न्यायवैद्यक ज्ञानाची चाचणी

गुन्हे तपासात नेहमी उपयोगात येणाऱ्या न्यायसाहाय्यक विज्ञान (फॉरेन्सिक सायन्स) विषयाचे ज्ञान किती पोलीस अधिकाऱ्यांना चांगले आहे, हे तपासण्यासाठी खुद्द राज्याचे पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित यांनी राज्यातील शेकडो पोलीस अधिकाऱ्यांची लेखी परीक्षा घेतली.
गुन्हे तपासताना पोलीस नेहमीच पीडित आणि गुन्हेगारांची वैद्यकीय तपासणी, शवविच्छेदन आणि रासायनिक परीक्षण (केमिकल अ‍ॅनालिसिस) करतात. मृताची ओळख पटविण्यासाठी डीएनएन चाचणी आणि गुन्हेगाराचा शोध घेण्यासाठी रासायनिक परीक्षण (सीए) करतात. या सर्व चाचण्या न्यायसाहाय्यक विज्ञान विषयात मोडतात. त्यासाठी विभाग स्तरावर सरकारने न्यायसाहाय्यक विज्ञान प्रयोगशाळा उभारल्या असून लाखो रुपये वेतन असणारे संशोधक तेथे काम करतात, परंतु गुन्हे तपासासाठी न्यायसाहाय्यक विज्ञान प्रयोगशाळेत विसेरा (नमुने) पाठविणारे पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना त्या विषयाचा किती अभ्यास आहे, याची चाचणी कधीच घेण्यात येत नव्हती.
त्यामुळे न्यायसाहाय्यक प्रयोगशाळेकडून प्राप्त झालेल्या अहवालानंतर काय करावे किंवा नवीन पैलूंची चाचपणी करावी का, हे निर्णय घेण्यासाठी तपास अधिकाऱ्यांना या विषयाचे ज्ञान ढोबळमानाने असणे आवश्यक आहे, असा समज पोलीस दलात आहे. नेमके तेच तपासण्याचा निर्णय पोलीस महासंचालकांनी पदाची सूत्रे स्वीकारताच घेतला. त्यासंदर्भात त्यांनी सर्व जिल्ह्य़ातील पोलीस अधीक्षक आणि महापालिकांमधील पोलीस आयुक्तांना पत्र पाठवून अधिकाऱ्यांची परीक्षा घेण्याचे निर्देश दिले.
या आदेशानंतर पोलिसांनी आपल्या कार्यकक्षेतील ५० अधिकाऱ्यांची निवड करून परीक्षा घेतली. नागपूरच्या अधिकाऱ्यांची परीक्षा गुन्हे शाखेच्या कार्यालयात घेण्यात आली.

५० जणांची निवड
या परीक्षेसाठी अधिकारी व कर्मचारी निवडीचे काही निकष ठरविण्यात आले होते. त्यानुसार पोलीस दलात १५ वर्षांची सेवा झालेले हवालदार आणि पोलीस अधिकारी पात्र ठरविण्यात आले. यात मुख्य हवालदारापासून ते वरिष्ठ पोलीस निरीक्षकपदावरील अधिकाऱ्यांचा समावेश होता. प्रत्येक जिल्हा अधीक्षक कार्यालय आणि आयुक्तालयातून किमान ५० अधिकारी व कर्मचाऱ्यांची निवड करण्यात आली आणि २८ ऑक्टोबरला राज्यभरात ही परीक्षा पार पडली.

गुन्हे तपासण्यासाठी न्यायसाहाय्यक विज्ञान विषयाचे ज्ञान असणे आवश्यक आहे. त्यामुळे पोलीस कर्मचारी व अधिकाऱ्यांना ते किती ज्ञान आहे, हे तपासण्यासाठी ही परीक्षा होती. त्याला चांगला प्रतिसाद मिळाला असून लवकरच निकाल जाहीर करण्यात येईल
– प्रवीण दीक्षित , पोलीस महासंचालक

मूल्यांकन मुंबईत
’या परीक्षेत एकूण ५० प्रश्न होते. प्रत्येक प्रश्नाला १ गुण, असा ५० गुणांचा हा पेपर होता. हाताचे ठसे, मानवी शरीराची रचना, डोक्याची कवटी आणि विषामुळे शरीरावर होणारे परिणाम, आदी बाबींवर यात प्रश्न विचारण्यात आले होते.
’ पेपर सोडविल्यानंतर परीक्षार्थीच्या उत्तरपत्रिका सीलबंद करून पोलीस महासंचालक कार्यालयाकडे पाठविण्यात आल्या. या पेपरचे मूल्यांकन मुंबईत होणार असून परीक्षार्थी अधिकाऱ्यांना आता निकालाची प्रतीक्षा आहे.