महापालिका निवडणुकीत फटका बसण्याची शक्यता
काँग्रेस सलग दहा वर्षे महापालिकेत सत्तेपासून वंचित असून निवडणूक काही महिन्यांवर आलेली असताना त्यांचे नेते आणि पदाधिकारी भांडून अंर्तगत वाद चव्हाटय़ावर आणण्यात व्यस्त असल्याने त्याचा फटका पक्षाला बसण्याची शक्यता आहे.
लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत पराभूत झाल्यानंतर शहरातील नेत्यांनी एकत्र आल्याचे चित्र निर्माण करायला सुरुवात केली होती. शहरातील सर्व प्रमुख नेते एकजूट दाखवत असल्याने पक्षात सकारात्मक संदेश जात आहे, पण पक्षात अजूनही धुसफूस असल्याचे विमानतळावर घडलेल्या घटनेने दाखवून दिले आहे. काँग्रेसला गटबाजी काही नवीन नाही. माजी केंद्रीय राज्यमंत्री विलास मुत्तेमवार आणि माजी पालकमंत्री सतीश चतुर्वेदी यांच्यातील वर्चस्वाच्या लढाईमुळेच महापालिकेच्या एका निवडणुकीत पक्षाचे चिन्हे गोठवण्यात आले होते. परंतु त्यावेळी पक्षाची स्थिती मजबूत होती. महापालिकेत, राज्य आणि केंद्रातही काँग्रेस सत्तेत होते. आता पक्षाची परिस्थिती बदलली आहे. महापालिका, राज्य आणि केंद्रातही पक्ष सत्तेत नाही. अशावेळी पक्षातील नेते, पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी एकजुटीने पक्षासाठी कार्य करणे अपेक्षित असताना जुने मुद्दे उकरून काढून वादावादी केली जात आहे. पक्षातील हे वाद वेळीच मिटवल्या न गेल्यास पुढील वर्षी फेब्रुवारीत होऊ घातलेल्या महापालिकेच्या निवडणुकीत त्याची किंमत मोजावी लागण्याची शक्यता आहे.
लोकसभा आणि विधानसभेत दारुण पराभव झाल्यानंतर ‘बॅक फूट’वर गेलेल्या काँग्रेसला स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतील विजयाने सावरले. नागपूर आणि विदर्भात काँग्रेसला संधी असल्याचे वातावरण निर्माण होत असताना अचानक पक्षांर्तगत कुरघोडीला प्रारंभ झाला आहे. विकास ठाकरे यांच्याकडे शहराध्यक्ष आणि महापालिकेतील विरोधी पक्षनेतेपद आहे. विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात काढण्यात आलेला मोर्चा आणि सोनिया-राहुल गांधी यांची जाहीर सभा यशस्वी झाल्याचे श्रेय शहराध्यक्ष म्हणून ठाकरे यांना गेले आहे. महापालिके च्या आगामी निवडणुका त्यांच्या नेतृत्त्वात लढल्या जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे पक्षातील त्याचे विरोधक सक्रिय झाले आहेत. महापालिका निवडणुकीचे सूत्र ठाकरे यांच्याकडे राहिल्यास आपल्याला फारसे गांर्भीयाने घेतले जाणार नाही, याची भीती विरोधकांना आहे. यामुळे विमानतळावरील घटनेचा वापर ठाकरे यांचे विरोधक करीत आहेत. निवडणूक काही महिन्यांवर असताना हा वाद गाजत असल्याबद्दल भाजपच्या गोटात आनंदाच्या उकळ्या येत आहेत. भाजपच्या कार्यकर्त्यांकडून या प्रकरणाविषयी वॉट्सअप आणि लघुसंदेश परसवण्यात येत आहे. या प्रकरणाला अधिक हवा कशी मिळेल, हे त्यांच्याकडून बघितले जात आहे.

‘पंजा’ का गोठवला गेला?
काँग्रेस पक्षाचे चिन्ह गोठवण्यात आल्याचा मुद्दा काँग्रेसचे शहराध्यक्ष विकास ठाकरे आणि पक्षाचे कार्यकर्ता नरेंद्र जिचकार यांच्यात विमानतळावर झालेल्या शाब्दिक चकमकीत पुढे झाला होता. काँग्रेसने २००७ च्या महापालिका निवडणुकीत उमेदवारी वाटपात घोळ घातला होता. एका वॉर्डातून एकापेक्षा अधिक उमेदवारांकडे बी फार्म होते. त्यावेळी १३५ वॉर्ड होते. त्यापैकी ११ वॉर्डात एका पेक्षा अधिक उमेदवाराला बी फार्म वाटप करण्यात आले. माजी केंद्रीय राज्यमंत्री विलास मुत्तेमवार आणि माजी पालकमंत्री सतीश चतुर्वेदी यांच्यामध्ये आपापल्या समर्थकांना अधिकाधिक बी-फार्म वाटण्याचे प्रयत्न होते. तत्कालीन प्रदेशाध्यक्ष प्रभा राव यांनी आपण पाठवलेली यादी ग्राह्य़ धरावी, असे निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना कळवले होते. परंतु त्यांची यादी निर्धारित वेळेत पोहचली नव्हती. त्यामुळे निवडणूक आयोगाने काँग्रेसचे चिन्ह गोठवले होते. याचा फटका काँग्रेसला बसला आणि काँग्रेसला १३५ पैकी ३३ जागा मिळाल्या होत्या.

Congress, Tribute, Ashok Chavan, wardha congress committee
अशोक चव्हाण यांना श्रद्धांजली? काँग्रेस कार्यालयात धक्कादायक…
Baramati Namo MahaRojgar Melava
बारामतीमधील शासकीय कार्यक्रमासाठी शरद पवारांना पहिल्यांदा डावललं; सुप्रिया सुळे म्हणाल्या…
tejasvi surya marathi news, tejasvi surya nagpur marathi news
“मोदींमुळे बेरोजगार झालेल्या काँग्रेस नेत्यांकडूनच बेरोजगारीवर बोंबाबोंब”, तेजस्वी सूर्या म्हणाले…
narendra modi and sharad pawar
काँग्रेसच्या काळात एका रुपयाचे  १५ पैसे व्हायचे, आता मी एक बटण दाबले आणि…; पंतप्रधान माेदींकडून शरद पवार यांचे नाव न घेता टीका