गेल्या तीन वर्षांमध्ये अभियांत्रिकी आणि इतरही व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या महाविद्यालयांमधील विद्यार्थी संख्येला कात्री लागली असल्याने यावर्षी महाविद्यालय बंद पडण्याचा वेग वाढला आहे.
गेल्यावर्षी अभियांत्रिकीची ५८ महाविद्यालये असताना यावर्षी ५५ आहेत. बुटीबोरीचे बाबा मुळक अभियांत्रिकी महाविद्यालय, अनीस अहमदचे सेंट्रल इंडिया इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नालॉजी आणि वर्धा मार्गावरील व्हीएमआयटी ही महाविद्यालये प्रवेशाअभावी बंद स्थितीत आहेत. तसेच एमबीए अभ्यासक्रमांचीही दोन महाविद्यालये बंद झाल्याचे सहसंचालक कार्यालयाचे म्हणणे आहे. गेल्यावर्षी एमबीएची ५६ महाविद्यालये होती. त्यानंतर रायसोनीचे रायसोनी स्कूल ऑफ बिझिनेस अशी दोन महाविद्यालये बंद पडली आहेत. औषधनिर्माण शास्त्र, हॉटेल मॅनेजमेंट, एमसीए आदींविषयी अद्याप तशी परिस्थिती उद्भवलेली नाही. मात्र, नागपूर विभागातील सहा जिल्ह्य़ांमध्ये केवळ एक शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय असून विद्यापीठ संचालित लक्ष्मीनारायण तंत्रशिक्षण संस्था सोडल्यास उर्वरित विनाअनुदानित महाविद्यालये आहेत. त्यातील ३५ महाविद्यालयांमध्ये बराच अभाव असतानाही नागपूर विद्यापीठाच्या महाविद्यालये आणि विद्यापीठ विकास मंडळाने अद्यापपर्यंत त्यांची नावे जाहीर केलेली नाहीत.
विद्यार्थी नसणे आणि महाविद्यालय बंद पडणे हा परिपाठ यावर्षी जास्त वेगाने गिरवला जात आहे. अभियांत्रिकी, एमबीएच्या अभ्यासक्रमाबरोबरच काही महाविद्यालयांतील निवडक अभ्यासक्रमांना कात्री लागणार असल्याची चिन्हे दिसत आहेत. विद्यार्थी प्रवेशाच्या अभावी महाविद्यालयांतील प्राध्यापक आणि प्राध्यापकेतर कर्मचाऱ्यांचे पगार थांबवणे, त्यासाठी त्यांना आंदोलन करावे लागणे, काहींनी न्यायालयात धाव घेणे, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाने पायाभूत सुविधा नसलेल्या अभियांत्रिकी महाविद्यालयांचे संलग्नीकरण गोठवण्याचा इशारा देणे, उच्च शिक्षण सहसंचालक कार्यालयाच्या वतीने बीएड, एमएड, बीपीएड, एमपीएड महाविद्यालयांची तपासणी केल्यानंतर अनेक महाविद्यालयांमध्ये पायाभूत सुविधांचा अभाव असल्याचे स्पष्ट होत असल्याने पूर्वीची व्यावसायिक अभ्यासक्रमांची रया गेली की काय? असा प्रश्न निर्माण होतो.
यासंदर्भात नागपूर विभागाचे तंत्रशिक्षण सहाय्यक संचालक संदीप तडस म्हणाले, गेल्या तीन वर्षांत ३० टक्के जागा रिक्त राहात असल्याचे दिसून येते. महाविद्यालये चालवण्यासाठी कमीत कमी प्रवेशाची कुणीही अपेक्षा करेलच, पण प्रवेशच झाले नसतील तर ती चालवणे शक्य नाही. महाविद्यालये बंद करण्यासंबंधीचा शासन निर्णय अद्याप जाहीर व्हायचा आहे. दोन-तीन दिवसात शासन निर्णय येईल. त्यानंतर बंद करण्यात आलेली महाविद्यालये व अभ्यासक्रमांचे चित्र स्पष्ट होईल.
पदव्युत्तर व्यवसाय व्यवस्थापन (एमबीए) आणि मास्टर इन मॅनेजमेंट स्टडिज (एमएमएस) या अभ्यासक्रमांचे ऑनलाईन प्रवेश आजपासून सुरू झाले असून त्यात अर्ज जमा करणे, कागदपत्रांची छाननी, अर्ज निश्चितीसाठी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या विधि महाविद्यालयाच्या प्रांगणातील व्यवसाय व्यवस्थापन विभागात सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्याचे मुंबई कार्यालयाने कळवले आहे.