• ६२ वषार्ंखालील शिक्षकांसोबत करार न करण्याचे आदेश
  • राज्यातील अनेक पदव्युत्तर जागा धोक्यात

आयुष संचालनालयाने राज्यातील सर्व शासकीय आयुर्वेद महाविद्यालय व रुग्णालयांना ६२ वर्षांखालील कंत्राटी शिक्षकांसोबत नवीन करार न करण्याचे आदेश दिले आहे. त्यामुळे सर्व संस्थांमधील कंत्राटी शिक्षकांच्या नियुक्तया रखडल्या आहेत. यामुळे पदव्युत्तर जागा अडचणीत सापडण्याचा धोका असून त्याचा फटका विद्यार्थ्यांसह रुग्णांनाही बसण्याची शक्यता आहे.

राज्यातील चारही संस्थेत प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक संवर्गातील वीसहून जास्त व सहायक प्राध्यापकांची अनेक पदे रिक्त आहेत. आतापर्यंत आयुश संचालनालयाकडून कंत्राटी पद्धतीवर सहाय्यक प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, प्राध्यापकांची पदे भरली जात होती. परंतु अचानक आयुष संचालनालयाने नवीन आदेश काढत करार करतांना कंत्राटी शिक्षकांचे वय ६२ पेक्षा कमी असू नये, असे स्पष्ट केले. या आदेशामुळे सर्व संस्थेतील करार संपुष्टात आलेल्या सहयोगी प्राध्यापकांसह प्राध्यापकांच्या नियुक्तया थांबल्या आहेत. शिक्षकांच्या रिक्त पदांमुळे नागपूरच्या शासकीय आयुर्वेद महाविद्यालय व रुग्णालयांत नुकतेच २४ पदव्युत्तर जागांचा फटका बसला होता. या नवीन आदेशामुळे नागपूर आणि राज्यातील सर्व संस्थेतील आयुर्वेदच्या पदव्युत्तरच्या जागा आणखी कमी होण्याचा धोका आहे.

राज्यात नागपूर, उस्मानाबाद, नांदेड, मुंबई, अशी केवळ चार शासकीय आयुर्वेद महाविद्यालये व रुग्णालये आहेत. सर्वत्र भारतीय चिकित्सा केंद्रीय परिषदेच्या निकषानुसार पदवी व पदव्युत्तर गटातील विद्यार्थ्यांच्या जागांना मंजुरी आहे. शासकीय संस्था असल्याने येथे कमी दरात विद्यार्थ्यांना शिक्षण घेता येते. खासगी संस्थेत शिक्षण शुल्क जास्त असल्याने गरीब व सामान्यांच्या मुलांना शासकीय संस्थेशिवाय इतरत्र प्रवेश घेण्याचा पर्यायच नसतो. त्यामुळे शासनाने शासकीय संस्थेतील सर्व निकष पूर्ण करून येथे पदवी व पदव्युत्तरच्या जागा वाढवण्यासह रुग्णांच्या उपचाराकरिता अद्यावत सोयी करण्याची गरज आहे. परंतु त्याकडे दुर्लक्ष होत आहे.

निवृत्ती वय ६४, तर कंत्राटी शिक्षकांचे किमान वय ६२ 

शासकीय आयुर्वेद महाविद्यालय व रुग्णालयांत शिक्षकांचे निवृत्ती वय हे ६४ आहे. त्यामुळे आयुष संचालनालयाने कंत्राटी शिक्षकांकरिता ६२ हून कमी वयाचे शिक्षक न घेण्याचा निर्णयामुळे या विभागाला शिक्षक कसे मिळणार? हा प्रश्न या क्षेत्रातील जाणकार विचारत आहेत.

‘‘शासकीय आयुर्वेद महाविद्यालयांत पूर्वी बीएएमएस आणि एमडी अभ्यासक्रम असणाऱ्यांना सहायक प्राध्यापक, ५ वर्षे सहाय्यक प्राध्यापकाचा अनुभव असल्यास सहयोगी प्राध्यापक, ५ वर्षे सहयोगी प्राध्यापकांचा अनुभव असल्यास प्राध्यापक म्हणून करार पद्धतीने नियुक्ती केली जात होती. परंतु आयुष संचालकांकडून ६२ वर्षांहून कमी वयाची अट घातली आहे. त्यामुळे काहींच्या नियुक्तया थांबल्या असून काही पदव्युत्तर जागांना फटका बसण्याची शक्यता आहे. आयुष संचालनालयाकडे योग्य कार्यवाहीकरिता प्रस्ताव सादर केला आहे.

गणेश मुक्कावार, अधिष्ठाता, शासकीय आयुर्वेद महाविद्यालय व रुग्णालय, नागपूर