संपकाळात शासकीय वैद्यकीय रुग्णालयातील मृत्यूसंख्या ४० वर

गेल्या पाच दिवसांपासून डॉक्टरांचा संप सुरू आहे. या काळात शासकीय वैद्यकीय रुग्णालयात ४० जणांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, इंडियन मेडिकल असोसिएशने संप मागे घेतला. शहरातील अनेक खासगी दवाखाने सुरू झाले असले तरी निवासी डॉक्टरांचा संप मागे घेण्याबाबत रात्री उशिरापर्यंत कुठलाही निर्णय घेण्यात आला नाही.

गेल्या पाच दिवसांपासून निवासी डॉक्टरांचे सामूहिक रजा आंदोलन सुरू असून त्यामुळे मेडिकल, मेयोतील रुग्णसेवा कोलमडली आहे. बुधवारी मेडिकल व मेयो प्रशासनाने शहरातील ४४० निवासी डॉक्टरांना निलंबित केले होते. त्यावर संतप्त होऊन ‘आयएमए’ने आंदोलनात उडी घेऊन शहरातील अत्यावश्यक सेवा वगळता इतर बाह्य़रुग्णसेवेसह सगळ्या तपासण्या बंद केल्या. शुक्रवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत झालेल्या चर्चेनंतर संप मागे घेऊन ७५ टक्के डॉक्टरांनी दवाखाने सुरू केले. त्यामुळे रुग्णांना दिलासा मिळाला होता. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात गुरुवारी सकाळी ८ वाजेपासून शुक्रवारी सकाळी ८ वाजेपर्यंत ८ मृत्यू झाले.

शासकीय वैद्यकीय आणि इंदिरा गांधी वैद्यकीय महाविद्यालयातील आरोग्य सेवा कोलमडली होती. रुग्णांना तपासण्यासाठी निवासी डॉक्टर नसल्यामुळे त्याचा रुग्णांच्या नातेवाईकांना मानसिक त्रास सहन करावा लागला. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात निवासी डॉक्टारांनी निदर्शने केली नाही. मुंबईला मार्डचा काय निर्णय होतो याच्या प्रतीक्षेत बसले होते.

मुख्यमंत्र्यांनी निवासी डॉक्टरांच्या घेतलेल्या भूमिकेबाबत अनेक निवासी डॉक्टरांनी नाराजी व्यक्त केली. आता मागण्या पूर्ण झाल्या नाही तर मग पुढे होणार नाही त्यामुळे हीच वेळ असल्याचे सांगून मार्डच्या डॉक्टरांनी ताठर भूमिका घेत कामावर न जाण्याचा निर्णय घेतला. निवासी डॉक्टरांसह आंतरवासिता डॉक्टर सेवेवर नसल्याने शासकीय आरोग्य यंत्रणा कोलमडून गेली. त्यातच मेयोतील सुमारे ३७ वरिष्ठ निवासी डॉक्टरांसह शासकीय दंत महाविद्यालयातील ५० निवासी डॉक्टरही सामूहिक रजेवर गेल्याने रुग्णांचे हाल झाले. शुक्रवारी मेडिकल, मेयोतील किरकोळ शस्त्रक्रिया पूर्णपणे ठप्प पडल्या असून फार कमी शस्त्रक्रिया झाल्याचे पुढे आले. मात्र मेडिकल व मेयो प्रशासनाने रुग्ण सेवा सुरळीत असल्याचा दावा केला आहे.

मेडिकल, मेयोत झालेले उपचार

प्रशासनानुसार गुरुवारी मेयोमध्ये १ हजार ५१८ रुग्णांवर बाह्य़रुग्ण विभागात तर ३८ जणांना रुग्णालयात दाखल करून उपचार करण्यात आले. या ठिकाणी ३ प्रसूती, १५ शस्त्रक्रिया झाल्या आहेत. शस्त्रक्रियासह इतरही बऱ्याच तपासणी करण्यात आल्या. शासकीय वैद्यकीय रुग्णालयातील बाह्य़ रुग्ण विभागात रुग्णांवर उपचार करण्यात आले असून अनेक दाखल करण्यात आले.

सुरक्षेचा आढावा

डॉक्टरांना सुरक्षा देण्यावरून निवासी डॉक्टरांचा संप सुरू असताना पोलीस उपायुक्त रवींद्र परदेशी यांनी शासकीय वैद्यकीय रुग्णालयात अधिष्ठाता डॉ. अभिमन्यू निसवाडे यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली. यावेळी वैद्यकीय महाविद्यालयात असलेल्या सुरक्षेचा आढावा घेत असताना उद्यापासून बंदुकधारी पोलीस शासकीय रुग्णालयात तैनात करण्याची शक्यता आहे. मात्र, त्याबाबत रात्री उशिरापर्यंत कुठलाही निर्णय झाला नाही.

मागण्यांना न्याय द्यावा

रुग्णांच्या नातेवाईकांकडून डॉक्टरांवर होणारे हल्ले बघता सरकारने त्यांना सुरक्षा प्रदान करताना त्यांच्या मागण्यांना न्याय द्यावा आणि डॉक्टरांचे निलंबन मागे घ्यावे, अशी मागणी महाराष्ट्र सेल्स अ‍ॅन्ड मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह असोसिएशनने केली आहे. केंद्रीय व राज्य सरकारच्या अर्थसंकल्पात आरोग्यावरील खर्चात कपात केली आहे. त्यामुळे शासकीय रुग्णालयात सोयी सुविधांचा अभाव आहे. त्यातून डॉक्टरांवर हल्ल्याचे प्रमाण वाढले आहे. मार्ड व आयएमएच्या डॉक्टरांच्या सुरक्षेसाठी योग्य ती पावले उचलत सरकारने त्यात हस्तक्षेप करुन वैद्यकीय क्षेत्राला न्याय मिळवून दिला पाहिजे. केंद्र व राज्य सरकारच्या अर्थसंकल्पात आरोग्यावरील खर्च अर्थसंकल्पाच्या ५ टक्के करण्यात यावा तसेच औषधांवरील सर्वच कर रद्द करण्यात यावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली.

आम्ही समाधानी -डॉ. अविनाश वासे

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आयएमएच्या पदाधिकाऱ्यांसोबत चर्चा करून सुरक्षेबाबत दिलेले आश्वासन समाधानकारक आहे. मुख्यमंत्र्याच्या आश्वासनावर विश्वास आहे. त्यामुळेच आयएमएने संप मागे घेतला असून सायंकाळपासून खासगी रुग्णालये सुरू झाली आहेत, असे आयएमएचे नागपूर शाखेचे अध्यक्ष डॉ. अविनाश वासे यांनी सांगितले.