केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाचा अहवाल

केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने दिलेल्या अहवालात २०१५ ची दिवाळी सर्वाधिक प्रदूषित असल्याची नोंद केली असून २०१६ मध्ये दिवाळीतील प्रदूषणाचा स्तर त्यापेक्षाही अधिक असण्याची शक्यता वर्तवली आहे. दरवर्षी प्रदूषणाचा स्तर सातत्याने वाढण्यामागचे कारण चीनचे फटाके आणि त्यात वापरले जाणारे घातक रसायन असल्याचे सांगितले आहे.

दिवाळी झाल्यानंतर दरवर्षी केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्यावतीने विविध प्रदूषकांचे मापन केले जाते. त्यानुसार चीनच्या फटाक्यांचा वाढत चाललेला वापर प्रदूषणाची मात्रा वाढवण्यास कारणीभूत ठरल्याचे मंडळाने नमूद केले आहे. चीनचे फटाके किंमतीने स्वस्त आणि आकर्षक असल्यामुळे नागरिकांकडून या फटाक्यांची मागणी वाढत आहे. मात्र, हे फटाके स्वस्त असण्यामागचे कारण कमी दरात काम करण्यास तयार झालेले मजूर आणि त्यात वापरली जाणारी घातक रसायने आहेत.

चीनमध्ये स्त्रीया आणि बालमजुरांचा मोठय़ा प्रमाणात फटाके तयार करण्याच्या कामात वापर होतो. तसेच चीनच्या फटाक्यात पोटॅशियम क्लोरेट, क्लोरेटचे सल्फर आणि अन्युमिनियम पावडरसोत मिश्रण करून हे फटाके तयार केले जातात. त्यामुळे हे फटाके अधिक ज्वलनशील असतात आणि बरेचदा हातातच फुटतात.

चायनाच्या फटाक्यांचा वापर जसाजसा वाढला आहे तसतसे फटाके हातात फुटण्याचे प्रमाण, फटाक्यांच्या कारखान्याला आग लागण्याचे प्रमाण वाढले आहे. याउलट भारतातील फटाके पोटॅशियम नायट्रेट आणि अन्युमिनियम पावडरच्या मिश्रणावर तयार केले जातात. याची किंमत अधिक असल्याने फटाकेही महाग असतात. मात्र, हे फटाके फारसे प्रदूषण करत नाहीत. तामिळनाडूतील शिवकाशीमधील फटाक्यांचा कारखाना प्रसिद्ध आहे.

या कारखात्यात प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या तब्बल दोन लाख लोकांना रोजगार मिळाला आहे. मात्र, चीनच्या फटाक्यांच्या वापरामुळे भारतीय फटाके उद्योगात काम करणाऱ्या या कामगारांवरसुद्धा बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळली आहे. यावर्षी सरकारने चीनच्या फटाक्यांना स्पर्धा करण्यासाठी भारतीय फटाक्यांच्या किंमती वाढवायच्या नाहीत असा निर्णय घेतला आहे. मात्र, पहिल्याच वर्षी या निर्णयाला नागरिकांकडून किती प्रतिसाद मिळतो हे सांगता येणे कठीण आहे.

चीनच्या फटाक्यांमध्ये रसायनांचा वारेमाप वापर

भारतीय फटाके केवळ ध्वनी प्रदूषण करतात, पण चीनचे फटाके हवेत प्रदूषण पसरवतात. त्याचा थेट परिणाम माणसाच्या आरोग्यावर होतो. चीनच्या फटाक्यांमध्ये रसायनांचा वारेमाप वापरामुळे अधिक आकर्षक दिसतात. कारण जेवढे जास्त रसायन, तेवढे रंग अधिक असतात. मात्र, हे फुटल्यानंतर वातावरणातील कार्बन आणि सल्फरचे प्रमाण वाढून दम्यासारख्या आजार वाढतात, असे या विषयातील तज्ज्ञ प्रा. योगेश दुधपचारे यांनी सांगितले.