अशोक चव्हाण यांची टीका, नाना पटोलेंना काँग्रेसमध्ये येण्याचे आमंत्रण

भाजपांतर्गत सुरू असलेल्या हुकूमशाहीमुळे नेत्यांमध्ये प्रक्षोभ असून नेते मत व्यक्त करण्यासाठी वेगवेगळे व्यासपीठ शोधत आहेत, अशी टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनी येथे केली.

यवतमाळ येथे काँग्रेसच्या मोर्चात सहभागी होण्यासाठी चव्हाण नागपुरात आले असता ते पत्रकारांशी बोलत होते. भाजप नेते व माजी केंद्रीय मंत्री यशवंत सिन्हा यांनी रविवारी विदर्भातील अकोला जिल्ह्य़ात एका कार्यक्रमादरम्यान पुन्हा केंद्र सरकारवर तोफ डागली. सायंकाळी सिन्हा आणि भाजपचे नाराज खासदार नाना पटोले यांची विमानतळावर चर्चा झाली. या संदर्भात चव्हाण यांना विचारले असता ते म्हणाले, भाजपमध्ये सध्या जे काही सुरू आहे, ते त्या पक्षांतर्गत दडपशाहीमुळे घडत आहे. तेथे पक्षांतर्गत लोकशाही नाही. पक्षातील नेत्यांना विचार व्यक्त करता येत नाही. त्यामुळे त्यांच्यात रोष असून ते आता मत व्यक्त करण्यासाठी वेगवेगळे व्यासपीठ वापरत आहेत. खासदार नाना पटोले लोकसभेत माझे सहकारी आहेत. त्यांची नेहमी भेट होते. त्यामुळे त्यांची वेगळी भेट घेण्याची आवश्यकता नाही. त्यांना काँग्रेसमध्ये येण्याची इच्छा असल्यास त्यांचे स्वागत आहे, असेही चव्हाण म्हणाले.

भाजप नेते शत्रुघ्न सिन्हा, अरुण शौरी यांच्यासह काही नेते सरकारच्या चुकीच्या निर्णयाबद्दल पुढील महिन्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार आहेत. त्याच्या नियोजनासंदर्भातच सिन्हा-पटोले यांची भेट होती, अशी चर्चा आहे.

विषबाधाप्रकरणी मुख्यमंत्री गंभीर नाही

कीटकनाशकामुळे ३३ शेतकरी, शेतमजुरांचे मृत्यू झाले आहेत. ३५० च्या जवळपास रुग्णालयात दाखल आहेत. असे असताना मुख्यमंत्री यवतमाळ जिल्ह्य़ात गेले नाहीत. आत्महत्या वाढत आहेत. कर्जमाफीचा प्रश्न लोंबकळत आहे. पीक विम्याची रक्कम शेतकऱ्यांना मिळत नाही. आंतरराष्ट्रीय स्तरावर बंदी असलेल्या कीटकनाशकांची सर्रास विक्री होत आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्नांचे सरकारला अजिबात गांभीर्य नाही, अशी टीका चव्हाण यांनी केली.

तक्रारी करण्यापेक्षा पक्ष मजबूत करा

राज्यातील नेत्यांना माझ्याबद्दल काही तक्रारी असतील तर त्यांनी थेट माझ्याकडे तक्रारी कराव्यात. दिल्लीत केल्या तरी काही हरकत नाही. मी तक्रारींना सकारात्मक दृष्टीने बघतो. माझा कोणताही गट-तट नाही. नेत्यांनी आपापल्या जिल्ह्य़ात निकाल द्यावा, एवढी अपेक्षा असते. जिल्ह्य़ात पक्षाची स्थिती मजबूत करण्यासाठी काय करावे, ते नेत्यांनी सांगावे, असा टोलाही चव्हाण यांनी हाणला. माजी मंत्री सतीश चतुर्वेदी, नितीन राऊत आणि अनिस अहमद यांनी दिल्लीत वरिष्ठ नेत्यांना भेटून प्रदेशाध्यक्ष चव्हाण यांच्याविरोधात उघडलेल्या मोहिमेच्या संदर्भात विचारलेल्या प्रश्नावर चव्हाण बोलत होते.