कापड मिल, आयटी कंपन्या, बँका आणि प्रसारमाध्यमे इत्यादी क्षेत्रातील लाखो लोकांना गेल्या तीन वर्षांमध्ये रोजगारावर पाणी सोडून घरी बसावे लागले आहे. मात्र, काँग्रेस शासनात करण्यात आलेल्या अन्न सुरक्षा कायद्याने गृहविज्ञान विभागाच्या विद्यार्थ्यांना रोजगाराची अनेक दालने खुली केली हे विशेष.

केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयांतर्गत येणाऱ्या भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणाने (एफएसएसएआय) अनेक नवीन योजना देशभरात लागू केल्या आहेत. अन्न सुरक्षा कायद्यात अन्न सुरक्षा प्रशिक्षण महत्त्वाचे असून त्यासाठी लागणाऱ्या पायाभूत सुविधा, मनुष्यबळ विदर्भात उपलब्ध नाही. महाराष्ट्राची उपराजधानी असलेल्या नागपुरातही अन्न सुरक्षेच्या संदर्भात आवश्यक प्रशिक्षण देणाऱ्या संस्था केवळ १ टक्का आहेत आणि नेमके याच क्षेत्रात मोठय़ा प्रमाणात रोजगार उपलब्ध आहेत. कारण गृह विज्ञान क्षेत्रात पदविका, पदवीधर विद्यार्थिनींना प्रशिक्षक, शिक्षक, अन्न अधिकारी, अन्न व्यवस्थापक, अन्न लेखाधिकारी, अन्न स्वच्छता अधिकारी, आरोग्य अधिकारी अशी बरीचशी पदे निर्माण होऊन नोकऱ्यांची दालने उघडी होणार असल्याचे ‘अन्न सुरक्षा सेवा’च्या संचालक डॉ. अस्मिता ठवकार यांनी सांगितले. तसेच हे क्षेत्र येत्या एक-दोन वर्षांतच महिलांसाठी रोजगाराची अनेक दालने खुली करेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. ‘अन्न सुरक्षा सेवा’ ही एफएसएसएआयची विदर्भातील मान्यताप्राप्त संस्था असून नागपुरात अन्न सुरक्षेसंबंधीचे प्रशिक्षण देऊन त्यांना मान्यता देणारी एकमेव संस्था आहे.

नागपूर विद्यापीठाशी संलग्नित फार मोजक्या महाविद्यालयांमध्ये गृह विज्ञान हा अभ्यास शिकवला जातो आणि मुख्य म्हणजे ही शाखा मुलांसाठी निषिद्ध आहे.

विद्यापीठाच्या पदव्युत्तर गृह विज्ञान विभागात रोजगाराच्या संधीही मोठय़ा आहेत. त्यात आणखी या कायद्यामुळे नवीन रोजगारांचा वाव असल्याचे स्पष्ट होते.

ज्या ठिकाणी खाद्यपदार्थाचा संबंध येतो त्याठिकाणी ग्राहकांच्या अन्न सुरक्षेशी संबंध येतो. त्यामुळे पॅकेजिंग, रिटेलर्स, भाजीविक्रेते, छोटी किराणा दुकानेच नव्हे तर अगदी घरगुती भोजन पुरवणाऱ्यांनाही एफएसएसएआयची मान्यता आवश्यक आहे. त्याचेही काही नियम आहेत. कारण परवाना कुणाला द्यायचा आणि नोंदणी कुणाची करायची, याविषयी नियम तयार करण्यात आले आहेत. घरगुती जेवण तयार करून डबे पुरवणारे पूर्वी या कायद्यांतर्गत येत नव्हते. ते देखील आज अन्न सुरक्षा कायद्यांतर्गत येत आहेत. त्यामुळेच अन्न, पोषण मूल्य, अन्न सुरक्षेचा संबंध असलेल्या गृहविज्ञान विभागाच्या विद्यार्थ्यांना प्रशिक्षक, शिक्षक, अन्न अधिकारी, अन्न व्यवस्थापक, अन्न लेखाधिकारी, अन्न स्वच्छता अधिकारी, आरोग्य अधिकारी अशी कितीतरी नवीन पदे निर्माण होऊन रोजगाराच्या संधी वाढणार आहेत.

डॉ. अस्मिता ठवकार, संचालक, अन्न सुरक्षा सेवा