रुग्णांची उपचारासाठी भटकंती; वरिष्ठ निवासी डॉक्टरांसह ‘आयडीए’ही आंदोलनात

निवासी डॉक्टर रजेवर आणि खासगी दवाखाने बंद असल्याने रुग्णांना कमालीच्या गैरसोयींना तोंड द्यावे लागत असून आंदोलनात संपुष्टात येण्याची शक्यता नसल्याने याचा गंभीर परिणाम रुग्णसेवेवर झाला आहे. दरम्यान, इंडियन मेडिकल असोसिएशनसह आता इंडियन डेंटल असोसिएशनेही (आयडीए) डॉक्टरांच्या आंदोलनाला पाठिंबा देऊन दंतचिकित्सा थांबविली आहे. दरम्यान, शासकीय रुग्णालयातील प्रशासनाने सार्वजनिक आरोग्य विभागातील डॉक्टरांची मदत मागितली आहे.

गेल्या चार दिवसांपासून निवासी डॉक्टरांचे सामूहिक रजा आंदोलन सुरू असून त्यामुळे मेडिकल, मेयोतील रुग्णसेवा कोलमडली आहे. बुधवारी मेडिकल व मेयो प्रशासनाने शहरातील ४४० निवासी डॉक्टरांना निलंबित केले होते. त्यावर संतप्त होऊन ‘आयएमए’ने आंदोलनात उडी घेत शहरातील अत्यावश्यक सेवा वगळता इतर बाह्य़रुग्णसेवेसह सगळ्या तपासण्या बंद केल्या. गुरुवारी दुसऱ्याही दिवशी ६५० रुग्णालयांसह तपासणी केंद्रे बंद होते. उपचार न झाल्याने अनेकांना त्रास सहन करावा लागला. काही रुग्णालयांच्या बाह्य़रुग्णसेवा बंद असल्या तरी रुग्णांना अकस्मात विभागात घेत त्यांच्याकडून उपचाराकरिता जास्त पैसे आकारत त्यांची लूट केल्याचे नातेवाईकांनी सांगितले.

निवासी डॉक्टरांसह आंतरवासिता डॉक्टर सेवेवर नसल्याने शासकीय आरोग्य यंत्रणा कोलमडून गेली. त्यातच मेयोतील सुमारे ३७ वरिष्ठ निवासी डॉक्टरांसह शासकीय दंत महाविद्यालयातील ५० निवासी डॉक्टरही सामूहिक रजेवर गेल्याने रुग्णांचे हाल झाले. गुरुवारी मेडिकल, मेयोतील किरकोळ शस्त्रक्रिया पूर्णपणे ठप्प पडल्या असून फार कमी गंभीर शस्त्रक्रिया झाल्याचे पुढे आले. मात्र मेडिकल व मेयो प्रशासनाने रुग्ण सेवा सुरळीत असल्याचा दावा केला आहे. इंडियन डेंटल असोसिएशनेही डॉक्टरांच्या आंदोलनाला पाठिंबा देऊन गुरुवारपासून शहरातील १ हजार ६०० दवाखाने बंद केले.

वैद्यकीय शिक्षकांचा आज मूकमोर्चा

निवासी डॉक्टरांवरील हल्ल्यांचा निषेध व त्यांच्या सुरक्षेच्या मागणीला समर्थन देत महाराष्ट्र राज्य वैद्यकीय शिक्षक संघटनेकडून मेडिकलच्या अधिष्ठात्यांना निवेदन सादर झाले. त्यात शुक्रवारी मेडिकलमध्ये मूकमोर्चा काढत शासनाने पुढाकार घेत तातडीने मध्यममार्ग काढत रुग्णांसह निवासी डॉक्टरांना त्रास होऊ नये म्हणून कारवाई करण्याची मागणी करण्यात आली. याप्रसंगी डॉ. समीर गोलावार, डॉ. अमित दिसावाल यांच्यासह बरेच पदाधिकारी उपस्थित होते. राजपत्रित वैद्यकीय अधिकारी महासंघाचे राज्य सरचिटणीस डॉ. प्रमोद रक्षमवार यांनीही तातडीने दोन दिवसांत शासनाने डॉक्टरांना आवश्यक मदत न केल्यास मॅग्मोही आंदोलनात सहभागी होण्याची शक्यता व्यक्त केली.

निवासी डॉक्टरांकडून रक्तदान

सामूहिक रजा आंदोलनातील मेडिकलच्या निवासी डॉक्टरांनी गुरुवारी रक्तदान केले. याप्रसंगी तब्बल ८६ पिशव्या रक्त संकलित झाले. या रक्ताचे विविध घटक वेगळे होऊन मेडिकलच्या तीनशेहून जास्त रुग्णांना लाभ होईल. रक्तदान करणाऱ्यांत मार्डचे डॉ. शंतनू पेंडसे, डॉ. पुष्कराज देशमुख, डॉ. सागर गांधी, डॉ. अमोल ढगे यांच्यासह अनेकांचा सहभाग होता.

अप्रशिक्षित डॉक्टरांकडून सेवा

मेडिकल, मेयोच्या वार्डात डॉक्टरांचा तुटवडा असतानाच अप्रशिक्षित डॉक्टरांकडून सेवा घेतली जात आहे. मेडिकलच्या वार्ड क्रमांक ६ मध्ये हा अनुभव आला. येथे एका लहान मुलाला उपचाराकरिता सलाईन लावण्याकरिता कनिष्ठ डॉक्टरांनी सुमारे सहा वेळा सुई टोचली, परंतु त्याला रक्तवाहिनी सापडत नव्हती. शेवटी नातेवाईकांनी वरिष्ठ डॉक्टरांशी संपर्क साधल्यावर त्याने येऊन ही प्रक्रिया केली. याप्रसंगी लहान मुलगा वेदनेने रडत होता. हा प्रकार बऱ्याच वार्डात बघायला मिळत असून डॉक्टरांचा संप रुग्णांच्या जीवावर उठल्याचे दिसत आहे.

आयएमएचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

इंडियन मेडिकल असोसिएशनच्या कार्यालयात गुरुवारी बैठक झाली. त्यात निवासी डॉक्टरांच्या आंदोलनाला पाठिंबा देऊन आंदोलन कायम ठेवण्याचा निर्णय झाला. आयएमएकडून शुक्रवारपासून अत्यावश्यक सेवा बंद ठेवणार असल्याचे सांगण्यात आले असले तरी हा निर्णय स्थगित झाल्याने रुग्णांना अंशत: दिलासा मिळाला. त्यानंतर आयएमएच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना विविध मागण्यांचे निवेदन सादर केले. याप्रसंगी झालेल्या बैठकीत खासगी रुग्णालयांतील डॉक्टरांना आवश्यक सुरक्षा देण्यासह अनुचित प्रसंग टाळण्यावर गांभीर्याने चर्चा झाली. पोलिसांसह संबंधितांना डॉक्टर प्रोटेक्शन अ‍ॅक्टवर मार्गदर्शनही करण्याचा निर्णय याप्रसंगी झाला. बैठकीला आयएमएचे अध्यक्ष डॉ. अविनाश वासे, डॉ. प्रकाश देव, डॉ. मिलिंद माने यांच्यासह शहर पोलीस व इतर संबंधित विभागाचे प्रतिनिधी उपस्थित होते.

निवासी डॉक्टरांकडून रक्तदान

सामूहिक रजा आंदोलनातील मेडिकलच्या निवासी डॉक्टरांनी गुरुवारी रक्तदान केले. याप्रसंगी तब्बल ८६ पिशव्या रक्त संकलित झाले. या रक्ताचे विविध घटक वेगळे होऊन मेडिकलच्या तीनशेहून जास्त रुग्णांना लाभ होईल. रक्तदान करणाऱ्यांत मार्डचे डॉ. शंतनू पेंडसे, डॉ. पुष्कराज देशमुख, डॉ. सागर गांधी, डॉ. अमोल ढगे यांच्यासह अनेकांचा सहभाग होता.