वंचितांच्या चेहऱ्यावर आनंद फुललेला बघणे यासारखे समाधान नाही. दिवाळी आली की समाजात सक्रिय असलेल्या अनेक संघटना, व्यक्ती तसेच त्यांचे समूह यासाठी झटत असतात. दु:ख पचवायचे असते तर आनंद वाटायचा असतो, याच भावनेतून अनेकजण काम करत असतात. अशा अभाव व संकटग्रस्तांच्या दिवाळीसाठी विदर्भात यंदाही अनेक हात सरसावलेले दिसतात. यावेळी विदर्भावर व विशेषत: यवतमाळ जिल्ह्य़ावर विषाक्त फवारणीची गडद छाया पसरली आहे. या फवारणीमुळे झालेले २१ मृत्यू व शेकडोंना झालेल्या विषबाधेमुळे अनेकांच्या घरात ऐन दिवाळीत दु:खाचा अंधार पसरलेला आहे. विषामुळे बाधित झालेले हे लोक प्रामुख्याने शेतमजूर आहेत. फवारणीचे काम केले तर चार पैसे मिळतात. त्यातून घरातील चूल पेटते, मग पोटाला आधार मिळतो आणि जगण्याचे बळ मिळते हीच या कामामागील भावना. यंदा अनेकांना ही मेहनत मृत्यूच्या दारात घेऊन गेली आहे. ज्यांचा मृत्यू झाला, त्यांना सरकारने दोन लाख दिले, पण जे विषाने बाधित झाले, त्याचे काय? त्यांच्यावरच्या उपचाराचे काय? असे अनेक प्रश्न आज आ वासून उभे आहेत. ज्यांनी शासकीय रुग्णालयात उपचार घेतले किंवा घेत आहेत, त्यांना बराच खर्च करावा लागला. यवतमाळच्या रुग्णालयात औषधेच नाहीत. विषबाधितांवरचे उपचारही महागडे असतात. त्यामुळे अनेकांना बाहेरून औषधे आणावी लागली. या खर्चाबाबत शासन गप्प आहे. या प्रकरणाचा गवगवा झाल्यानंतर अनेक मंत्री, विरोधी पक्षनेते, खासदार, आमदार या बाधितांना भेटून गेले, पण त्यापैकी कुणीही उपचारासाठी मदत देण्याचे सौजन्य दाखवले नाही. सारे या मुद्यावरून राजकारण करण्यातच व्यस्त राहिले. या पीडितांना मदत करण्यासाठी आता जनमंच ही संघटना पुढे सरसावली आहे. यवतमाळचे डॉ. चेतन दरणे या संघटनेच्या माध्यमातून शेतमजुरांना दोन हजार गणवेश मिळवून देण्यासाठी झटत आहेत. फवारणी करताना आवश्यक असलेल्या सर्व गोष्टींचा अंतर्भाव या गणवेशात असणार आहे. एवढय़ा मोठय़ा संख्येत गणवेश तयार करणे हे सोपे काम नाही, पण जनमंचची चमू यासाठी तयारीला लागली आहे. खरे तर फवारणी कशी करायची, याचेही प्रशिक्षण असते. राज्यातील कृषीखाते असे प्रशिक्षण देण्याच्या भानगडीत कधी पडले नाही. कीटकनाशकांच्या कमिशनमध्येच रस असलेल्या या खात्याला आता एवढय़ा मृत्यूनंतरही त्याचे मोल कळलेले नाही. जे काम या खात्याने करायला हवे होते ते आता जनमंचने सुरू केले आहे. शेतमजूर पुरुष व महिलांना हे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. फवारणी करताना मुखवटा घालायला हवा, हा नियम आहे, पण कुणीही तो पाळला नाही. ज्या शेतकऱ्यांकडे हे मजूर कामाला होते, त्यांनीही ही काळजी घेतली नाही. आता मुखवटे देण्याचे काम जनमंचने हाती घेतले आहे. ‘जाणीव’ या नावाने हा उपक्रम चालवला जाणार आहे. या दुर्दैवी घटनेत अनेकांना दृष्टिदोष झाला. त्यांच्यावरचे उपचार महागडे आहेत. त्यासाठी मदत करायला म्हणून आणखी काहींनी पुढे येणे गरजेचे आहे. शरीरात भिनलेले विष बाहेर पडावे म्हणून ‘अँड्रोक्वीन’ नावाचे औषध दिले जाते. त्याचा अंमल बराच काळ राहतो व रुग्ण सामान्य अवस्थेत यायला काही आठवडे लागतात. असे शेकडो रुग्ण या जिल्ह्य़ात सध्या आहेत. त्यांना कामावर जाणेही शक्य नाही. अशांना मदत करण्यासाठी आणखी काही संस्थांनी पुढाकार घेणे गरजेचे आहे. संकटग्रस्तांना मदत हीच खरी दिवाळी आहे, या भूमिकेतून हे व्हायला हवे. अशा घटना घडल्या की राजकारण करणारे ते करतात, पण समाज म्हणून आपलीही काही जबाबदारी आहे, अशी भूमिका प्रत्येक सुजाण व्यक्तीने या आनंदाच्या क्षणी घेणे गरजेचे आहे. यवतमाळची घटना ही ताजी जखम आहे, पण विदर्भात अशा अनेक जखमा गेल्या अनेक वर्षांपासून भळभळत आहेत. दहशतीच्या छायेत जगत असलेले गडचिरोलीतील आदिवासी हे त्यापैकी एक. दिवाळीच्या काळात या जिल्ह्य़ाच्या दुर्गम भागात या आदिवासींच्या चेहऱ्यावर आनंद फुलावा म्हणून अनेकजण झटत असतात. या आदिवासींच्या रक्षणासाठी असलेले पोलीस व सुरक्षा दलाचे जवान त्यात आघाडीवर असतात. या काळात त्यांना कपडे, संसारोपयोगी साहित्य वाटणे असे उपक्रम हाती घेतले जातात. या युद्धग्रस्त क्षेत्रात हे जवानही एकटे असतात. कुटुंबापासून दूर असतात. किमान या सणाच्या निमित्ताने एकत्र आले की दहशतीची छाया थोडी बाजूला ढकलली जाते याची जाणीव सर्वाना असते. त्यामुळे दुर्गम भागातील हा आनंदोत्सव वेगळी उंची गाठणारा ठरतो. यंदा तर गडचिरोलीतील अनेक पोलीस ठाण्यांनी दिवाळीच्या निमित्ताने वेगवेगळे उपक्रम आयोजित केले आहेत. छत्तीसगडच्या सीमेवर असलेल्या दामरंचा पोलीस ठाण्यातील केतन मांजरे व योगेश गुजर या तरुण अधिकाऱ्यांनी आदिवासी विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप, गणवेश व खेळाचे साहित्य पुरवण्याचे ठरवले आहे. त्यांच्या आवाहनाला राज्यभरातून प्रतिसाद मिळत आहे. पुण्याचे आदर्श मित्र मंडळ दरवर्षी दिवाळीत गडचिरोलीच्या दुर्गम भागात सक्रिय असते. गेल्या अनेक वर्षांपासून या मंडळाचे तरुण वर्षभर गोळा केलेल्या वस्तू येथे घेऊन येतात. फराळ आणतात व तो आदिवासींमध्ये वितरित करतात. नक्षलवाद्यांच्या हजेरीमुळे हा समाज प्रगतीपासून दूर राहिला. त्यांनाही विकासाची आस आहे, पण दहशतीमुळे बोलता येत नाही अशी स्थिती आहे. अशा अन्यायग्रस्तांना आनंदाच्या क्षणात सहभागी करून घेणे हाच दिवाळीचा खरा अर्थ आहे. याच काळात विदर्भातील अनेक वृद्धाश्रम, अनाथालये, सरकारी निरीक्षणगृहांमध्येही दिवाळी साजरी करण्याचे उपक्रम अनेक संस्थांकडून राबवले जातात. केवळ मी व माझे कुटुंब हा दृष्टिकोन न ठेवता सारा समाजच माझे कुटुंब अशी भूमिका घेऊन काम करणारे अनकेजण आहेत. त्यांच्या या उपक्रमाला कधी प्रसिद्धी मिळते तर कधी नाही, पण काम मात्र अव्याहतपणे सुरूच राहते. समाजतील वंचित व पीडितांच्या पाठीशी उभे राहाणे केवळ सरकारचे काम आहे ही मानसिकता आता त्यागण्याची वेळ आहे. अशांच्या मागे भक्कमपणे उभे ठाकणे, त्यांना आधार देणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे. याची जाणीव जेवढी जास्त पसरत जाईल तेवढे आपण सजग होऊ व आपले सामाजिक भान वृद्धिंगत होत जाईल. दिवाळीकडे या दृष्टिकोनातून बघण्याची आज खूप गरज आहे.

devendra.gawande@expressindia.com