ग्लिसरीनसह लाखोंचे रसायन खाक , आंबेडकर चौक परिसरात तणाव
फटाक्यामुळे शहराच्या विविध भागात सातहून जास्त आग लागण्याच्या घटना घडल्या. सर्वात भीषण आग आंबेडकर चौकातील शामधाम अपार्टमेंट, बाबूलबन येथे गुरुवारी संध्याकाळी ५ च्या सुमारास घडली. फार्मास्युटिकल कारखान्यातील लाखो रुपयांचे ग्लिसरीन व इतर रसायने जळाल्याने परिसरात खळबळ उडाली होती. अग्निशामन दलाच्या पाच गाडय़ांनी आगीवर अनेक तासांच्या प्रयत्नांनी नियंत्रण मिळवले असले तरी परिसरात तणाव निर्माण झाला होता.
संजय कुकरेजा, असे आग लागलेल्या मे. अ‍ॅड्रोटीक फार्मास्युटिकल प्रा. लिमी. या कारखान्याच्या मालकाचे नाव आहे. हा कारखाना सेंट्रल एव्हेन्यूवरील आंबेडकर चौकातील शामधाम अपार्टमेंट, बाबूलबन येथील एक मजली इमारतीच्या गच्चीवर टिनशेड टाकून थाटण्यात आला आहे. कारखाना परिसरात फटाके फोडण्यात येत होते. एका फटाक्याची ठिणगी कारखान्यात येऊन पडली. त्याने येथील रसायनांनी पेट घेतला. थोडय़ाच वेळात आगीने कारखान्यातील इतर रसायनांसह विविध वस्तूंना विळख्यात घेतले. जोरजोराचा आवाज होत आग पसरत असल्याचे बघत परिसरात खळबळ उडाली.
तातडीने या इमारतीसह शेजारच्या नागरिकांनी सुरक्षित ठिकाणी पळ काढला. अग्निशामन दलाला सूचना देण्यात आली. पाच गाडय़ांसह अग्निशामन दलाचे जवानांनी आल्यावर आगीवर पाण्याचा मारा सुरू केला. अनेक तासांच्या प्रयत्नांनी आगीवर नियंत्रण मिळाले. त्यापूर्वी कारखान्यातील लाखो रुपयांचे साहित्य जळून खाक झाले होते. फटाक्यामुळे आग लागल्याने परिसरात तणाव निर्माण झाला होता. दरम्यान, फटाक्यामुळे ११ नोव्हेंबरच्या रात्री ८ वाजता महालच्या वॉकर रोडवर धरमपेठ महिला बँकेच्या शेजारी बाईकवाडय़ाच्या टेरेसवर आग लागली. आगीत टेरेसवर ठेवलेले अनेक जुने साहित्य जळून खाक झाले. रात्री ११.४६ वाजता जुनी शुक्रवारी परिसरात एक पेंडालही फटाक्याच्या आगीत खाक झाले. रात्री १२ वाजता सदरच्या मंगळवारी बाजार परिसरात व १२.११ वाजता हिवरीनगर येथील लोहाणा सेवा मंडळ कार्यालयाजवळही फटाक्याने आगी लागल्या, तर लकडगंज परिसरातही भूपेश चामट व अजय समर्थ यांच्या मालकीच्या दोन बिडिंगच्या कारखान्यांना आगी लागल्या. वेळीच आग निदर्शनात आल्याने त्वरित त्यावर नियंत्रण मिळाल्याने मोठी दुर्घटना टळली. इतरही काही भागात लहान मोठय़ा आगीच्या घटना घडल्याची माहिती आहे. नागरिकांनी त्वरित पुढे येऊन आगीवर नियंत्रण मिळवल्याने त्याची नोंद अग्निशामन दलाकडे होऊ शकली नाही.

चार दुचाकी, दोन चारचाकी वाहने जळाली
दोन दिवसांत फटाक्यांसह विविध कारणाने शहराच्या विविध भागात चार दुचाकी व दोन चारचाकी वाहने जळाली. इंद्रनगर, न्यू नरसाडा रोडवर गागेश्वर कुळकर्णी यांची मारुती ओमनी गाडी (क्र.एमएच-३१, झेड-४८६४) जळाली. याच भागात किशोर भुसारी यांची स्कुटी जळाली. सेमिेनरी हिल्सवरील एसएनडीएल कार्यालयात एक मोटार सायकल व अ‍ॅक्टीव्हा वाहनाला संशयास्पद आग लागली, तर वैशालीनगरात एका स्विफ्ट या वाहनाालाही आग लागली. इमामवाडा येथे एका इलेक्ट्रीक मिटरमध्ये शॉर्ट सर्किट होऊन आग लागल्याची माहिती असून तर इलेक्ट्रीक मिटरमध्ये झालेल्या शॉर्ट सर्किटची ठिणगी पडून एका दुचाकीची सिटही जळाली.