शेजारील राज्यांत उद्योगांना कमी दराने वीज पुरवठा; रोजगाराचा प्रश्न जटिल होण्याची चिन्हे
विदर्भातील औद्योगिक वीज दर कमी करण्याकरिता राज्य शासनाने एका उच्चस्तरीय समितीकडून शेजारच्या चार राज्यांतील वीज यंत्रणेचा अभ्यास केला. अहवालात तेलंगणात महाराष्ट्राच्या तुलनेत जास्त दराने विजेची खरेदी होत असतांनाही त्या राज्यात महाराष्ट्राहून सुमारे सवा रुपये प्रती युनिटने स्वस्त वीज उद्योगांना दिली जात असल्याचे पुढे आले. तेव्हा महाराष्ट्रातील उद्योग महागडय़ा विजेमुळे कसे वाढणार व येथे नवीन रोजगाराच्या संधी कशा उपलब्ध होतील, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
महाराष्ट्राच्या शेजारी असलेल्या अनेक राज्यांच्या तुलनेत येथे उद्योगांना दिल्या जाणाऱ्या विजेचे दर जास्त आहेत. त्यामुळे मोठे उद्योजक महाराष्ट्राला नवीन प्रकल्पांकरिता पसंती देत नाहीत. राज्यातील अनेक जुने प्रकल्पही शेजारील राज्यात स्थानांतरित होण्याचे प्रमाण वाढले आहे. राज्यात सर्वाधिक वीज निर्मिती विदर्भात होऊनही त्याचा लाभ मात्र येथील उद्योगांना होतांना दिसत नाही. त्यामुळे आधीच मागासलेल्या विदर्भ व मराठवाडय़ात नवीन उद्योग सुरू होण्यास अडचण निर्माण होते. तेथे उद्योग वाढून याही भागाचा औद्योगिक विकास व्हावा यासाठी शासनाकडून औद्योगिक वीज दर कमी करण्याबाबत अभ्यास करण्यासाठी एक १३ सदस्यीय समिती गठीत केली होती.
समितीने विविध गट तयार करून छत्तीसगड, मध्यप्रदेश, कर्नाटक, तेलंगणा या औद्योगिक वीज दर कमी असलेल्या राज्यांचा अभ्यास केला. त्याची तुलना महाराष्ट्रातील दरांशी करून तसा अहवालही महाराष्ट्र शासनाला नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात सादर केला.
त्यानुसार महाराष्ट्रासह शेजारच्या पाच राज्यांत सर्वात कमी दरात विजेची खरेदी ही छत्तीसगडला सुमारे ३ रुपये ३ पैसे प्रती युनिट, तर सर्वात महाग दराने वीज खरेदी ही तेलांगणात सुमारे ३ रुपये ८८ पैसे प्रती युनिट दराणे होत असल्याचे तेथील वीज नियामक आयोगाच्या निर्णयावरून पुढे आले. सोबत मध्य प्रदेशात सुमारे ३ रुपये १३ पैसे, कर्नाटकात सुमारे ३ रुपये २० पैसे, महाराष्ट्रातात सुमारे ३ रुपये ७० पैसे प्रती युनिट दराने वीज खरेदी होत असल्याचे पुढे आले.
ही खरेदी वेगवेगळ्या राज्यात तेथील वेगवेगळ्या वीज निर्मिती करणाऱ्या कंपन्यांकडून वेगवेगळ्या दरात होत असून नमूद केलेले दर हे सरासरी स्वरुपातील असल्याची माहिती आहे. छत्तीसगड सरकार उद्योगांसह सगळ्याच वीज ग्राहकांना वीज दर कमी ठेवण्याकरिता प्रत्येक वर्षांला ४५० कोटी रुपयांचे विशेष अनुदान देत असून इतरही काही राज्यांकडून असले अनुदान दिल्या जात असल्याची माहिती आहे.
त्यामुळेच छत्तीसगडसह इतर राज्यातील औद्योगिक वीज दर कमी असून तेथील उद्योगांचा विकास दर जास्त आहे. तेलांगणा या राज्यात इतर राज्यांच्या तुलनेत जास्त दराने विजेची खरेदी होत असली तरी उद्योगांना मात्र महाराष्ट्राहून स्वस्त वीज दिल्या जात असल्याचेही अहवालात पुढे आले आहे.
त्यामुळे उद्योजक हे महाराष्ट्राच्या तुलनेत विजेचे पैसे वाचवण्याकरिता छत्तीसगड, तेलंगणासह शेजारच्या राज्यांना पसंती देत आहे. अहवालात उद्योगांना दिल्या जाणाऱ्या वीज दरावर सर्वात स्वस्त वीज ही छत्तीसगड राज्यात सुमारे ४ रुपये ५० पैसे प्रती युनिट दराने दिल्या जात असून सगळ्याच महाग वीज मात्र महाराष्ट्राकडून ७ रुपये २१ पैसे प्रती युनिटच्या जवळपास दिल्या जात आहे. मध्य प्रदेशात उद्योगांना सुमारे ५ रूपये ३५ पैसे प्रती युनिट, कर्नाटकात ५ रुपये ७० पैसे प्रती युनिट, तेलंगणा येथे ६ रुपये प्रती युनिट दराने वीज विक्री केल्या जात आहे. उद्योगांना वेगवेगळ्या गटानुसार दर असून नमूद दर हे सरासरी स्वरुपातील आहे.

सरासरी वीज विक्री दर
राज्य दर (रु.)
महाराष्ट्र ४.१३
मध्यप्रदेश ४.८४
छत्तीसगड ३.९०
कर्नाटक ३.५९
तेलंगणा ५.६४