विधिमंडळ अधिवेशनाच्या पूर्वसंध्येस सत्ताधारी-विरोधकांचे वाग्बाण

छोटय़ामोठय़ा कारणांवरून रडणारा नोबिता व त्याला मदत करणारा डोरेमॉन यांची दूरचित्रवाणीवरील कार्टूनमालिका बच्चेकंपनीच्या आवडीची.. तर, घनदाट जंगलात मुक्तपणे विहार करणारा मोगली हे प्रख्यात लेखक रुडयार्ड किप्लिंग यांच्या लेखणीतून साकारलेले पात्र आबालवृद्धांना प्रिय. डोरेमॉन व मोगली यांचा सांप्रतकाळच्या महाराष्ट्रातील राजकारणाशी काहीही संबंध नाही; मात्र तरीही ही दोन्ही पात्रे रविवारी या राजकारणात अवतरली. ‘राज्यातील देवेंद्र फडणवीस सरकार म्हणजे डोरेमॉन मालिका आहे’, असा टोला विरोधकांनी लगावला, तर त्यास ‘विरोधकांचा मोगली झाला आहे’, असा प्रतिटोला हजरजबाबी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लगावला. या शरसंधानाच्या पाश्र्वभूमीवर, आज, सोमवारी येथे सुरू होणाऱ्या विधिमंडळ हिवाळी अधिवेशनात सामान्यांच्या आयुष्यातील कुठल्या प्रश्नांचा वेध घेतला जातो, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

नोटाबंदीनंतर सामान्यांना होत असलेला त्रास, शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची मागणी आदी मुद्दय़ांच्या पाश्र्वभूमीवर विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन आज, सोमवारपासून नागपुरात सुरू होत असून, मराठा आरक्षणाच्या मुद्दय़ावर त्यात सत्ताधारी व विरोधक यांच्यात संघर्ष झडण्याची चिन्हे आहेत. विरोधकांनी रविवारच्या सरकारच्या चहापानावर बहिष्कार टाकला व आपला पुढील पवित्रा काय असेल, याची झलक दाखवली. विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील व विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी पत्रकार परिषदेत सरकारवर टीकेची झोड उठवली.

‘राज्यातील विविध प्रश्नांवरून जनतेचे लक्ष इतरत्र वळविण्यासाठी आभासी चित्र निर्माण करायचे, लोकांना स्वप्ने दाखवायची व प्रत्यक्षात काहीच करायचे नाही, असा देवेंद्र फडणवीस सरकारचा कारभार आहे. या सरकारची सध्याची अवस्था ही दूरचित्रवाणीवरील ‘डोरेमॉन’ या कार्टूनमालिकेसारखी झाली आहे’, असा हल्ला विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी रविवारी केला. ‘आम्ही कर्जमाफीची मागणी केल्यावर सरकार  जलसंधारणाची योजना जाहीर करते. आम्ही बेरोजगारांना कामे देण्याची मागणी करतो, तर ते मेक इन इंडियाची घोषणा करतात. आम्ही कायदा व सुव्यवस्थेकडे लक्ष वेधतो, त्यावर ते सर्वसामान्यांनाच देशद्रोही ठरविणारे कायदे आणतात. आम्ही महागाईचा विरोध करतो, त्यावर ते आठवडी बाजाराची संकल्पना मांडतात. आम्ही भ्रष्ट मंत्र्यांवर कारवाईची मागणी करतो, तर ते त्यांना क्लीनचिट देतात..’ असा पाढा वाचून, ‘लोकांना केवळ मूर्ख बनविण्याचा हा प्रकार आहे’, असे विखे म्हणाले. ‘असंवदेनशील सरकारचा हा ‘कोल्डप्ले’ आहे’, अशी टीका त्यांनी केली. आरक्षणाच्या प्रश्नावर सरकारला आलेले अपयश, नागरिकांना होत असलेला नोटाबंदीचा त्रास, शेतकऱ्यांची कर्जमाफी, राज्यातील बिघडलेली कायदा व सुव्यवस्था, कुपोषण आणि मंत्र्यांचे गैरव्यवहार आदी मुद्यांवर सरकार सपशेल अपयशी ठरल्याने सरकारच्या चहापानावर बहिष्कार टाकत असल्याचे यावेळी विखे आणि मुंडे यांनी जाहीर केले.

मुख्यमंत्र्यांचा प्रतिटोला

विरोधी नेत्यांच्या पत्रकार परिषदेनंतर संध्याकाळी पत्रकारांशी संवाद साधताना ‘डोरेमॉन’ टीकेचा समाचार घेतला. राज्यात नुकत्याच पार पडलेल्या नगरपालिका निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचा सर्वत्र विजय झाला. कमळाचे फूल सर्वत्र उगविले. त्यामुळे विरोधकांचा ‘मोगली’ झाला आहे, असा टोला त्यांनी लगावला. विधिमंडळ अधिवेशनाकडे विरोधक गांभीर्याने बघत असल्याचे वाटत नाही. डोरेमॉन, पोकेमॉन अशा बाबींमध्ये ते अडकले आहेत, अशी टिप्पणीही त्यांनी केली.

दोन समाजांत फूट पाडण्याचा प्रयत्न 

‘आरक्षणाच्या मुद्यावर मराठा समाज रस्त्यावर उतरला आहे. मात्र, सरकार त्यांचा प्रश्न सोडविण्याऐवजी या मुद्यावरून इतर समाजाला भडकाविण्याचा प्रयत्न करीत आहे. यामुळे दोन समाजांत तेढ निर्माण होण्याची शक्यता आहे. याचे परिमाण राज्यातील सामाजिक एकतेवर होण्याची भीकी आहे’, अशी टीका विखे आणि मुंडे यांनी केली. ‘धनगर, मुस्लिम आणि मराठा आरक्षणाच्या मुद्यावर सरकार वेळकाढू धोरण अवलंबित आहे’, असाही आरोप त्यांनी केला.

विरोधकांचे आरोप

  • ८ हजार बालकांचा कुपोषणामुळे मृत्यू
  • महाराष्ट्राची उद्योगक्षेत्रात पिछेहाट
  • आरक्षणाच्या मुद्यावर धनगर समाजाची फसवणूक
  • शिष्यवृत्तीपासून विद्यार्थी वंचित
  • मुख्यमंत्र्यांच्या नागपुरात गुन्हेगारी वाढली

नोटाबंदीमुळे शेतमाल खरेदी केंद्रे बंद

  • ‘पूर्वतयारी न करता नोटाबंदीचा निर्णय केंद्राने घेतल्याने त्याचा सर्वाधिक फटका सर्वसामान्य सहन करीत आहेत. जिल्हा बँकेची आर्थिक नाकेबंदी करण्यात आल्याने ग्रामीण अर्थव्यवस्था मोडकळीस आली आहे. खरेदी केंद्रे बंद आहे.
  • बँक व एटीएमच्या रांगेत लोकांचे बळी जात आहेत. या सरकारवर ३०२ अन्वये गुन्हे का नोंदविण्यात येऊ नयेत’, असा सवाल विखे यांनी केला. ‘नोटाबंदीची पूर्वकल्पना भाजपनेत्यांना होती. बिहार, पश्चिम बंगालमधील जमीन खरेदी प्रकरणातून ही बाब स्पष्ट होते’, असे विखे म्हणाले.
  • ‘नोटबंदीच्या घोषणेनंतर दुसऱ्याच दिवशी राष्ट्रीय पातळीवरील इंग्रजी दैनिकांमध्ये रोखविरहित व्यवहारासंदर्भात खासगी कंपन्यांच्या आलेल्या जाहिरातीही संशयास्पदच आहेत’, याकडे मुंडे यांनी लक्ष वेधले.

राज्यात नुकत्याच पार पडलेल्या नगरपालिका निवडणुकीत भाजपचा सर्वत्र विजय झाला. कमळाचे फूल सर्वत्र उगविले. त्यामुळे विरोधकांचा ‘मोगली’ झाला आहे.  – देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री

लोकांना स्वप्ने दाखवायची व प्रत्यक्षात काहीच करायचे नाही, असा देवेंद्र फडणवीस सरकारचा कारभार आहे. या सरकारची अवस्था ‘डोरेमॉन’ या कार्टूनमालिकेसारखी झाली आहे.  – राधाकृष्ण विखे पाटील, विरोधी पक्षनेते