एकनाथ खडसे यांचे स्पष्टीकरण

पुणे जिल्ह्य़ातील भोसरी जमीन खरेदी प्रकरणात कुठलाही गैरव्यवहार झाला नाही, सर्व प्रक्रिया कायदेशीर बाबी तपासूनच पूर्ण करण्यात आली होती, असा सातत्याने दावा करीत आलेले व या प्रकरणात आपल्याला निष्कारण गोवण्यात आले, असा आरोप करणारे भाजप नेते व व माजी महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी आता व्यवहाराशी आपला काहीही संबंध नसल्याची भूमिका घेत या प्रकरणाला नवीन वळण देण्याचा प्रयत्न केला आहे. या प्रकरणी २७ तारखेला पुन्हा सुनावणी आहे.

भोसरी जमीन खरेदी प्रकरणात गैरव्यवहार झाल्याचे आरोप झाल्यावर खडसे यांना राजीनामा द्यावा लागला होता व या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी शासनाने न्या. झोटिंग समिती नेमली होती. सहा महिन्यांपासून समितीचे कामकाज सुरू आहे. सध्या ही प्रक्रिया अंतिम टप्प्यात असून  खडसे यांना आज उलटतपासणीसाठी बोलविण्यात आले होते. आज त्यांची मुख्य साक्ष नोंदविण्यात आली. त्यात त्यांनी या प्रकरणाशी आपला काहीही संबंध नाही, असे स्पष्ट करीत या व्यवहाराची माहिती आपणास पाच जून रोजी मिळाली असे सांगितले. त्यानंतर एमआयडीसीच्या वकिलांनी त्यांची उलटतपासणी घेतली. खरेदी व्यवहाराचा गाजावाजा झाल्यावर खडसे यांनी ही संपूर्ण प्रक्रिया कायदेशीर बाबी तपासूनच पूर्ण करण्यात आली, असे सांगितले होते. मग आता या व्यवहाराची माहिती नाही, असे म्हणने सयुक्तिक आहे का?, कुटुंबाशी संबंधित व्यक्तींमध्ये ३.७५ कोटींचा व्यवहार झाला असताना याची माहिती खडसे यांना नसणे शक्य आहे काय?  तसेच या प्रकरणामुळे खडसे यांनी ३ जून २०१६ ला राजीनामा दिला होता.

मग त्यांना पाच जूनला माहिती कशी कळली? आदी प्रश्न उलटतपासणीदरम्यान खडसे यांना विचारण्यात आले. त्यावर उत्तर देताना खडसे यांनी, ‘आपला या व्यवहाराशी काहीही संबंध नाही, यासंदर्भात काहीच माहिती नव्हती,’ असे सांगितले. या प्रकरणात खडसे यांच्या बाजूने वरिष्ठ अधिवक्ता एम.जी. भांगडे यांनी तर एमआयडीसीच्या वतीने अ‍ॅड्. चंद्रशेखर जलतारे यांनी समितीपुढे बाजू मांडली.