परिवहन मंत्री रावते यांची सरकारवर टीका; शेतकऱ्यांना अर्थसहाय्य करा, मुख्यमंत्र्यांना पत्र

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांना कर्जमाफी जाहीर केली, परंतु त्याचा लाभ एकाही शेतकऱ्याला मिळाला नाही, अशी टीका याच सरकारचे परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी केली.

रावते यांच्याकडे शिवसेनेच्या विदर्भाचे संपर्क प्रमुखपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. त्यांनी सोमवारी पक्ष पदाधिकाऱ्यांशी रविभवन येथे चर्चा केली. यानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. कर्जमाफी शेतकऱ्यांपर्यंत पोहचू शकली नाही. त्यामुळे कर्जमाफी झाल्यानंतर देखील विदर्भात शेतकरी आत्महत्या होत आहेत. अगोदरचे कर्ज न भरल्याने नवे कर्ज मिळालेले नाही. अशा स्थितीत अस्मानी संकटामुळे गेलेल्या पिकाला आर्थिक मदत मिळावी, ही शिवसेनेची भूमिका आहे. याबाबत शिवसेना अध्यक्ष उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा झाली आहे. यंदा पाऊस कमी झाला असून त्याचा फटका विदर्भ, मराठवाडय़ातील शेतकऱ्यांना बसला आहे. पीक नुकसानासाठी राज्य सरकारने आर्थिक मोबदला जाहीर करावा, अशी मागणी शिवसेनेतर्फे करण्यात आली आहे. यासंदर्भातील पत्र रावते यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लिहिले आहे. या विषयावर मंत्रिमंडळाच्या बैठकीत चर्चा करण्याची मागणी केली आहे. यंदा पाऊस कमी आल्यामुळे अगोदरच अडचीत असलेल्या शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. सोयाबीन, मूग, उडीद या पिकांचे फार नुकसान झाले आहे. कापूस आणि काही प्रमाणात तुरीचे उत्पादन होईल. मुख्यमंत्र्यांना शेतकऱ्यांच्या एकूण स्थितीचा पिकनिहाय अहवाल सोपविण्यात आला आहे. त्यावर मुख्यमंत्री मंत्रिमंडळ बैठकीत योग्य तो निर्णय घेतील, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

शिवसेना स्वबळावर लढणार

पानिपतच्या युद्धात पराभव झाल्यानंतर मराठय़ांनी देश पादाक्रांत केला होता. तशाच प्रकारे शिवसेना पुन्हा उभारी घेईल. यापुढे स्वबळावर लढण्याचा निर्णय पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी घेतला आहे. त्यावर आम्ही कायम आहोत, असे सांगून विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीत युती न करण्याची भूमिका मांडली. मीरा-भाईंदर महापालिका निवडणुकीच्या निकालावर दिवाकर रावते यांनी यावर प्रतिक्रिया दिली. आपल्या देशात निवडणुका होतच असतात. निवडणुका ही जीवनशैलीच आहे. निवडणुका डोळ्यासमोर ठेवून आम्ही काम करीत नाही, असेही ते म्हणाले.