‘लोकसत्ता’च्या ‘वक्ता दशसहस्रेषु’ या राज्यस्तरीय आंतर-महाविद्यालयीन वक्तृत्व स्पर्धेत तरुणाईचा विचाररूपी सुसंवाद खेळीमेळीच्या वातावरणात अभिव्यक्त झाला. नागपूर विभागाच्या अंतिम फेरीतील एकापेक्षा एक सरस ठरलेल्या स्पर्धकांच्या वक्तृत्वाने परीक्षकांना कोडय़ात टाकले. विद्यार्थ्यांनी एकाच विषयाचे विविधांगी अंतरंग सहज उलगडत नेऊन श्रोत्यांचाच विषय अधिक पक्का केला.
‘भारत संघराज्य आहे का?’, ‘शेती की उद्योग?’, ‘साहित्य संमेलनाने साधते काय?’, ‘पुरस्कार वापसी’ आणि ‘कोलावरी ते शांताबाई’, या पाच विषयांवर विविधांगी मते ऐकताना विद्यार्थी किती बहुआयामी विचार करतो, त्याचे भावविश्वही या विषयांशी निगडित असतात, याची साक्ष पटली, तर काही वेळेस तो केवळ पोपटपंची करतो, मध्येच भरकटलाय, विसरला, याचीही जाणीव यानिमित्ताने झाली. हे होत असतानाच स्पर्धकाची एखादी कविता किंवा शेर श्रोत्यांना अपील करून गेला. सभागृहात अपेक्षेप्रमाणे मोजकेच स्पर्धक होते आणि धीरगंभीर मुद्रेने तोंडातल्या तोंडात एकीकडे पाठांतर सुरू असतानाच व्यासपीठावरील स्पर्धकावरही त्यांचे लक्ष होते. एकमेकांना ‘बेस्ट ऑफ लक’ देत खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झालेल्या या कौटुंबिक सोहळ्यात सिद्धहस्त लेखिका अरुणा ढेरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे आणि प्रकाशक सोनारी कोलारकर-सोनार सहभागी झाले होते.
दोन दिवस चाललेल्या प्राथमिक फेरीत एकूण ८५ स्पर्धकांनी वक्तृत्वाची छाप पाडली. विभागीय फेरीसाठी पात्र ठरलेल्यांमध्ये एलएडीची श्रीनिधी देशमुख आणि शर्वरी पेटकर, वध्र्याच्या जी.एस. वाणिज्य महाविद्यालयाचा अमित मुडे, खामल्याच्या निकालस महिला महाविद्यालयाची शिवानी पांडे, मॉरिस कॉलेजची भुवनेश्वरी परशुरामकर, धरमपेठेतील तारकुंडे धरमपेठ कनिष्ठ महाविद्यालय समर्थ रागीट, रायसोनी विधि महाविद्यालयाचा अक्षय जोशी आणि नागपूर विद्यापीठ संचालित डॉ. बाबासाहेब आंबेडकर विधि महाविद्यालयाचा डॉ. सुजित कुंभलकर या विद्यार्थ्यांचा समावेश होता.
‘जनता सहकारी बँक, पुणे’ व ‘तन्वी हर्बल’ प्रायोजक असलेल्या स्पर्धेची पहिली फेरी अमरावती मार्गावरील बोले पेट्रोलपंपाजवळच्या, विनोबा विचार केंद्रात झाली. स्पर्धेस सिंहगड इन्स्टिटय़ुट, मांडके हिअरिंग सव्‍‌र्हिसेस, इंडियन ऑईल, इन्स्टिटय़ुट ऑफ करिअर डेव्हलपमेंट अर्थात, आयसीडी यांचे सहकार्य लाभले. तसेच युनिक अ‍ॅकेडमी आणि स्टडी सर्कल स्पर्धेचे नॉलेज पार्टनर होते.
या स्पर्धेच्या उद्घाटनाला प्रमुख पाहुणे म्हणून निकालस महिला महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. सीमा सोमलवार यांना, तर समारोपीय कार्यक्रमाला मोहता विज्ञान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय चरलवार यांना निमंत्रित करण्यात आले.
डॉ. सोमलवार म्हणाल्या, डिजिटल काळात विद्यार्थ्यांच्या सुप्तगुणांना वाव देणाऱ्या या स्पर्धा अप्रासंगिक होत चालल्या की काय, अशी भीती वाटत असतानाच लोकसत्ताने एका चांगल्या उपक्रमाला उचलून धरले. बोलणे, विचार करणे, ऐकणे, एवढेच अशा स्पर्धेतून साध्य होत नाही, तर आपण विचारप्रवण होतो. समारोपीय कार्यक्रमात डॉ. चरलवार म्हणाले, विद्यार्थ्यांना अभ्यास, प्रात्यक्षिक आणि इतर व्यापांमुळे व्यक्त होण्याची संधी फार कमी मिळते. ही व्यक्त होण्याची संधी लोकसत्ताने उपलब्ध करून दिली. प्राथमिक फेरीत परीक्षक म्हणून लाभलेले अनंत ढोले यांनी यांनी वक्तृत्व स्पर्धेचे काही बारकावे सांगितले. केवळ पाठांतर नव्हे, तर स्वमत मांडून नवीन विचार पेरणारा, विचार करण्यास प्रवृत्त करणारा वक्ता असावा लागतो. स्फुल्लिंग, चेतना निर्माण होऊन समाजापुढे नवीन विचार येईल, अशी अपेक्षा वक्तृत्व स्पर्धेतून असते.

निव्वळ पाठांतर म्हणजे वक्तृत्व नाही. त्यातील माहितीचा अन्वय लागायला हवा. काय म्हणायचे याचा संदर्भ समजायला हवा. केवळ माहिती देऊन वक्तृत्व साधत नाही. अनुभवातून विचार आले पाहिजेत. स्पर्धेतून व्यक्तिमत्त्व घडते. एरव्ही स्पर्धकांनी दिलेल्या विषयांचा अभ्यास केला नसता, तसेच विरुद्ध बाजूच्या सामर्थ्यांच्या आणि उणिवांच्या जागाही कळल्या नसत्या. व्यक्तिगत आवडीनिवडी बाजूला ठेवून त्यापलीकडील विचार पचवायला शिकले पाहिजे. सगळ्या बाजूंचा विचार विषय मांडताना करायला हवा. त्यातून आपल्यातील क्षमतांची ओळख होते. शिवाय, भाषेवर प्रेम करायलाही शिकले पाहिजे. कारण, वक्तृत्व हा हृदयसंवाद आहे.
अरुणा ढेरे, परीक्षक

विद्यार्थ्यांच्या कमी वयातील परिपक्व विचार आश्चर्य निर्माण करणारे, तसेच ते संशय निर्माण करणारेही आहेत. ते खरोखरच त्यांचे विचार आहे की, कुणीतरी सुचवलेले, सांगितलेले आहेत? एकाच विषयावरील भिन्न मते श्रवणीय होती. केवळ एखादा विचार मनात येणे एवढेच पुरेसे नाही, तर निरीक्षण टिपणाऱ्या परिवर्तनाची भूमिका चांगल्याप्रकारे मांडू शकतो.
अतुल लोंढे, परीक्षक

वादविवाद आणि वक्तृत्वात फरक आहे. स्पर्धातून आतला आवाज केवळ पोहोचवायचा नसतो तर तो रुजवायचा असतो. स्पर्धेचा विषय जोरकसपणे मांडताना तो समाजभिमुख असावा. प्रवाहाविरुद्ध बोलताना तोडीचे मुद्देही स्पर्धकांकडे हवेत.
सोनाली कोलारकर, परीक्षक