दिग्विजय सिंग यांची सूचना
सोनिया गांधी यांनी काँग्रेसच्या अध्यक्षपदी कायम राहावे, असे राष्ट्रवादी काँग्रेसला वाटत असेलतर त्यांनी आपला पक्ष काँग्रेसमध्ये विलीन करावा, अशी सूचना काँग्रेसचे नेते दिग्विजय सिंग यांनी केली.
आसाम आणि केरळ राज्य गमावल्यानंतर काँग्रेस पक्षाची धुरा राहुल गांधी यांच्याकडे सोपवण्याची शक्यता वर्तवण्यात येत असताना राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तारीक अन्वर यांनी सांप्रदायिक भाजपचा सामना करण्यासाठी आणि संयुक्त पुरोगामी आघाडी मजबूत करण्यासाठी सोनिया गांधी काँग्रेसच्या अध्यक्षपदी कायम असल्या पाहिजे, असे मत व्यक्त केले होते. अन्वर यांच्या वक्तव्यावर दिग्विजय सिंग यांना विचारले असता राष्ट्रवादी काँग्रेसचे अशी भूमिका असेलतर त्यांनी काँग्रेस पक्षात विलीन व्हावे, असे उत्तर त्यांनी दिले. यापूर्वी देखील दिग्विजय सिंग यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना धर्मनिरपेक्ष शक्तींना मजबूत करण्यासाठी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याचे जाहीर निमंत्रण दिले होते. सोनिया गांधी यांच्या राष्ट्रीयत्वाच्या मुद्दय़ावरून पवार यांनी काँग्रेस सोडली होती.
दिग्विजय सिंग मध्य प्रदेशातील घोडाडोंगरी पोटनिवडणुकीच्या प्रचारासाठी नागपूरमार्गे गेले. मंगळवारी दिल्लीला परत जाताना नागपूर विमातळावर त्यांनी पत्रकारांशी वार्तालाप केला. बाटला हाऊस चकमक बनावट होती, हे काल म्हटले होते आणि आजही म्हणत आहे. बाटला हाऊस प्रकरणी केलेल्या वक्तव्याबद्दल क्षमा मागण्याचा प्रश्नच येत नाही, मी कालही चौकशीची मागणी केली आणि आजही करीत आहे. हा छोटा साजिद आहे की मोठा साजिद आहे, हे माहीत नाही. कोण साजिद आहे त्याला सरकारने पकडावे, मला कोणताही साजिद माहीत नाही. भाजपकडे काही पुरावा असलेतर मला अटक करावी, असेही ते म्हणाले. या प्रकरणाची न्यायालयीन चौकशी झाली पाहिजे. या चौकशीतून सर्व बाबी स्पष्ट होतील. ही चकमक बनावट असून फेरचौकशी करण्यात यावी, या आपल्या भूमिकेवर ठाम असल्याचेही ते म्हणाले.
‘सरकारला अमिताभ बच्चनची गरज पडली’
गेल्या दोन वर्षांत मोदी सरकारने प्रचाराशिवाय काहीच केले नाही. म्हणून तर त्यांना आता अभिनेते अमिताभ बच्चन यांची गरज पडली आहे. सरकारने पुन्हा प्रचाराचा धडाका लावला आहे. दोन वर्षांत काय केले हे मी बनारसला २६ मे रोजी जाऊन बघणार आहे. उत्तर प्रदेशचे राज्यपाल राम नाईक बजरंग दलाच्या शिबिरात गेले. याबद्दल ते म्हणाले, राम नाईक हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, बजरंग दलातून आले आहेत. त्यांचा हिसेंवर विश्वास आहे. त्यांनी जे काही केले ते अपेक्षित होते, असेही ते म्हणाले.