सरकारविरोधात जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा

नोटाबंदीमुळे आर्थिक मंदी दाटून आली असून शेकडो लोकांचे रोजगार बुडत आहेत. यामुळे  जनतेचे हाल होत असल्याचा मुद्दा उपस्थित करून काँग्रेसने केंद्र सरकारच्या जनविरोधी धोरणाच्या विरोधात शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन केले. जिल्हाधिकारी कार्यालयाकडे जाणाऱ्या मार्गावरील वाहतूक बंद करण्यात आल्याने जिल्हा न्यायालय, जिल्हाधिकारी कार्यालय, तहसीलमध्ये येणाऱ्यांना त्रास सहन करावा लागला.

काँग्रेसच्या वतीने नोटाबंदीच्या निर्णयाविरोधात देशभर आंदोलन करण्याची रणनीती आखण्यात आली आहे. त्यातील पहिल्या टप्प्यात शुक्रवारी नागपुरात जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. काँग्रेस शहराध्यक्ष विकास ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस कार्यकर्ते, महापालिका निवडणुकीतील इच्छुक उमेदवार सकाळी ११ वाजतापासून गोळा झाले होते. हळूहळू कार्यकर्त्यांची संख्या वाढत गेली. त्यामुळे पोलिसांनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मुख्य प्रवेशाद्वारावर कठडे लावले. शहराध्यक्ष आणि काही कार्यकर्ते जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात तर उर्वरित कार्यकर्ते  कार्यालयासमोरील रस्त्यावर असे चित्र होते. माजी केंद्रीय मंत्री विलास मुत्तेमवार यांनादेखील कार्यालयात जाण्यासाठी मार्ग देण्यात आला नाही. त्यामुळे त्यांना सुरक्षा भिंतीवरून उडी मारून जावे लागले. त्यांच्या मदतीला कार्यकर्ते आले होते. कार्यकर्त्यांच्या हातात काँग्रेसचे झेंडे होते. मोदी सरकारविरोधात घोषणा सुरू होत्या. नोटाबंदीचा निर्णय जनविरोधी असून ‘मोदी मुर्दाबाद’ अशा घोषणा देण्यात येत होत्या. ठाकरे आणि मुत्तेमवार यांनी जिल्हाधिकाऱ्यांना मोदी सरकारच्या विरोधात निवेदन दिले. त्यानंतर हे दोन्ही नेते सेंट ऊर्सुला शाळेजवळपर्यंत चालत आले आणि तेथे कार्यकर्त्यांचे आभार मानले.

मोदी सरकारची अडीच वर्षांची कारकीर्द ही अतिरंजित राष्ट्रवाद, झुंडशाहीला प्रोत्साहन देणारी राहिली असून नोटाबंदीच्या निर्णयाने सामान्य माणसाला उद्ध्वस्त केले आहे. यापुढेही विविध प्रकारे आंदोलन करण्यात येणार आहेत. यासाठी जिल्हास्तरावर ज्येष्ठ नेत्यांच्या नेतृत्वात प्रचार व अंमलबजावणी समित्या स्थापन करण्यात आल्या आहेत, असेही शहराध्यक्ष विकास ठाकरे म्हणाले.

मोदींचा पुतळा दहन, जोडय़ाचा मार

ाोटाबंदीच्या निर्णयामुळे संघटित कामगार, छोटे व्यापारी, फळ, भाजीपाला विक्रेते यांचे हाल होत आहे. शेतमालाचा भाव पडला आहे. याशिवाय नोटाबंदीमुळे आर्थिक मंदीसारखी स्थिती निर्माण झाली असून अनेक उद्योजक नोकरदारांची संख्या कमी करत आहे. यामुळे बेरोजगारीचे संकट कोसळले आहे. याविरोधात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर काँग्रेस कार्यकर्त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा पुतळ्याचे दहन केले, जोडय़ांनी मारले आणि असंतोषाला वाट मोकळी करून दिली.

‘पंतप्रधानांच्या निर्णयामुळे आतापर्यंत देशात अशा प्रकारची आपत्ती कधी आलेली नाही. मोदींच्या निर्णयाच्या आपत्तीत १५७ लोकांचे बळी गेले आहेत. काळा पैसा बाहेर काढण्यासाठी निर्णय घेतल्याचे सांगण्यात येत असलेतरी या निर्णयाचा त्रास काळा पैसा असणाऱ्यांना नव्हे १३६ कोटी लोकांना त्रास होत आहे. त्यांना दिलासा देणारे निर्णय घेणे अपेक्षित आहे. परंतु सरकार त्यावर काही पावले टाकत असल्याचे दिसत नाही. यापुढे आंदोलन सुरूच राहील.’

विलास मुत्तेमवार, माजी केंद्रीय मंत्री.