• राज्यातील १७ हजार जागांना कात्री
  • सहा महाविद्यालये बंद, ११३ महाविद्यालयांच्या

१० टक्के जागा घटवल्या

अभियांत्रिकीच्या जागांना लावलेली कात्री आणि एमएचटी-सीईटीला मिळालेला भरघोस प्रतिसाद यामुळे अभियांत्रिकीच्या महाविद्यालयांना विद्यार्थी न मिळण्याची चिंता यावर्षीतरी संपुष्टात आली आहे. यावर्षी राज्यभरात १७ हजार जागा कमी करण्यात आल्या असून, त्यामध्ये ११३ महाविद्यालयांमधील १० टक्के प्रवेश घटवण्यात आले आहेत. सहा महाविद्यालये बंद करण्यात आली आहेत. त्यामुळे अभियांत्रिकीच्या जागा रिक्त राहण्याची शक्यता यावर्षी तरी मावळली आहे.

गेल्यावर्षी राज्यात तब्बल ३५ हजार जागा रिक्त राहिल्या होत्या. शिवाय काही महाविद्यालये बंददेखील करण्यात आली होती. काहींना केवळ महिलांसाठी असलेली महाविद्यालये पुरुषांसाठीही खुली करावी लागली. अभियांत्रिकी महाविद्यालयांना विद्यार्थीच मिळत नसल्याने शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा मोठा प्रश्न उपस्थित झाला असून, विदर्भात ठिकठिकाणी अभियांत्रिकी महाविद्यालयांच्या व्यवस्थापनांना शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा रोष पत्करावा लागला. या पाश्र्वभूमीवर राज्य शासनाने अभियांत्रिकीच्या जागाही कमी केल्या आहेत आणि एमएचटी-सीईटीचा चांगल्या निकालानंतर पात्र विद्यार्थ्यांची यादीही मोठी आहे.  गेल्यावर्षी जेईई-मुख्य परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांमधून अभियांत्रिकीला प्रवेश करण्यात येत होते.

जेईई- मुख्य परीक्षा ही केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या (सीबीएसई) धर्तीवर असल्याने काठीण्य पातळी जास्त होती आणि अवघड अभ्यासक्रम म्हणून काही मुले ती परीक्षा देणे टाळतही होते. यावर्षी राज्य शासनानेच व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी एमएचटी-सीईटी घेतल्याने विद्यार्थी मोठय़ा प्रमाणात या क्षेत्राकडे वळले. शिवाय केंद्र शासनाच्या कौशल्य शिक्षण, डिजिटल इंडिया, स्टार्ट अप इंडिया या योजनांचाही सकारात्मक प्रभाव विद्यार्थ्यांवर पडला. या क्षेत्रात पुढे चांगल्या संधी उपलब्ध होतील, या आशेने विद्यार्थ्यांनी मोठय़ा प्रमाणात एमएचटी-सीईटीला हजेरी लावली.

यासंदर्भात तंत्रशिक्षण सहसंचालक दयानंद मेश्राम म्हणाले, पायाभूत सुविधांचा अभाव राज्यातील अनेक महाविद्यालयांमध्ये आहे. म्हणूनच सहा विद्यालये बंद करण्यात आली असून ११३ महाविद्यालयांमध्ये शिक्षण, शिक्षकेतर कर्मचारी आणि इतर सुविधांची कमतरता तपासणी दरम्यान आढळून आल्याने त्यांच्या १० टक्के जागांची कपात करण्यात आली आहे. राज्यात एकूण १७ हजार जागा कमी करण्यात आल्या आहेत.

कामगिरी चांगली, कलही वाढला!

गेल्यावर्षी अभियांत्रिकीला उतरती कळा होती. यावर्षी मुलांनी चांगली कामगिरी केली आहे आणि कलही वाढला आहे. २,६२,१३३ विद्यार्थी पात्र ठरले. राज्यात १,३८,५४१ अभियांत्रिकीच्या जागा आहेत. गेल्यावर्षी १,५३,८६७ जागा होत्या. यावर्षी ११३ महाविद्यालयांतील १७ हजार जागांना कात्री लागली आहे. एकूण २,६२,१३३ विद्यार्थ्यांनी सीईटी उत्तीर्ण केल्याने यावर्षी १,३८,५४१ या सर्वच्या सर्व जागा भरण्याची शक्यता वाढली आहे.