अडीच महिन्यात ११ बळी; दोन कर्मचाऱ्यांसह चौघे जखमी

ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या नागपूर जिल्ह्य़ात गेल्या अडीच महिन्यात विजेचा धक्का लागून मृत्यू झालेल्यांची संख्या ११ वर गेली आहे. महावितरणच्या दोन कर्मचाऱ्यांसह इतर चौघे गंभीर जखमी झाले आहे. बहुतांश ठिकाणी उघडय़ावरील वीज वाहिन्यांमुळे सामान्यांचे बळी जात असताना प्रशासनाचे मात्र याकडे दुर्लक्ष झाले आहे.

नागपूर जिल्ह्य़ात गेल्या वीस दिवसांत एसएनडीएल व महावितरण या दोन्ही वीज वितरण कंपन्या अखत्यारितील भागात उच्चदाब वीज वाहिनीच्या स्पर्शामुळे सुगतनगर परिसरातील जुळ्या भावंडांचा मृत्यू झाला होता. सुभाषनगर, हिंगणा, सावनेर, कामठी, मौदा परिसरात प्रत्येकी एक घरातील वीज यंत्रणांतील दोषांमुळे ४ जणांचा होरपळून मृत्यू झाला. शहरातील १४१ वीज वाहिन्या उघडय़ावर असून त्या शेजारी राहणाऱ्या लक्षावधी नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे.

या घटनांमुळे वीज यंत्रणेच्या शेजारी मोठय़ा प्रमाणात होणारी बांधकामे, अतिक्रमण व त्यामुळे उद्भवणाऱ्या धोक्याला बिल्डर, स्थानिक स्वराज्य संस्था, वीज कंपनी, ग्राहकांसह इतर कोण, कोण जबाबदार आहे? हा प्रश्न उपस्थित झाला आहे.

चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे ऊर्जामंत्रीपदाची जबाबदारी आल्यावर ते गेल्या काही वर्षांपासून सतत नागपूर शहरासह ग्रामीण भागात भूमिगत वाहिन्या टाकण्याची घोषणा करत आहे, परंतु प्रत्यक्षात काम सुरू होत नाही. वीज कंपनीच्या नोंदीनुसार नागपूर जिल्ह्य़ात गेल्या अडीच महिन्यात ११ जणांचा मृत्यू उघडय़ा वीज वाहिन्यांमुळे तसेच घरातील वीज यंत्रणेतील दोषामुळे झाला.

सोबत वीज अपघातात जिल्ह्य़ात महावितरणच्या दोन कर्मचाऱ्यांसह चौघे गंभीर जखमी झाले. संख्या कमी असल्यामुळे बऱ्याच घटनांची माहिती कंपनीपर्यंत पोहोचलीही नसल्याचे स्पष्ट होते.

नागपूर शहराचा केंद्र सरकारच्या स्मार्ट सिटी योजनेत समावेश आहे. तेव्हा त्यानंतरही तातडीने येथे भूमिगत वाहिन्यांचे काम सुरू होत नसल्याने व मृत्यू वाढत असल्याने ऊर्जामंत्र्यांच्या त्यांच्याच जिल्ह्य़ातील वीज कंपन्यांवरील प्रभावाबाबतही गंभीर प्रश्न नागरिकांमधून उपस्थित होत आहे.