अग्निशमन विभागापुढे प्रश्न; २५ लाखांच्या शहरात साचलेले पाणी काढण्यासाठी फक्त १५ पंप; वाहनेही नादुरुस्त

अग्निशमन केंद्रांची संख्या वाढली असली तरी तीन वर्षांत मनुष्यबळ वाढले नाही आणि यंत्रणाही जुनी झाली आहे. त्यामुळे यंदा पावसाळ्यात अग्निशमन विभागाला पुन्हा तारेवरची कसरत करावी लागणार असल्याची चिन्हे आहेत.

गेल्यावर्षी अतिवृष्टीमुळे विविध वस्त्यांमध्ये पाणी साचले आणि जीवहानी सुद्धा झाली होती. त्यामुळे यंदाही तशीच परिस्थिती निर्माण झाली तर काय करायचे, यासंदर्भात महापौर नंदा जिचकार यांनी गेल्या आठवडय़ात अग्निशमन विभागासह आरोग्य विभागाची बैठक घेतली. त्यात अग्निशमन विभागाला प्रत्येकझोननमध्ये आपात्कालीन व्यवस्थेसंदर्भात स्वतंत्र कक्ष स्थापन करावा, यंत्रणा सज्ज ठेवावी याबाबत निर्देश देण्यात आले. दरम्यान, आपात्कालीन परिस्थितीसाठी यंत्रणा सक्षम आहे का, याचा विचार कोणीच करीत नाही. अतिवृष्टी झाली की प्रशासनाला जाग येते. तीन वर्षांपासून हेच सुरू आहे.

शहरात उंच इमारती बांधल्या जात आहेत. आता विविध भागात सिमेंट रस्त्यांचे जाळे विणण्यात आले. या कामांमुळे नाल्या आणि मेनहोल्स बंद झाले. अशा स्थितीत पाणी साचण्याची शक्यता अधिक आहे.

त्यामुळे अग्निशमन विभागाला चांगलीच कसरत करावी लागणार आहे. प्रत्येक अग्निशमन केंद्रावर केवळ एक याप्रमाणे आठ तर सिव्हिल लाईन्समधील केंद्रीय कार्यालयात फक्त १५ पंप आहेत. या पंधरा पंपाच्या बळावर शहरातील विविध भागात साचलेले पाणी काढता येणे शक्य नाही. यातील अनेक पंप नादुरस्त आहेत. त्यामुळे अनेकदा कमी संख्येतील कर्मचाऱ्यांना जीव मुठीत घेऊन साचलेले पाणी काढावे लागते.

साधनांची कमतरता बघता अग्निशमन विभागाने यापूर्वी दोनदा प्रशासनाकडे प्रस्ताव पाठविला होता. त्याला मंजुरी देण्यात आली होती. मात्र, अजूनही त्यावर अंमलबजावणी झाली नाही. आजच्या स्थितीत अग्निशमन विभागाला ५० पंपाची गरज आहे व २०० कर्मचाऱ्यांची व त्यांच्यावर नियंत्रण ठेवणाऱ्या ५० अधिकाऱ्यांची गरज आहे.

गेल्या अनेक वर्षांपासून अपुऱ्या कर्मचाऱ्यांच्या बळावर अग्निशमन विभाग काम करीत आहे. अनेकदा या संदर्भात महापालिका प्रशासनाला सांगण्यात आले मात्र, परंतु अग्निशमन विभागाच्या बळकटीकरणासाठी कुठलेही प्रयत्न होताना दिसत नाही.

कर्मचाऱ्यांची वास्तविक स्थिती

अग्निशमन विभागात विविध पदावर एकूण ३९६ पदे मंजूर आहेत. यातील तब्बल १७७ पदे रिक्त आहेत. केवळ २१९ कर्मचाऱ्यांवर अग्निशमन विभागाचा डोलारा आहे. यातील १९ कर्मचारी यावर्षी सेवानिवृत्त होणार आहेत. अनेक कर्मचारी पुढच्या वर्षी निवृत्त होणार आहेत.

मंजूर पदेही भरली नाही

नव्या आकृतीबंधानुसार पदे मंजूर झाली असली तरी ती अजून भरली नाही. गेल्यावर्षी वस्त्या-वस्त्यांमधील साचलेले पाणी काढताना विभागाच्या कर्मचाऱ्यांना कसरत करावी लागली होती. पाणी काढण्यासाठी आणखी ३० पंपाची आवश्यकता आहे. काही पंप नादुरुस्त आहेत. शिवाय अनेक गाडय़ांची अवस्थाही अशीच आहे. प्रशासनाकडे प्रस्ताव देण्यात आला आहे. अतिवृष्टीची शक्यता बघता अग्निशमन विभाग त्यासाठी सज्ज आहे. राजेंद्र उचके, अग्निशमन विभाग प्रमुख, महापालिका