मेळघाट व्याघ्र प्रकल्पासमोर पुन्हा आव्हान
मेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्या बफर क्षेत्रात एकाच आठवडय़ात दोन वाघांच्या मृत्यूच्या घटना उघडकीस आल्याने या व्याघ्र प्रकल्पासमोर पुन्हा एकदा नव्याने आव्हान उभे राहिले आहे. वाघाच्या शिकारीचे सत्र गेल्या तीन वर्षांपासून थंडावल्यानंतर मेळघाट व्याघ्र प्रकल्पाने थोडी उसंत घेतली होती. मात्र, एकाच आठवडय़ातील दोन मृत्यूमागे घातपाताची शक्यता व्यक्त केली जात असल्याने व्याघ्र प्रकल्पाच्या व्यवस्थापनावर प्रश्नचिन्ह उभे केले आहे.
देशातील सर्वात मोठे क्षेत्रफळ असलेल्या मेळघाट व्याघ्रप्रकल्पात सुमारे ६२ वाघांचा अधिवास आहे. मेळघाटातला वाघ पर्यटकांना सहजासहजी दिसत नसला तरीही कॅमेरा ट्रॅपमध्ये हे सारे वाघ कैद झाले आहेत. तीन वषार्ंपूर्वी या क्षेत्रात वाघांच्या एकापाठोपाठ एक शिकारी उघडकीस आल्यामुळे हा व्याघ्रप्रकल्प चांगलाच हादरला होता. आता पाणवठय़ावरील गणनेच्या काळातच या व्याघ्र प्रकल्पातील चिखलदरा वनपरिक्षेत्रात वैराट बिटपासून अवघ्या सहा किलोमीटर अंतरावर टी-१४ या वाघाचा मृत्यू उघडकीस आला. सुमारे ४० वाघांचा जन्मदाता असलेल्या या वाघाच्या मृत्यूची घटना तब्बल दोन दिवसानंतर उघडकीस आली.
या घटनेच्या तपासाची दिशा ठरण्याआधीच अवघ्या आठवडय़ाभरात टी-१५ या वाघिणीच्या मृत्यूने मेळघाट व्याघ्र प्रकल्पाला दुसरा धक्का दिला.
सुमारे ५०० मीटर खोल दरीत एका गुहेत वाघिणीचा मृत्यूने या व्याघ्रप्रकल्पाच्या व्यवस्थापनासमोर आव्हान उभे केले आहे.
पाण्याअभावी मृत्यू होणे शक्य नाही कारण त्याठिकाणी भरपूर पाणी होते. हा मृत्यूसुद्धा आठवडाभरापूर्वीचा असण्याची शक्यता आहे. वाघिणीचे दोन्ही अवयव शाबूत असल्याने व्यवस्थापन नैसर्गिक मृत्यू सांगत आहे, पण तरीही एकाचवेळी दोन वाघांचे नैसर्गिक मृत्यू कसे होऊ शकतात हे कोडे सुटायला तयार नाही. शिकारीच्या घटनेतून सावरल्यानंतर आणि त्याचा योग्य दिशेने तपास सुरू करणाऱ्या मेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्या व्यवस्थापनाला या दोन्ही मृत्यूचा तपास योग्य दिशेनेच करावा लागणार आहे. अन्यथा पुन्हा एकदा या व्याघ्र प्रकल्पावर वाघांच्या मृत्यूचे शिक्कामोर्तब होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

मेळघाटातील सिपना आणि गुगामल क्षेत्रातील गावांचे पुनर्वसन रखडलेले आहे. कारण अलीकडच्या काळात गावकरी आणि व्याघ्रप्रकल्प व्यवस्थापन यांच्यातील दरी कमी होण्यास तयार नाही. टी-१५ या वाघिणीचा मृत्यू ज्या क्षेत्रात झाला, त्या गाभा क्षेत्रात पस्तलई हे ६९ घरांचे गाव आहे. २०१२ मध्ये हे गाव पुनर्वसनाच्या वाटेवर असताना निधीअभावी ते रखडले. आता या गावातील लोक येथून हटायला तयार नाहीत. वैराटचे पुनर्वसन झाले, पण पस्तलईचे रखडले. पुनर्वसनावरून सध्या मेळघाट व्याघ्र प्रकल्प व्यवस्थापन आणि गावकरी यांच्यातील संघर्ष वाढलेला आहे. यावर्षी सुमारे ८० टक्के जंगल वणव्याच्या विळख्यात सापडले आहे आणि त्यासाठी गावकरी कारणीभूत ठरले आहेत. त्यामुळे एकाच आठवडय़ातील दोन वाघांच्या मृत्यूमागे घातपात असण्याची शक्यता बळावली आहे.