डोके व घशाच्या कर्करोग दिनानिमित्त कार्यक्रम

भारतात डोके आणि घशाशी संबंधित कर्करुग्णांची संख्या वाढत असल्याचे धक्कादायक चित्र आहे. तंबाखू सेवन करणाऱ्यांची वाढती संख्या हे त्याचे प्रमुख कारण आहे. पहिल्या टप्यात या आजाराचे निदान झाल्यावर उपचाराने रुग्ण पूर्णपणे बरा होतो, असे मत नागपूर विभागाचे आरोग्य उपसंचालक डॉ. संजय जयस्वाल यांनी व्यक्त केले. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज प्रादेशिक कर्करोग रुग्णालयात डोके आणि घशाच्या कर्करोग दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.

कार्यक्रमाला इंडियन मेडिकल असोसिएशनच्या नागपूर शाखेचे अध्यक्ष डॉ. अविनाश वासे, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज प्रादेशिक कर्करोग रुग्णालयाचे संचालक डॉ. पंकज चौधरी, सहसंचालक डॉ. बी. के. शर्मा यांच्यासह बरेच मान्यवर उपस्थित होते. डॉ. जयस्वाल म्हणाले, नागपूरसह मध्य भारतातील अनेक नागरिकांमध्ये खर्रा, तंबाखूसह इतरही बरीच वाईट व्यसने आढळतात. मुखाचे वेगवेगळे कर्करुग्ण भारताच्या इतर भागाच्या तुलनेत मध्य भारतात सर्वाधिक आहेत. कर्करोग दूर करण्याकरिता प्रत्येकाने समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत तंबाखू सेवनाचे दुष्परिणाम पोहचवण्याची गरज आहे.

डॉ. अविनाश वासे म्हणाले, कर्करोगावर नियंत्रणाकरिता सगळ्या सामाजिक संस्थांनी एकत्र येऊन काम करण्याची गरज आहे. इंडियन मेडिकल असोसिएशनकडून कर्करोग नियंत्रणाकरिता जनजागृती केली जात आहे. डॉ. पंकज चौधरी म्हणाले, कर्करोगाच्या उपचारावर अनेक नवनवीन संशोधन होत आहे. त्यामुळे नवीन प्रभावी औषधही उपलब्ध होत आहे.  पहिल्या टप्यात कर्करोगाचे निदान झाल्यास रुग्णावर वेळीच उपचार होऊन तो बरा होतो. यामुळे त्याचा भविष्यातील त्रास व पैसाही वाचू शकतो. कार्यक्रमात डॉ. एस. बी. सप्रे यांनी कॅन्सरवरील स्लाईड शो सादर केला.

कार्यक्रमाला डॉ. आशिष दिसावाल, डॉ. दिनेश अग्रवाल, डॉ. आर. मालानी, डॉ. रिचा मेहता, डॉ. समीर चौधरी, डॉ. अंजली कोल्हे, डॉ. राधिका पागे, डॉ. मनीषा मिश्रा, डॉ. सरिता कोठारी, डॉ. अंजली पाटील, डॉ. पछेल, डॉ. प्रशांत ढोके, डॉ. सरकटे, डॉ. सरस्वती वृदूला, चौबे, स्टॅलिन उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालक सहायक संचालक बी. के. शर्मा यांनी तर अभार डॉ. रामकृष्ण छांगाणी यांनी मानले.