पक्क्या इमारती सोडून टिनपत्र्यांची चौकी आता वनखात्यासाठी महत्त्वाची झाली आहे. झिरो माईल येथील प्रादेशिक वनविभागाच्या प्रवेशद्वारावरच गेल्या सहा महिन्यांपासून येणाऱ्या-जाणाऱ्यांवर नजर ठेवण्यासाठी सुरक्षा चौकी उभी करण्यात आली. मात्र, पक्क्या इमारतीतील माहिती कक्ष, कॉल सेंटरला कुलूप लावून आणि टीनपत्र्याच्या चौकीत ते स्थानांतरित करून वनखात्याने काय साधले, हे कळायला मार्ग नाही.
प्रादेशिक वनखात्याचे तत्कालीन उपवनसंरक्षक दीपक भट यांच्या निलंबनानंतर दुसऱ्याच दिवशीपासून झिरो माईल येथील प्रादेशिक वनखात्याच्या कार्यालयात येणाऱ्या प्रत्येकालाच चौकशीच्या फेऱ्यातून जावे लागत होते. त्यासाठी कित्येक दिवसांपासून कार्यालय परिसरात धूळखात पडलेली टिनपत्र्यांची चौकी प्रवेशद्वारावर आणून ठेवण्यात आली. वन कर्मचारी, अधिकाऱ्यांव्यतिरिक्त इतरांना मात्र त्यांची वाहने प्रवेशद्वाराच्या बाहेर ठेवून आणि ओळखपत्र दाखवूनच आत प्रवेश दिला जात होता. प्रसारमाध्यमांनी याची वाच्यता केल्यानंतर हा प्रकार बंद झाला, पण चौकीचे स्थान गेल्या सहा महिन्यांपासून ‘जैसे थे’च आहे. विशेष म्हणजे, येणाऱ्या-जाणाऱ्यांच्या नोंदीसाठी असलेली ही चौकी नंतर मात्र विविधांगी कार्यासाठी वापरली जाऊ लागली. या चौकीला लागूनच असलेल्या इमारतीत माहिती कक्ष होते. ते आणि ‘कॉल सेंटर’सुद्धा या चौकीत स्थानांतरित करण्यात आले. त्यामुळे चौकशीसाठी स्थापित या चौकीतून एकाच वेळी विविधांगी कामांची सुरुवात झाली. त्यामुळे जे माहिती कक्ष पूर्वी २४ तास चालायचे त्याची वेळमर्यादा आता कमी झाली.
पूर्वी शिफ्टप्रमाणे या ठिकाणी चार जण कार्यरत होते, ते आता तीनवर आणण्यात आले. माहिती कक्षात लोकांचे वन्यप्राणीपक्षी बचावासाठी येणारे किंवा इतर कामांसाठी येणारे कॉल घेतले जातात. या कॉल्सचा अहवाल नंतर वरिष्ठांकडे दिला जातो. मात्र, २४ तास सुरू असायला हवे असणाऱ्या या माहिती कक्षाची वेळमर्यादा अवघ्या काही तासांवर आल्यामुळे सायंकाळी सहानंतर येणाऱ्या कॉल्सचे काय, याचे उत्तर वनखात्याकडे नाही. दरम्यान, या चौकीवरून आणि चौकीच्या विविधांगी कारभारावरून कर्मचाऱ्यांमधील मतभेद उघड झाले होते. माहिती केंद्र, कॉल सेंटर पूर्वीच्याच ठिकाणी स्थानांतरित करण्यासाठी उपवनसंरक्षक जयंती बॅनर्जी यांनी आदेशही काढले होते. मात्र, त्या सुटीवर जाण्याच्या एकदिवस आधी हे आदेश काढण्यात आल्याने त्या आदेशाची पूर्तता करण्यासाठी काही कर्मचाऱ्यांनी टाळाटाळ केली. माहिती केंद्र व कॉल सेंटर पूर्वीच्याच इमारतीत स्थानांतरित झाल्यास २४ तास काम करावे लागेल आणि ते टाळण्यासाठीच या आदेशाचे पालन करण्यात न आल्याची चर्चा आता वनखात्यात आहे.
यासंदर्भात उपवनसंरक्षक जयंती बॅनर्जी यांच्याशी संपर्क साधला असता त्या रजेवर असल्याचे सांगण्यात आले. वनपरिक्षेत्र अधिकारी कोलनकर यांनी तीन वनरक्षक या चौकीत कार्यरत असून आठ-आठ तासांची त्यांची शिफ्ट असल्याचे सांगितले.
सायंकाळी सहानंतरचे काय, असे विचारले असता सायंकाळी सहानंतर पक्क्या इमारतीतून माहिती केंद्राचा कार्यभार चालत असल्याचे ते म्हणाले.