काँग्रेसचा पराभव नेहमी काँग्रेसच करते, हे वाक्य फार अनादी काळापासून प्रसिद्ध आहे. या वाक्याची आठवण करून देण्याचे काम या पक्षाचे नेते सतत करत असतात. या नेत्यांची कृती अथवा वर्तनच असे असते की, हमखास या वाक्याची आठवण येते. आता पुन्हा हे वाक्य आठवण्याचे कारण नुकतीच या पक्षाच्या दोघांमध्ये विमानतळावर झालेली हाणामारी. विमानाने प्रवास करणारे लोक अतिशय सभ्य व सुसंस्कृत असतात, हा समज या दोघांनी सर्व प्रवाशांसमोर एकमेकांना मारहाण करून खोटा ठरवला. समस्त प्रवासीजगताला या वास्तवाचे भान आणून दिल्याबद्दल खरे तर शहर काँग्रेसचे अध्यक्ष विकास ठाकरे व कंत्राटदार व या पक्षाचे एक कार्यकर्ते नरू जिचकार यांचे आभारच मानायला हवे. या दोघांच्या हाणामारीने या उपराजधानीत पक्ष जिवंत आहे, असा संदेश सर्वत्र गेला.
येत्या वर्षभरात महापालिकेची निवडणूक होणार आहे. यात सतत पराभवाचा धक्का सहन करावा लागणाऱ्या काँग्रेसमध्ये यावेळी उमेदवारीसाठी गर्दीच राहणार नाही, असे विरोधकांना वाटायला लागले होते. या मारामारीने असे काहीही घडणार नाही. उलट, काँग्रेसमध्ये उमेदवारीसाठी रस्सीखेच असेल, असा संदेश सर्वत्र गेला. कारण काय तर, ही हाणामारी पाच वर्षांपूर्वी झालेल्या उमेदवारी वाटपाच्या वादातून झाली. राजकारणी किती दीर्घद्वेषी असतात, याचे दर्शन ठाकरे व जिचकार या दोघांनी करून दिल्याबद्दल खरे तर त्यांचे आभारच मानायला हवे. राजकारण्यांमधला हा गुण अनेकांना या निमित्ताने नव्याने कळला. या दोघांनी आणखी एक पराक्रम केला. आजवर किमान महाराष्ट्रात तरी काँग्रेसचे नेते विमानतळावर या पद्धतीने भांडले नव्हते. तसेही मारामारीच्या संस्कृतीत हा पक्ष इतरांच्या तुलनेत थोडा मागेच आहे. मात्र, या दोघांनी विमानतळाचा आखाडा बनवून या जागी सुद्धा भांडता येते, हे पक्षातील सर्वाना दाखवून दिले. केवळ नारे देण्यासाठी, नेत्यांच्या कानाला लागण्यासाठी, घाईघाईत दिल्ली गाठणाऱ्या पक्षश्रेष्ठींच्या हातात बायोडाटा कोंबण्यासाठी या जागेचा वापर आजवर काँग्रेसचे लोक करीत होते. आता येथेही एकमेकांना मारता येऊ शकते, हे या दोघांनी पक्षातील साऱ्या मनगटवान कार्यकर्त्यांच्या लक्षात आणून दिले. त्यामुळे विमानतळाच्या सुरक्षा व्यवस्थेवर भविष्यात नक्कीच ताण पडणार, हे नक्की.
या घटनेला कारणीभूत असलेली पक्षातील गटबाजी, एकमेकांना पाडणे, तिकीट कापणे हे प्रकार स्थानिक नेत्यांना नवे नाहीत. सत्ता मिळाली नाही तरी चालेल, पण पक्षांतर्गत विरोधकाला वर उठू देणार नाही, अशी प्रतीज्ञा करूनच या पक्षाचे नेते घराबाहेर पडत असतात. पक्षात सक्रिय असलेल्या कुणासाठीही हे नवीन नसल्याने अनेकांनी हा त्रास सहन करण्याची सवय लावून घेतली आहे. या दोघांनाही ही सवय निश्चित असायला हवी होती, पण तरीही ते एकमेकांच्या अंगावर का उठले, हा या पक्षाच्या सच्च्या नेत्यांना पडलेला प्रश्न आहे. मारामारी करायचीच होती, तर ती आधीच करायला हवी होती. आता निवडणूक तोंडावर असतानाच अचूक टायमिंग साधायची गरज काय, हाही प्रश्न या पक्षाच्या नेत्यांना सतावत आहे. नुकतीच सोनिया गांधींची सभा यशस्वी झाली. भाजपची मातृभूमी असलेल्या या शहरात मिळालेले हे यश साजरे करण्याच्या व त्यातून येत्या निवडणुकीतील विजयाचे इमले रचणाऱ्या नेत्यांच्या स्वप्नात खोडा घालण्याचे काम या मारामारीने केले. वारंवार पराभव होऊन सुद्धा पक्षात मारामारी होते, हे पक्ष जिवंत असल्याचे लक्षण आहे, असा सकारात्मक अर्थ यातून घेणारे महाभाग या पक्षात आहेत. मात्र, या महाभाग नेत्यांचे दुर्दैव असे की, सामान्य जनता अशा अर्थाने या घटनेकडे बघत नाही. सामान्य जनतेच्या मनाची काळजी वाहणारे फार कमी नेते या पक्षात शिल्लक राहिले आहेत. त्यामुळेच या घटनेचा आनंद झालेल्या नेत्यांची संख्या भरपूर निघाली.
विमानतळावरच्या या प्रकारानंतर या पक्षातील अनेकांनी एकमेकांना दूरध्वनी करून बरे झाले, असे म्हणत आनंदयुक्त समाधानाचे सुस्कारे सोडले. यातून एकच स्पष्ट झाले की, काँग्रेसला विरोधकाची गरज कधीच नसते. ज्यांच्याशी लढायचे आहे, निवडणुकीत दोन हात करायचे आहेत, त्यांच्यावर तुटून पडण्यासाठी या पक्षाच्या नेत्यांकडे वेळच नाही. पक्षातील विरोधकांना संपवण्यासाठी हे नेते सारी शक्ती पणाला लावत असतात.
गेल्या काही वर्षांतील स्थानिक नेत्यांची कामगिरी बघितली तर हे सहज लक्षात येते. सोनिया व राहुल गांधी येथे येऊन संघ व भाजपवर आक्रमक हल्ला करणार आणि स्थानिक नेते कट्टर डावा असलेल्या कन्हैयाकुमारच्या सभेत बसून टाळ्या वाजवणार, हे येथील पक्षाचे वास्तव आहे. कन्हैयाला कितीही खांद्यावर घेतले तरी फायदा मिळणार नाही, हे राजकारणातील साधे व्यवहारज्ञान या नेत्यांना ठावूक नसावे, हे आश्चर्यच आहे. मुळात सत्ताधारी विरोधकांशी लढण्याची शक्तीच या नेत्यांमध्ये नाही. त्यामुळेच कन्हैयासमोर टाळ्या आणि पक्षात मारामारी झाली की आनंद, अशी वृत्ती या पक्षात बळावत चालली आहे. विरोधकांच्या पथ्यावर पडणाऱ्या या गोष्टींबद्दल खरे तर भाजप नेत्यांनी शहरातील तमाम काँग्रेस नेत्यांना धन्यवाद द्यायला हवे. स्वत:तच मश्गूल असणारे एवढे चांगले विरोधक शोधूनही सापडत नाही हो!
देवेंद्र गावंडे – devendra.gawande@expressindia.com