नागपुरातून अधिकारी हलविण्यास पोलीस महासंचालक अनुत्सुक
सूर्यनारायण नागपूरवर आग ओकत आहे. विदर्भाबाहेरील पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना येथील उन्हाचे चटके असह्य होत असून त्यांनी बदलीचे प्रयत्न चालविले आहेत. त्यासाठी मुंबईतील विविध राजकीय पुढाऱ्यांच्या मध्यस्थीने बदलीचे प्रयत्न सुरू असून यातच घोडेबाजार तेजीत आला असल्याची माहिती आहे.
विदर्भात सेवा देण्यासाठी विदर्भाबाहेरील अधिकारी अनुत्सुक असतात, असे खुद्द राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एका पत्रकार परिषदेत सांगितले होते. बदली प्रश्नावर मुख्यमंत्री जाहीरपणे चिंता व्यक्त करीत असतील तर, यावरून अधिकाऱ्यांच्या अरेरावीची सर्वाना कल्पना येऊ शकते. अधिकाऱ्यांच्या अरेरावीमुळे केवळ महसूल, सिंचन विभागच नाही तर पोलीस दलही ग्रस्त होत आहे. भाजप सरकार सत्तेवर आल्यानंतर सर्वप्रथम मुख्यमंत्र्यांनी शहरातील कायदा व सुव्यवस्थेत लक्ष घातले. शहरातील कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी मनुष्यबळाची आवश्यकता असल्याने त्यांनी नागपुरात मुंबई, पुणे, नाशिक विभागातून पोलीस अधिकारी पाठविले. बदली आदेश प्राप्त होताच प्रामाणिक अधिकारी नागपुरात रुजू झाले. मात्र, काही अधिकाऱ्यांनी रुजू न होताच राजकीय वशिला लावून परस्पर बदली आदेश रद्द करून घेतला. काही अधिकारी नागपुरात केवळ नावालाच रुजू झाले आणि केवळ तीन ते सहा महिन्यांत इच्छित ठिकाणी बदली करून घेण्यात यशस्वी ठरले.
बदली होऊन अधिकारी रुजू होत नाही आणि परस्पर बदली रद्द करण्यात येत असल्याने प्रामाणिकपणे रुजू झालेल्या अधिकाऱ्यांच्या मनात अन्यायाची भावना येत असून सरकारविरोधी संतप्त प्रतिक्रिया उमटत आहे. बदली आदेशाचे पालन न करणाऱ्या अधिकाऱ्यांचे बदली आदेश रद्द न करता त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करावी, अशी मागणीही जोर धरत आहे. वर्षांतील एप्रिल-मे महिन्यांमध्ये पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात येतात. त्यासाठी आता नागपुरात रुजू झालेले विदर्भाबाहेरील अनेक अधिकारी प्रयत्न करीत आहेत. मुंबई, पुणे, नाशिक विभागातील शेकडो अधिकाऱ्यांनी पोलीस महासंचालक कार्यालयाकडे बदलीसाठी अर्ज केले आहेत. पोलीस महासंचालक नागपुरात कार्यरत अधिकाऱ्यांची बदली करण्यास अनुत्सुक आहेत. त्यामुळे संबंधित अधिकारी पोलीस महासंचालकांवर दबाव टाकण्यासाठी राजकीय पुढाऱ्यांचा वशिला घेत आहेत. विविध मंत्र्यांच्या विशेष कार्य अधिकाऱ्यांच्या माध्यमातून बदलीचे जोरदार प्रयत्न सुरू झाले आहेत. आतापर्यंत केवळ तीन ते चार अधिकाऱ्यांनाच बदली करवून घेण्यात यश आले आहे. त्यामुळे मुंबईत पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यासाठी घोडाबाजार तेज झाला असल्याची चर्चा पोलीस वर्तुळात आहे.

मनानुसार बदली होणार नाही
पोलीस म्हणून नियुक्त होत असतानाच स्वत:च्या इच्छा आकांक्षा सोडाव्या लागतात. कोणत्याही ठिकाणी आणि प्रशासनाने सोपविलेली जबाबदारी पार पाडणे, हा एकमेव उद्देश कर्मचाऱ्यांचा असतो. बदलीसंदर्भातील सर्व आदेश अधिकाऱ्यांना बंधनकारक आहेत. त्यामुळे कोणत्याही अधिकाऱ्यांची बदली त्यांच्या इच्छेनुसार होणार नाही. शासनाने सोपविलेली जबाबदारी प्रत्येकाला पार पाडावी लागेल.
– प्रवीण दीक्षित, पोलीस महासंचालक.