पक्षांर्तगत धुसपूस असलेली काँग्रेस महापालिका निवडणुकीच्या तयारीला लागली असून भ्रष्टाचाराच्या दहा मुद्यांवरून भाजपला कोंडीत पकडण्याचे आणि विविध क्षेत्रातील नामवंतांचा सत्कार करून जनतेपर्यंत पोहोचण्याची दुहेरी रणनीती काँग्रेसने आखली आहे.

काँग्रेसला सलग दोनवेळा महापालिकेत विरोधी बाकावर बसावे लागले आहे. केंद्रात आणि राज्यातही सत्तेत नसताना महापालिका निवडणूक जिंकण्याचे आव्हान या पक्षासमोर आहे. या पाश्र्वभूमीवर गेल्या नऊ महिन्यांत महापालिकेत खासगी कंपन्यांना मिळालेली कंत्राटे आणि त्या कामात झालेला भ्रष्टाचार हा प्रमुख मुद्दा घेऊन काँग्रेस मैदानात उतरणार आहे. महापालिकेतील विविध सेवांचे खासगीकरण करण्यात आले आहे. पाणी पुरवठा वितरणाचे कंत्राट ओसीडब्ल्यूला देण्यात आले आहे. या करारामुळे महापालिकेला कोटय़वधी रुपयांचे नुकसान आणि नागरिकांना वाढीव पाणी दयके मिळाल्याचा मुद्दा निवडणूक मुद्दा राहणार आहे. शहर बस वाहतूक घोटाळा देखील यावेळी गाजणार आहे. केंद्र सरकारच्या जेएनएनयूआरएम योजनेंर्तगत मिळालेल्या कोटय़वधी रुपयांच्या बसेस खासगी कंपनीला चालवण्यास देण्यात आल्या. बसेसची वाट लावून कंत्राटदार पळून गेला. यामुळे महापालिकेला कोटय़वधी रुपयांचा फटका बसला आहे. याशिवाय कचरा उचलण्याच्या कामातही घोटाळा झाला आहे. कंत्राटदाराने कचऱ्याचे वजन वाढवण्यासाठी दगड आणि माती कचऱ्यात भरले होते. स्मशान घाटावर लाकूड पुरवण्यासाठी कंत्राटदार नेमण्यात आले. यातदेखील गैरव्यहार झाल्याचे उघडकीस आले. तसेच रस्त्यांवरील खड्डे, जेट पॅचर, फुटाळा तलावाजवळील मोकळ्या जागेचा गैरवापर, काछीपुरा येथील अतिक्रमण आणि नागार्जुन कंपनीने जलवाहिनी खरेदीत केलेला गैरव्यवहार हे मुद्दे लावून धरण्यात येणार आहेत. काँग्रेसने भ्रष्टाचाराचे दहा मुद्दे महापालिका आयुक्तांकडे सोपवले आहेत.

एकीकडे भ्रष्टाचाराच्या मुद्यांवरून भाजपचा विकासाचा चेहरा जनतेसमोर आणतानांच जनतेला पक्षाशी जोडण्यासाठी विविध उपक्रम राबण्यात येणार आहेत. दिवं. इंदिरा गांधी यांच्या ९९ व्या जयंतीच्या निमित्ताने कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहे. या कार्यक्रमात शहरातील नामवंत तसेच सामाजिक, क्रीडा, शैक्षणिक, सांस्कृतिक क्षेत्रातील नामवंत ९९ महिलांचा सत्कार करण्यात येणार आहे. या महिलांना प्रियदर्शनी पुरस्कार देण्यात येणार आहे. शहर काँग्रेसने या कार्यक्रमातून अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी गट अध्यक्षांना उद्दिष्टे ठरवून दिली आहे.

भ्रष्टाचारची १० प्रकरणे

महापालिकेत गेल्या नऊ वर्षांंत खासगी कंपन्यांशी झालेले करार आणि त्यात झालेला गैरव्यवहार, ओसीडब्ल्यूशी केलेल्या सदोष करारामुळे कोटय़वधींचे नुकसान, रस्त्यांवरील खड्डे, स्टार बस प्रकरणात महापालिकेला फटका, केबल डक्ट धोरणाचे उल्लंघन, घाटावर लाकूड घोटाळा, जेट पॅचरची चुकीची देयके, फुटाळा तलावाजळील मोकळ्या जागेचा गैरवापर, कनक सिर्सोस कचरा घोटा, काछीपुरा येथील अतिक्रमणात बडय़ा व्यावसायिकांना संरक्षण आणि नागार्जुन कंपनीने जलवाहिन्या खेरदी केलेला गैरव्यवहार यांचा समावेश आहे.

महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांना ८ ऑगस्ट २०१६ ला महापालिकेतील घोटाळ्याची यादी दिली आहे. सभागृहात सातत्याने हे मुद्दे उपस्थित केले. यातील काही प्रकरणात महापौर प्रवीण दटके यांनी चौकशी, कारवाईचे निर्देश दिले. परंतु सभागृह संपल्यावर त्यांच्या निर्देशांचे काय होते, हे कळायला मार्ग नाही. त्यामुळे आता सत्ताधारी भाजपकडून अपेक्षा नाही. आयुक्तांनी या मुद्यांवरून २४ ऑगस्टला बैठक बोलावण्यात येईल, असे सांगितले होते. परंतु त्यांना त्या दिवशी मुंबईला जावे लागल्याने ती बैठक झाली नाही. काँग्रेस या मुद्यांवरून भाजपला सोडणार नाही.

– विकास ठाकरे,, महापालिकेतील विरोधी पक्षनेते.