विधानभवन परिसरात मोर्चा व जोरदार निदर्शने

चलनातून जुन्या ५०० व १००० रुपयांच्या नोटा बाद करण्याच्या निर्णयाला एक महिना लोटल्यावरही सर्वसामान्यांचे हाल होत आहेत. नोटबंदीने ८८ नागरिकांचा मृत्यू झाला असून काळा पैशातील एकही रुपया बाहेर आला नसल्याचा आरोप करत काँग्रेसच्या सगळ्याच आमदारांनी विधानभवनाच्या प्रवेशद्वारातून विधिमंडळ सभागृहाच्या पायरीपर्यंत मोर्चा काढून जोरदार निदर्शने केली. सामान्यांची परिस्थिती बिघडल्यामुळे हा दिवस काळा दिवस म्हणून साजरा करत असून काळ्याफिती लावून त्यांनी आंदोलन केले.

काँग्रेसच्या दोन्ही सभागृहातील आमदारांनी विधानभवनाच्या प्रवेशद्वारात जमून विविध घोषणा असलेली फलके घेऊन विधानभवनाच्या पायरीपर्यंत मोर्चा काढला. याप्रसंगी ‘चलनबंदी उठली लोकांच्या जीवावर, सांगा अनेकांच्या मृत्यूस जवाबदार कोण’, ‘रद्द झाल्या आमच्या नोटा, शासन निर्णय तुमचा खोटा’, ‘शेतीमालाचे व्यवहार झाले ठप्प, अच्छे दिनवाले आता का गप्प’, ‘अच्छे दिनो के इंतजार मे, जनता खडी कतार मे’, ‘कापूस-सोयाबीनसह शेतमालाला भाव न देणाऱ्या सरकारचा धिक्कार असो’, ‘गोर-गरीबांच्या मुला-मुलींचे लग्न मोडणाऱ्या सरकारचा धिक्कार असो’, ‘फेकू, बोलबच्चन देणाऱ्या हिटलर सरकारचा धिक्कार असो’ असे नारे आमदारांनी लीवले. या आंदोलनात माजी मुख्यमंत्री नारायम राणे, पृथ्वीराज चव्हाण, संजय दत्त, वर्षां गायकवाड, प्रणिती शिंदे, यशोमती ठाकूर, नितेश राणे यांच्यासह बरेच आमदार सहभागी झाले होते.

महिलांना सरकार दागिने देणार काय -नारायण राणे

चलन तुटवडय़ामुळे अनेकांच्या मुलेमुलींचे लग्न मोडले आहे. सरकारकडून आता महिलांनी किती दागिने घालावे, हे ठरवण्याचा प्रकार सूरू असून ते सरकार देणार काय? हा प्रश्न उपस्थित होतो. सरकारच्या या निर्णयाचा काँग्रेस धिक्कार करते, असे मत माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी व्यक्त केले.

बनावट नोटांबाबत हमी घेणार काय?- पृथ्वीराज चव्हाण

केंद्र सरकारच्या नोटाबंदीमुळे काळा स्वरूपातील एक रुपयाही बाहेर आला नाही. तेव्हा सरकारने या विषयावर बोलणे बंद करत आता अतिरेक्यांचा पैसा रोखण्यासह नकली चलनावर उपाय मिळणार असल्याचे दाखले देणे सुरू केले आहे, परंतु काही दिवसातच दोन हजारांसह इतरही नवीन बनावट नोटा काही ठिकाणी आढळल्या आहेत. तेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पाकिस्तानात नवीन नकली नोटा छापल्या जाणार नसल्याची हमी घेणार काय? हा प्रश्न माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केला.

आझमी-गोटे यांच्यात शाब्दिक चकमक

नागपूर : विधिमंडळाच्या सभागृहात विविध विषयांवर दोन लोकप्रतिनिधींमध्ये शाब्दिक वाद नेहमीच बघायला मिळतात. परंतु प्रसिद्धी माध्यमांच्या कॅमेऱ्यापुढे असे प्रसंग क्वचितच घडतात. गुरुवारी विधानभवनाच्या पायरीवर समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी आणि भाजपचे आमदार अनिल गोटे यांच्यात डॉ. झाकीर नाईक यांच्या विषयावरून वाद झाला.  समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांनी विधानसभेत मुस्लीम धर्मोपदेशक डॉ. झाकीर नाईक याच्यावर लावण्यात आलेली बंदी अयोग्य असल्याचा मुद्दा मांडला. त्यावर भाजपचे आमदार अनिल गोटे यांनी आक्षेप घेतला. घटनेनंतर दोन्ही मान्यवर सभागृहाबाहेर पडले. दोघांनी प्रसिद्धी माध्यमांसमोर आपापले म्हणणे मांडले. त्यानंतर अबू आझमी व अनिल गोटे यांच्यात शाब्दिक चकमक सुरू झाली. देशविरोधी कृत्यात सहभागी असलेल्या व्यक्तीचे समर्थन करणे योग्य नसल्याचे गोटे यांनी आझमी यांना सुनावले, तर डॉ. नाईक याच्या संस्थेकडून चालविण्यात येणाऱ्या शाळेतील १०० मुलांवर उपासमारीचे संकट ओढवल्याचे आझमी म्हणाले. त्यावर गोटे यांनी, तुम्हाला एवढेच असेल तर त्या विद्यार्थ्यांना सुविधा उपलब्ध करा, असा टोला लगावला. त्यावर आझमींनी गोटे यांना तेलगी प्रकरणात तुम्हीच ४ वर्षे तुरुंगात असल्याची आठवण करून दिली. त्यावर गोटे यांनी आमचे कृत्य देशविरोधी नसून तुमचे कृत्य त्यात मोडत असल्याचे सांगितले.

समृद्धी महामार्गाविरोधात निदर्शने

नागपूर : मुंबई-नागपूर समृद्धी महामार्ग प्रकल्प शेतकऱ्यांना उद्ध्वस्त करणारा आहे. शासनाने तातडीने तो रद्द करून पूर्वीच्या चौपदरी महामार्गाला आठपदरी करावे, या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार पांडुरंग बरोरा यांच्यासह इतर आमदारांनी विधानभवनाच्या पायरीवर गुरुवारी जोरदार निदर्शने दिली.

मुंबई-नागपूर समृद्धी महामार्ग शेतकऱ्यांना परवडणारा नाही. या प्रकल्पामुळे सुमारे ३ हजार शेतकरी विस्थापित होणार असून, त्यांच्या ४ हजार ५०० एकरहून जास्त जमिनी जाणार आहेत. त्यातच या शेतकऱ्यांना त्यांच्या जागेच्या बदल्यात भरपाई म्हणून नवीन लॅन्ड पुलिंग कायदा करण्यात आला आहे. त्यात शेतकऱ्यांना फसव्या पद्धतीने या प्रकल्पाचा भागीदार करून त्यांना पुढे वाऱ्यावर सोडण्याची शक्यता नाकारता येत नाही, असा आरोप पांडुरंग बरोरा यांनी केला. याप्रसंगी आमदार वैभव पिचड, कुलदीप नाईक, हनुमान डोळस, नरहरी झिरवड, रामराव पडकुटे उपस्थित होते.