राज्य सरकार दिवाळीच्या दिवसापर्यंत ५ टक्केही शेतकऱ्यांची कर्जमाफी करू शकलेले नाही. सोबत बाजार समित्यांचे व्यवहार ठप्प झाल्याने शेतमालाला भाव मिळत नसल्याने यंदा शेतकऱ्यांची दिवाळी अंधारात आहे. सरकारने शब्दांचा खेळ न करता सरसकट कर्जमाफी करून शेतकऱ्यांचा सात-बारा कोरा करावा, अशी मागणी काँग्रेसचे विधानसभेतील उपनेते विजय वडेट्टीवार यांनी केली.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ग्रामपंचायत निवडणुकीतील पराभव झाकण्यासाठी काल तातडीने पत्रकार परिषद घेऊन १० लाख शेतकऱ्यांना प्रत्यक्ष कर्जमाफी करून सातबारा कोरा करण्याची घोषणा केली होती. त्यांच्या घोषणेतील फोलपणा आज स्पष्ट झाला आहे. नागपूर जिल्ह्य़ात २३, चंद्रपूर जिल्ह्य़ात ३२ आणि गडचिरोली जिल्ह्य़ातील केवळ १४ शेतकऱ्यांची खात्यात आज रक्कम जमा झाली आहे. राज्यभरात ५ टक्केही शेतकऱ्यांना खात्यात रक्कम जमा झाली नाही. शिवाय ज्यांना रक्कम मिळाली, ती रक्कम पीक कर्जमाफीची आहे. शेतकरी अवजार खरेदीसाठी, जनावारे खरेदीसाठी कर्ज घेत असतात. त्याची नोंद सात-बारावर असते. त्यामुळे असल्या कर्जमाफीमुळे सात-बारा कोरा होऊ शकत नाही. तेव्हा सरकारने सरसकट कर्जमाफी करावी, असेही ते म्हणाले.

सरकारने आधी ८९ लाख शेतकऱ्यांचे कर्ज माफ करणार असल्याचे सांगितले. त्यानंतर सातत्याने हे आकडे बदलत गेले आहेत. तेव्हा किती शेतकऱ्यांनी कर्जमाफीसाठी दावे केले आणि किती शेतकऱ्यांचे कर्ज मंजूर करण्यात आले. याची आकडेवारी सरकारने जाहीर करावी. शिवाय दीड लाख रुपयांच्यावर कर्ज असलेल्या शेतकऱ्यांना आधी वरच्या कर्जाची परतफेड करा तरच कर्जमाफी केली जाईल, असे सांगून सरकारने शेतकऱ्यांची फसवणूक केली आहे, असा आरोप त्यांनी केला.

शेतकऱ्यांच्या मालास भाव मिळत नाही. बाजार समितीचे कामकाज बंद आहे. जीएसटी कुणावर लावावा, हा प्रश्न लोंबकळत असल्याने व्यापारी बाजार समितीकडे भटकत नाहीत. व्यापारी बाहेरच्या बाहेर शेतकऱ्यांचा माल मातीमोल भावाने खरेदी करत आहे. उत्तम प्रतीचे सोयाबीन केवळ दोन हजार रुपये प्रतिक्विंटलप्रमाणे खरेदी केले जात आहे. धान कापणीला आला असताना पाऊस पडल्याने पिकाचे नुकसान झाले. सरकारने सोयाबीन आणि कापूस हमी भावाने खरेदी करावा, असेही ते म्हणाले.

भाजपने विजयाची गावनिहाय आकडेवारी द्यावी

ग्रामपंचायत निवडणुकीच्या निकालानंतर भाजपचा परतीचा प्रवास सुरू झाल्याचे संकेत दिले आहेत, परंतु हा पराभव स्वीकार न करता अधिक जागा जिंकल्याचा दावा भाजप करीत आहे. भाजपने राज्यातील सर्व ग्रामपंचायतनिहाय आकडे सादर करून सत्य लोकांसमोर मांडावे, असे आव्हान वडेट्टीवार यांनी दिले. विदर्भात सर्वच जिल्ह्य़ात ग्रा.पं. निवडणुकीत काँग्रेसला सर्वाधिक जागा मिळाल्याचा दावा करीत वडेट्टीवार यांनी आकडेवारी देखील दिली. अमरावतीमध्ये काँग्रेसला १४० जागा, भाजपला ३६ जागा, नागपूरमध्ये काँग्रेसला ९३ जागा आणि भाजपला ९१ जागा, चंद्रपुरात काँग्रेसला २१ आणि भाजपला १७ जागा, भंडारा जिल्ह्य़ात काँग्रेसला १५२, भाजपला १२१ जागा मिळाल्या आहेत, असेही ते म्हणाले.

सरकारचा खरा चेहरा उघड

सरकारने सामाजिक न्याय खात्याचे १ हजार कोटी रुपये शेतकरी कर्जमाफी नावाने वळवले आहे. अनुसूचित जाती, जमातीच्या कल्याणासाठी अर्थसंकल्पाच्या २० टक्के रक्कम खर्च करणे बंधनकारक असताना सरकारने हे केले आहे. एकीकडे विकासाच्या नावाने निर्थक उधळपट्टी आणि शेतकरी या उपेक्षित घटकांच्या नावाने दुसऱ्या एका वंचित घटकाच्या कल्याणाची रक्कम वळती करून सरकारने आपला चेहरा उघड केला आहे. याकडे काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे यांनी लक्ष वेधले.