‘सायबर सेल’च्या बाजूला ‘सायबर तक्रार केंद्र’; पोलीस आयुक्तांची माहिती

लॉटरी लागली, तुमच्या नावाचं विदेशातून पार्सल आलं आणि तुमच्या बँकेतून बोलतो, अशा स्वरूपाचे भ्रमणध्वनी करून तुमची माहिती मिळवून ऑनलाईन फसवणूक करणाऱ्यांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. अशा प्रकरणांची तक्रार देण्यासाठी आता नागरिकांना इतरत्र भटकण्याची आवश्यकता नाही. ‘सायबर गुन्ह्य़ा’संदर्भात सर्व तक्रारी आता आर्थिक गुन्हे शाखेच्या कार्यालयाशेजारी असणाऱ्या ‘सायबर तक्रार केंद्रा’त स्वीकारल्या जातील आणि येथून प्रत्येक तक्रारीचा तपास करण्यात येईल, अशी माहिती पोलीस आयुक्त डॉ. के. व्यंकटेशम यांनी दिली.

नोटबंदीनंतर आणि डिजिटल इंडियाच्या उपक्रमानंतर देशभरात ऑनलाईन आर्थिक व्यवहारांचे प्रमाण वाढले आहे. याशिवाय आजही तरुणाई ऑनलाईन व्यवहारांसह फेसबूक, व्हॉट्स अ‍ॅप अशा समाज माध्यमांचा सर्वाधिक वापर करीत आहे. इंटरनेट, इंटरनेट बँकिंग मोबाईल बँकिंग, समाजमाध्यमे आदींचा वापर करताना त्याचे धोकेही अधिक असतात. समाज पूर्णपणे ऑनलाईन शिक्षित न झाल्याने अनेकजन लोकांना आमिष दाखवून फसवितात. याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. अशा स्थितीत लोक पोलीस ठाण्यात आपली गाऱ्हाणी घेऊन जातात आणि त्यांचे समाधान होत नाही. कारण, अशा प्रकरणांचा तपास करण्यासाठी ‘सायबर सेल’ची मदत लागते. त्यामुळे लोकांच्या तक्रारी स्वीकारणे आणि त्यांचा निपटारा करण्यासाठी ‘सायबर सेल’च्या शेजारीच केंद्रीय कार्यालय निर्माण करण्याची संकल्पना होती. लोकांच्या सोयीसाठी ‘सायबर कम्प्लेंट से’ (सी३) निर्माण करण्यात आले. या सेलमध्ये पाच अधिकारी आणि १६ कर्मचारी देण्यात आले आहेत. एकप्रकारे हे सायबर पोलीस ठाणेच आहे. आर्थिक गुन्हे शाखेच्या उपायुक्त आणि सहाय्यक पोलीस आयुक्त या सेलचे प्रमुख असतील. या ठिकाणी नागरिकांच्या तक्रारी स्वीकारण्यात येतील. त्यांचा अभ्यास करण्यात येईल आणि त्यांच्यावर पुढील कारवाई करण्यात येईल, अशी माहिती पोलीस आयुक्तांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी सहपोलीस आयुक्त शिवाजी बोडखे, विशेष शाखेचे उपायुक्त निलेश भरणे, आर्थिक गुन्हे शाखेच्या उपायुक्त श्वेता खेडकर आणि सी३ च्या सहाय्यक पोलीस आयुक्त डॉ. अश्विनी पाटील उपस्थित होते. यावेळी अधिकाऱ्यांनी सी-३ चे उद्घाटन केले आणि ऑनलाईन किंवा सायबर गुन्ह्य़ासंदर्भात नागरिकांनी सिव्हील लाईन्स येथील प्रशासकीय इमारत क्रमांक-१ मधील सी-३ कार्यालयाशी संपर्क करावा, असे आवाहन आयुक्तांनी केले.