निवडणूक अधिकाऱ्यांना दमदाटीचा आरोप; निवडणूक आयोगाकडून दखल

पशुसंवर्धन व दुग्धविकासमंत्री महादेव जानकर पुन्हा वादाच्या भोवऱ्यात सापडले असून निवडणूक अधिकाऱ्यांना दमदाटी व निवडणूक कामात हस्तक्षेप केल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे. जानकर यांचा राजीनामा व त्यांच्यावर कारवाईच्या मागणीसाठी विरोधक विधिमंडळात आक्रमक होण्याची शक्यता आहे. मात्र विरोधक पराचा कावळा करीत असल्याचे जानकर यांनी ‘लोकसत्ता’ला सांगितले.

shrikant shinde latest marathi news
“आमचं काम बोलतं”, कल्याण लोकसभेत श्रीकांत शिंदेंची प्रचार मोहीम; शिळफाटा रस्त्यावर विविध विकास कामांचे होर्डींग
annual session of china s top political advisory body
सगळे आलबेल असल्याची बतावणी?
Gajanan Kirtikar
शिंदे गटाचे खासदार गजानन किर्तीकरांनी सुनावले; म्हणाले, “भाजपाला जनतेचा भक्कम पाठिंबा, ईडीचे प्रयोग थांबवले पाहिजे”
Eknath Shinde Speech in Nagpur
“बाळासाहेब ठाकरेंनी नितीन गडकरींना दिलं होतं टोपणनाव”, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी भाषणात सांगितला ‘तो’ किस्सा

जानकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याविषयी टिप्पणी केली होती व अन्यही मुद्दय़ांवर वक्तव्ये केल्याने वाद निर्माण झाला होता. आता निवडणूक अधिकाऱ्यांना त्यांनी केलेला दूरध्वनी वादात सापडला आहे. काँग्रेसचा अर्ज स्वीकारू नये व कपबशी हे चिन्ह उमेदवाराला द्यावे, अशा सूचना जानकर यांनी देसाईगंज नगरपालिका निवडणूक अधिकाऱ्यांना दिल्याची ध्वनिचित्रफीत उघड झाली आहे. त्यामुळे काँग्रेसने जानकर यांच्यावर कारवाईची मागणी केली आहे. विधिमंडळातही मंगळवारी याचे पडसाद उमटण्याची शक्यता आहे.

दरम्यान, जानकर यांची आचारसंहितेचा भंग केल्याची तक्रार काँग्रेसच्या वतीने निवडणूक आयोगाकडे करण्यात आली. काँग्रेस उमेदवाराचा अर्ज बाद ठरवा म्हणून जानकर हे निवडणूक अधिकाऱ्यावर दबाव आणीत असल्याचे ध्वनिफितीत स्पष्टपणे दिसत असल्याची तक्रार मुश्ताक अंतुले, डॉ. राजू वाघमारे यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेसच्या शिष्टमंडळाने आयोगाकडे केली.

विरोधक हे पराचा कावळा करीत असल्याचा दावा महादेव जानकर यांनी केला. मोटवानी हे काँग्रेसमधून राष्ट्रीय समाज पक्षात दाखल झाले. त्यांना काँग्रेसने बी फॉर्म दिलेला नाही. ते रासपचे उमेदवार होते. त्यामुळे त्यांचा तो अर्ज स्वीकारून कपबशी चिन्ह देण्याची विनंती निवडणूक अधिकाऱ्यांना केली. मी त्यांना दमदाटी केलेली नाही, अशी सारवासारवही जानकर यांनी केली.

जानकर यांना निवडणूक आयोगाची नोटीस

गडचिरोली जिल्ह्य़ातील देसाईगंज नगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेस उमेदवाराचा अर्ज बाद करा आणि उमेदवारांना ठराविक चिन्ह द्या म्हणून निवडणूक निर्णय अधिकाऱ्यावर दबाव आणणारे दुग्धविकासमंत्री महादेव जानकर यांना निवडणूक आयोगाने सोमवारी नोटीस बजाविली आहे. २४ तासांच्या आत खुलासा करावा आणि या कालावधीत खुलासा प्राप्त न झाल्यास उपलब्ध पुराव्यांच्या आधारे योग्य ती कारवाई केली जाईल, असे राज्य निवडणूक आयोगाने जानकर यांना पाठविलेल्या नोटीशीत नमूद केले आहे.

नगर परिषदेच्या निवडणुकांमध्ये विशिष्ट निर्णय घेण्यासाठी एका अधिकाऱ्याला धमकावणारे पशुसंवर्धन व दुग्धविकासमंत्री महादेव जानकर यांच्यासह भ्रष्टाचारासह सत्तेचा दुरुपयोग करण्याचा आरोप असलेल्या मंत्र्यांचे दोन दिवसात या अधिवेशनात राजीनामे मागणार आहे.

नारायण राणे, काँग्रेस नेते