भाजप नेते व माजी महसूल मंत्री एकनाथ खडसे यांच्यावरील जमीन घोटाळ्याच्या आरोपाची चौकशी मुख्यमंत्र्यांच्या नागपूरमधून होणार आहे. चौकशी करण्यासाठी नियुक्त सेवानिवृत्त न्या. डी.एस. झोटिंग यांना येथील रविभवनात कार्यालयासाठी जागा देण्यात आली आहे. या चौकशीकडे सर्व राज्याचे लक्ष लागले आहे, हे  उल्लेखनीय.

पुणे जिल्ह्य़ातील भोसरी एमआयडीसीतील जमीन खरेदी प्रकरणावरून खडसे यांना मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. या प्रकरणाची सेवानिवृत्त न्यायूमर्तीकडून चौकशी केली जाईल, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडमवीस यांनी केली होती. त्यानुसार मूळचे नागपूरकर न्या.डी.एस. झोटिंग यांची यासाठी नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्या कार्यालयासाठी रविभवनात कॉटेज क्रमांक १३ मध्ये जागा देण्यात आली आहे. आवश्यक त्या सर्व सुविधा त्यांना उपलब्ध करून देण्यात येणार असून लवकरच त्यांच्या कामकाजालाही सुरुवात होणार आहे. खडसे यांच्यासारख्या वरिष्ठ मंत्र्यांना गैरव्यवहाराच्या आरोपावरून राजीनामा द्यावा लागल्याने त्याची राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा आहे. मुख्यमंत्र्यांनीच खडसे यांचा ‘काटा’ काढला, असा आरोप होत आहे. राजीनामा द्यावा लागल्याने खुद्द खडसे सुद्धा नाराज आहेत.