त्रक्रिया करतील. मानवाच्या तुलनेत यांत्रिक रोबोट हा शरीरात ३६० डिग्री पर्यंत फिरतो. त्यामुळे गुंतागुंतीच्या शस्त्रक्रिया यशस्वीतेचे प्रमाण वाढते. यांत्रिकी पद्धतीने टाके लावण्याची प्रक्रिया सोपी होते. मेडिकलच्या बहुतांश लेप्रोस्कोपी पद्धतीच्या शस्त्रक्रिया यांत्रिकी पद्धतीने झाल्यास शस्त्रक्रियांची संख्याही वाढेल. या प्रक्रियेत डॉक्टर संगणकावरून रोबोटला सूचना करतात. हाताने केलेल्या शस्त्रक्रियेच्या तुलनेत ही शस्त्रक्रिया विशिष्ट प्रशिक्षणानंतर सोपी होते. या एका यांत्रिक रोबोटची किंमत सुमारे १५ ते १७ कोटींच्या घरात आहे. भारतात सध्या सुमारे १०० शस्त्रक्रिया करणारे यांत्रिक रोबोट असून ते बहुतांश मोठय़ा खासगी रुग्णालयांत आहे. शासकीय संस्थेपैकी केवळ एम्समध्ये हा रोबोट उपलब्ध आहे. नागपूरच्या मेडिकलमध्ये हा रोबोट आल्यास ही राज्यातील या पद्धतीचा विभाग असलेली पहिली संस्था असेल.

मेडिकलमध्येच ऑक्सिजनची निर्मिती

नागपूरच्या मेडिकल, मेयोसह राज्यातील १६ शासकीय वैद्यकीय महाविद्यालये व रुग्णालयांमध्ये मोठय़ा प्रमाणात रुग्णांकरिता ऑक्सिजनची गरज भासते. हा ऑक्सिजन खासगी कंत्राटदारांकडून घेतल्या जातो. नागपूरच्या मेडिकलमध्ये डीपीसीच्या निधीतून ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प तयार होणार आहे. त्यामुळे ऑक्सिजनची निर्मिती करणारी मेडिकल ही राज्यातील पहिली संस्था असेल.

जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून मेडिकलमध्ये यांत्रिक रोबोटिक शस्त्रक्रिया विभागाचे काम लवकरच सुरू होईल. यामुळे रुग्णांच्या गुंतागुंतीच्या शस्त्रक्रिया अचूक पद्धतीने होईल. राज्यात एकाही शासकीय संस्थेत हा विभाग नाही. त्यामुळे येथे उपचार घेणाऱ्या मध्य भारतातील गरीब रुग्णांना लाभ होईल.

डॉ. राज गजभिये, शस्त्रक्रिया विभागप्रमुख, मेडिकल, नागपूर.