राज्यात सत्तापालट होऊन वर्षभराचा काळ उलटला. विरोधी पक्षात असलेले भाजप नेते सत्तेत स्थिरावत असले तरी तब्बल १५ वष्रे सत्ताधारी असलेल्या काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या काही मातब्बर माजी मंत्र्यांना अजून विरोधी पक्षात असल्याप्रमाणे वागण्याची सवय झालेली नाही. सभागृहात गोंधळ घालून कामकाज बंद पाडणे, विधिमंडळाबाहेर घोषणाबाजी, प्रसिध्दीमाध्यमांमधून हल्लाबोल, मोच्रे काढणे,आरोप करणे, हे तंत्र अजून काँग्रेस-राष्टवादी काँग्रेसच्या सदस्यांना जमलेले नाही. त्यामुळे सभागृहात गोंधळ सुरु असला तरी काही ज्येष्ठ माजी मंत्री आपल्या जागेवरच बसून किंवा उभे राहतात. पण आपली जागा सोडत नाहीत. त्यामुळे सभागृहात विरोधकांचा गोंधळ सुरु असतानाच प्रश्नोत्तरे व लक्षवेधी सूचनांचे कामकाज रेटण्यात आले. शिवसेनेचे गुलाबराव पाटील व अन्य सत्ताधारी सदस्यांचा आवाज विरोधकांपेक्षाही जोरात होता.
सभागृहाबाहेरही विरोधकांनी सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली, तरी त्यात रोज वेगळे तंत्र वापरायचे असते, हे विरोधकांना तितकेसे जमलेले नाही. भाजप-शिवसेना विरोधी पक्षात असताना त्यांनी ते बरेच साध्य केले होते. त्यांना सत्ता मिळाल्याने विधिमंडळ परिसरातील छायाप्रत (फोटोकॉपी) काढणाऱ्याचा धंदाही नीट चालत नाही, असे आपल्याला या व्यावसायिकांनी सांगितल्याचा किस्सा एका मातब्बर माजी मंत्र्याने ऐकविला. त्यातून सध्याची परिस्थिती पुरेशी स्पष्ट होते. त्यादृष्टीने विरोधकांनी फडकावलेल्या फलकांवरची एक घोषणाही पुरेसी बोलकी होती. अच्छे दिन छोड दो, पुराने दिन लौटा दो.भाजपने लोकांना फसविले असल्याचे दाखवून देण्याचा विरोधकांचा त्यात उद्देश असला तरी विद्यमान परिस्थितीत विरोधकांची मनस्थितीही त्यातून समजू शकते. सत्तेबाहेर राहण्याची सवय आताच्या विरोधी पक्षाच्या नेत्यांना नाही. त्यामुळे विरोधकांचे अच्छे दिन कधी येतील, याची ते आतुरतेने वाट पहात असावेत. सत्तेबाहेर राहणे हे किती अवघड आहे, हे त्यांच्या देहबोलीतूनही जाणवत आहे.