शहर कार्यकारिणीवरून माजी मंत्री विलास मुत्तेमवार आणि शहराध्यक्ष विकास ठाकरे यांच्याविरोधात उघडलेल्या मोहिमेची काँग्रेस पक्षश्रेष्ठींनी अजिबात दखल न घेतल्याने माजी मंत्री सतीश चतुर्वेदी, नितीन राऊत आणि अनीस अहमद यांची नांगी ठेचल्या गेली आहे.

महापालिका निवडणूक समोर असताना शहरातील स्थानिक नेत्यांमध्ये कार्यकारिणीवरून भेदभाव झाले होते. मुत्तेमवार गटाच्या विरोधात दिल्लीत आणि केंद्रातही या नेत्यांनी प्रयत्न केले. पक्षाने मात्र महापालिका निवडणुकीत शहराध्यक्षांना अधिक मोकळीक मिळावी म्हणून एका नेत्याला गुजरातमधील नोटांबदीच्या आंदोलनात उतरवले, तर दुसऱ्या एका नेत्याला उत्तराखंडच्या निवडणुकीत प्रचारात गुंतवले आहे. आणखी एक माजी मंत्री शांत राहून योग्य संधीची वाट पाहत आहे. प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण हे शहराध्यक्षांच्या पाठीमागे गंभीर उभे असल्याने शहरातील तीनही माजी मंत्र्यांची गोची झाली आहे. यामुळे शहर कार्यकारिणीच्या निमित्ताने मुत्तेमवार गटावर कार्यकर्त्यांच्या माध्यमातून हल्लाबोल करणारे हे नेते वरवर शांत दिसत आहेत. गेल्या चार महिन्यात शहर काँग्रेसच्या कोणत्याही कार्यक्रमाला हजेरी न लावणारे नेते इच्छुकांच्या मुलाखतीसाठी देवडिया भवनात आले. त्यांच्या कार्यकर्त्यांनी देखील इच्छुक म्हणून शहर काँग्रेसकडे अर्ज केले. अशाप्रकारे माजी मंत्री राहिलेल्या तीनही नेत्यांना एका लाईनमध्ये प्रदेशाध्यक्षांनी उभे करण्याचे धाडस दाखवले आहे. दुसरीकडे शहराध्यक्षांनी महापालिका निवडणुकीच्या तयारीत युवकांचा सहभाग वाढला असून स्थानिक नेत्यांच्या कोणत्याही कुजबुजीकडे लक्ष न देण्याचे धोरण स्वीकारले आहे. विधानसभा निहाय समिती, ब्लॉक समित्या स्थापन करून कार्यकर्त्यांनी प्रचार करण्याच्या सूचना दिल्या आहेत. एका जागेसाठी अनेक इच्छुक आहेत. या सर्वाना पक्षाचा प्रचार करण्यास सांगितले. त्यानुसार प्रचाराची पहिली फेरी देखील ओटोपली आहे. सहा विधानसभा मतदारसंघातील पोलखोल अभियान पूर्ण झाले. दुसरीकडे शहर काँग्रेसच्या विरोधात असलेल्या माजी मंत्र्यांच्या गटात प्रचंड अस्वस्थता आहे. शहराध्यक्षांच्या कामाची शैली आणि प्रदेशाध्यक्षाचा वरदहस्त यामुळे कुणीही त्यांच्याविरोधात सध्यातरी बोलू इच्छित नाही. काँग्रेसने लोकमंचशी आघाडी करण्याचा निर्णय घेतला आहे. शिवाय काही दिवसात आणखी काही पक्ष काँग्रेससोबत येण्याची शक्यता आहे. यामुळे काँग्रेसमधील युवक इच्छुकांना पुन्हा संधी हुकते की काय असे वाटू लागले आहे. काही प्रभागात काँग्रेसचे विद्यमान नगरसेवक समोरासमोर आले आहेत. त्यातूनही मार्ग काढताना शहराध्यक्षांची कसोटी लागणार आहे. प्रदेशाध्यक्षांनी शहरातील त्यांच्या विरोधकांना परराज्यात पाठवून शहराध्यक्षांची डोकेदुखी कमी केली आहे. माजी मंत्री नितीन राऊत यांना नोटाबंदीच्या विरोधातील ‘पॅन इंडिया’ अभियानात समन्वयक म्हणून पाठवले आहे. राऊत सध्या अहमदाबादमध्ये आहेत. उत्तराखंड निवडणुकीच्या प्रचारात माजी मंत्री अनीस अहमद यांना समन्वयक म्हणून नियुक्त केले आहे. यामुळे हे दोन्ही नेते जानेवारी-फेब्रुवारी महिन्यात व्यस्त राहणार आहेत. नागपूर महापालिका निवडणुकीचे उमेदवारी अर्ज भरण्याची २७ जानेवारीला सुरुवात होत आहे.

शहराध्यक्षांना मोकळीक

प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी शहराध्यक्षांना मोकळीक दिली असली तरी काही प्रभागात काँग्रेसचे विद्यमान नगरसेवक समोरासमोर आले आहेत. त्यातूनही मार्ग काढताना त्यांची कसोटी लागणार आहे. माजी मंत्री नितीन राऊत यांना गुजरातला आणि अनिस अहमद यांना उत्तराखंडला पाठवून पक्षाने शहराध्यक्षांची डोकेदुखी कमी केली आहे. माजी मंत्री नितीन राऊत यांना नोटाबंदीच्या विरोधातील ‘पॅन इंडिया’ अभियानात समन्वयक म्हणून पाठवले आहे. अनिस अहमद हे उत्तराखंड निवडणुकीतील प्रचाराचे समन्वयक आहेत.