बंडखोरी टाळण्यासाठी काँग्रेस पक्षाची योजना

महापालिका निवडणुकीत पक्षातील असंतुष्ट इच्छुकांना बंडखोरी करण्याची संधी मिळू नये म्हणून काँग्रेस ‘एबी फॉर्म’ उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी वाटप करणार आहे.

काँग्रेसच्या उमेदवारीसाठी काही प्रभागात अनेक इच्छुक पुढे आले आहेत. याशिवाय इतर पक्षातून काँग्रेसमध्ये आलेले नगरसेवक आणि काही सक्षम उमेदवार यांच्यामुळे काँग्रेसमधील इच्छुकांनी इतर पक्षाकडून निवडणूक लढवण्याचा पर्याय खुला ठेवला आहे. याशिवाय काही प्रभागात पक्षाचे दोन विद्यमान नगरसेवक समोरासमोर आले आहेत. शेजारच्या प्रभागात जाण्यास ते तयार नाहीत. यामुळे उमेदवारांची यादी जाहीर होताच फाटाफूट होऊन आपापल्या राजकीय भविष्याच्या वाट शोधण्याचा प्रयत्न इच्छुक करणार आहेत. या साऱ्या प्रकाराला वेळ मिळू नये म्हणून शहर काँग्रेस ऐनवेळी उमेदवाराची यादी जाहीर करून एबी फॉर्म शेवटच्या दिवशी वाटप करण्याची योजना आखली आहे.

यासंदर्भात बोलताना शहराध्यक्ष विकास ठाकरे म्हणाले, पक्षाशी कुणीही विश्वासघात करणार नाही. पक्षाच्या अधिकृत उमेदवारासोबत कार्यकर्ते राहणार आहेत. परंतु नियोजनाच्या दृष्टीने एबी फॉर्म एकाच ठिकाणांहून आणि सर्व झोनमध्ये एकाचवेळी वितरित केले जातील, असेही त्यांनी स्पष्ट केले. शहरातील काँग्रेस नेत्यांची गटबाजी सर्वश्रुत आहे.

राज्य आणि केंद्राच्याही सत्तेतून हद्दपार झाल्यानंतरही नेत्यांमधील वाद मिटलेला नाही. त्याचे दर्शन वारंवार घडवले जाते. या नेत्यांच्या गटबाजीचा काँग्रेसला सर्वप्रथम फटका २००७ च्या निवडणुकीत बसला होता. त्यावेळी एबी फॉर्म घोळ करण्यात आला होता. एकाच वार्डात दोन-दोन इच्छुकांना एबी फॉर्म देण्यात आला होता. सुमारे १२ वॉर्डात एकापेक्षा अधिक इच्छुकांना एबी वाटप करण्यात आले.

या प्रकारामुळे निवडणूक आयोगाने काँग्रेसचे चिन्ह गोठवण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढावावी लागली होती. महापालिकेत तेथून काँग्रेस मागे पडली. यावेळची निवडणूक काँग्रेससाठी कसोटीची ठरणार आहे. शहरात मुख्यमंत्री आणि केंद्रीय मंत्री आहेत. त्यांचा प्रभाव निवडणूक प्रचारात राहणार आहे. यामुळे पक्षात फूट पडू नये आणि विरोधकांना कमीत कमी लाभ होईल. यासाठी शहर काँग्रेस प्रयत्न करीत आहे. त्याचाच एक भाग म्हणून उमेदवारांची निवडणूक यादी आणि एबी-फॉर्म वाटप याबद्दल दक्षता बाळगण्यात येत आहे. काँग्रेसकडून यावेळी अनेक नवीन चेहऱ्यांना संधी देण्यात येणार आहे. याशिवाय समक्ष उमेदवार हाच एक निकष लावण्यात येणार आहे. त्यासाठी विद्यमान नगरसेवकांचा गेल्या पाच वर्षांतील सभागृह आणि सभागृहाबाहेरील सक्रिय सहभागाची माहिती गोळा करण्यात आली आहे, असे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले. पक्ष पातळीवर हीच स्थिती राहिल्यास काही विद्यमान नगरसेवकांना उमेदवारीपासून वंचित राहावे लागण्याची शक्यता आहे.

*    शहर काँग्रेसकडून १५१ उमेदवारांची संभावित यादी तयार.

*   पक्षाच्या संसदीय मंडळासमोर उमेदवार यादीवर चर्चा  होण्याची औपचारिकता.

*   पक्षांर्तगत बंडखोरीला लगाम घालण्यासाठी उमेदवारी अर्ज  भरण्याच्या शेवटच्या दिवशी पक्षाच्या अधिकृत उमेदवाराची घोषणा.

*   निवडणुकीसाठी १२ झोन आहेत. या सर्व झोनमध्ये एकाचवेळी एबी वाटप करणार.