पिण्याच्या पाण्यात जंतू, स्वच्छतागृहात नळ नाही; डॉ. राम मनोहर लोहिया वाचनालयातील वास्तव

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नागपूर महापालिकेच्या एकाच वास्तूत असलेल्या डॉ. राम मनोहर लोहिया आणि उषाराणी महिला वाचनालयात कालबाह्य़ पुस्तकांवर विद्यार्थी स्पर्धा परीक्षेची तयारी करीत आहे. येथील मुलींसाठी बांधलेल्या नवीन सभागृहाला कुलूप असून पिण्याच्या पाण्यात जंतू आहेत. स्वच्छतागृहात नळ नाही.

कमाल चौकापासून काही अंतरावर असलेल्या डॉ. राम मनोहर लोहिया आणि उषाराणी महिला या वाचनालयात २४ तासाकरिता केवळ २ सुरक्षा रक्षक आहेत. वाचनालयात वर्ष २०१४ नंतर स्पर्धा परीक्षेचे एकही नवीन पुस्तक खरेदी करण्यात आले नाही. जुन्याच पुस्तकातून विद्यार्थी अभ्यास करतात. इमारतीत मुलींकरिता उषाराणी महिला वाचनालय असून तेथेही जागा कमी आहे.  तत्कालीन मंत्री डॉ. नितीन राऊत यांनी मुलींच्या सुविधेकरिता अद्ययावत सभागृह बांधून घेतले. तेथे अद्याप विद्युत जोडणी आणि फर्निचर मिळाले नाही. त्यामुळे लक्षावधी रुपये खर्चून बांधलेली ही वास्तू काही वर्षांपासून कुलूपबंद आहे. वाचनालयात पिण्याच्या पाण्याकरिता २ जलशुद्धीकरण यंत्र आहे, परंतु देखभाल दुरुस्ती होत नसल्याने पाण्यात जंतू निर्माण झाल्याचा विद्यार्थ्यांचा आरोप आहे.

मुलांच्या स्वच्छतागृहात नळ नाही, त्यामुळे बाहेरून पाणी आणावे लागते. मुलींकरिता येथे केवळ १ स्वच्छतागृह आहे. वाचनालयात बेवारस कुत्र्यांचा वावर आहे. मुलींच्या वाचनालयाच्या पहिल्या मजल्यावर कुलर व टाकाऊ वस्तू साठवून ठेवल्या आहेत. त्यात पावसाचे पाणी साचून डेंग्यूच्या अळ्या वाढण्याचा धोका आहे.

दूषित पाण्यामुळे कावीळ – राजेश चांदेकर

वाचनालयातील जलशुद्धीकरण उपकरण बंद असून मुलांना दूषित पाणी प्यावे लागते. या पाण्यात जंतू राहत असल्यामुळे मागे काही विद्यार्थ्यांना कावीळ झाला. त्यासंबंधित तक्रार महापालिकेच्या अधिकाऱ्यांना केल्यावरही कारवाई होत नाही. वाचलनालयाला नवीन जलशुद्धीकरण उपकरणांसह त्याची नियमित देखभाल होणे गरजेचे आहे, असे राजेश चांदेकर हा विद्यार्थी म्हणाला.

नवीन स्पर्धा पुस्तकांची गरज – सुबोध चहांदे

वाचनालयात उपलब्ध असलेल्या कालबाह्य़ पुस्तकांच्या जोरावर शहरातील विद्यार्थी सध्याच्या कोणत्याही स्पर्धात्मक परीक्षेत टिकाव धरू शकणार नाही. त्यामुळे येथे तातडीने नवीन स्पर्धा पुस्तकेखरेदीची गरज आहे. वाचनालयातील अनेक लाईट, पंखे बंद असल्याचाही मुलांना मन:स्ताप होत आहे, असे सुबोध चहांदे या विद्यार्थ्यांने सांगितले.

महापालिका सकारात्मक – अलका गावंडे

वाचनालयात विविध कामांकरिता निधीची अडचण असली तरी येथील कर्मचाऱ्यांकडून पाण्याची टाकी आणि पिण्याच्या वॉटर कुलरची नित्याने स्वच्छता केली जाते. वाचनालयातील नवीन फर्निचर, नवीन जलशुद्धीकरण उपकरण, वाढीव गार्ड, स्वच्छतागृहातील नळ्यांच्या तोटय़ा, पाण्याच्या टाकीतील पाणी वाया जाऊ नये म्हणून व्हॉल्व, मुलींच्या नवीन बांधलेल्या सभागृहात वीज जोडणी आणि इतर बऱ्याच कामांचे प्रस्ताव महापालिकेला सादर केले आहे. लवकरच ते मंजूर होऊन विद्यार्थ्यांना येथे आणखी चांगल्या सुविधा उपलब्ध होऊ शकतील. त्याकरिता स्थानिक लोकप्रतिनिधी आणि महापालिकेचे अधिकारी प्रयत्न करत आहेत.

– अलका गावंडे, सहाय्यक ग्रंथपाल, डॉ. राम मनोहर लोहिया वाचनालय.

मुलांनीही सहकार्य करण्याची गरज

महापालिकेने वाचनालयातील स्वच्छतागृहात नळाच्या तोटय़ा बसवताच त्या चोरीला जातात. पाण्याचा प्रश्न सोडवण्याकरिता नवीन बोअरवेल दिले, परंतु येथील टाक्या स्वच्छ ठेवल्या जात नाही. त्यामुळे संबंधित विद्यार्थ्यांसह तेथील प्रशासनानेही महापालिकेला सहकार्य करण्याची गरज आहे. महापालिकेकडे निधीची अडचण असून येथील विद्यार्थ्यांनीही काही निधी गोळा करून दुरुस्तीच्या कामात सहकार्य केल्यास त्यांना चांगल्या सोयी होऊ शकतात.

– विजय हुमणे, सहाय्यक आयुक्त, नागपूर महापालिका.

हजारो लिटर पाण्याची रोज नासाडी -निखिल रामटेके

वाचनालयातील पाण्याची टाकी नियमित स्वच्छ केली जात नाही. अनेक वेळा टाकी भरल्यावर ती ‘ओव्हर फ्लो’ होऊन रोज हजारो लिटर पाण्याची नासाडी होते. त्याच्या आवाजाने विद्यार्थ्यांना अभ्यासात लक्ष केंद्रित करता येत नाही. पाण्यामुळे इमारत परिसरात मोठय़ा प्रमाणावर शेवाळ तयार झाले असून त्यावरून पाय घसरून रोज कुणीतरी पडतो, असे निखिल रामटेके या विद्यार्थ्यांने सांगितले.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Dr ram manohar lohiya library in worse conditions
First published on: 04-10-2017 at 01:58 IST